जागतिक व्हेल दिन- महाराष्ट्रातील व्हेल

    16-Feb-2026
Total Views |

जगात केवळ व्हेल या सागरी सस्तन प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. हा प्राणी जगातील सर्वांत मोठा सस्तन प्राणी असून आजच्या जागतिक व्हेल दिनानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रात आढळणाऱ्या या सस्तन प्राण्यांविषयी...

महाराष्ट्रात व्हेलला सर्वसामान्यपणे ‌‘देवमासा‌’ असे म्हणत असले, तरी ते मासे नव्हेत. व्हेल हा सागरी सस्तन प्राणी आहे. जगातील सर्वांत मोठे सस्तन प्राणी हे व्हेल आहेत. महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रात खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात त्यांचा प्रामुख्याने वावर आहे. सागरी जीवशास्त्रज्ञांच्या नोंदीप्रमाणे ब्ल्यू व्हेल, बृड्‌‍स व्हेल, हम्पबॅक व्हेल, स्पर्म व्हेल, ड्वार्फ स्पर्म व्हेल, कुविअर्स बिक्ड व्हेल यांचा वावर राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आहे. राज्यातील स्थानिक मच्छीमार समाजाला व्हेलविषयी दैवी आस्था असल्याने ते या माशाची शिकार करत नाहीत. व्हेलचे ‌‘टूथेड व्हेल‌’ आणि ‌‘बलिन व्हेल‌’ हे प्रामुख्याने दोन गट आहेत. टूथेड व्हेल म्हणजे ज्यांना दात असतात. ‌‘बलिन व्हेल‌’ म्हणजे ज्यांना तोंडात दात नसतात. दातांऐवजी आपण केस विंचरण्यासाठी जसा कंगवा वापरतो, त्याप्रमाणे जाळीदार पडदे असतात. या जाळीदार पडद्यांच्या माध्यमातून ते आपले अन्न म्हणजे कोळंबीसदृश जीव क्रिल, छोटे मासे आणि प्लवक गाळून खातात. दिवसाला हा अजस्र जीव साधारणपणे 1 हजार, 300 किलोग्रॅमपर्यंत अन्न खातो. भारतीय रस्त्यावर दिसणाऱ्या ‌‘मारुती स्विफ्ट‌’ या कारच्या वजनाइतके भरेल, एवढे अन्न व्हेल खातो, असे आपण बोलू शकतो.

अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल

जगभरात ‌‘हम्पबॅक व्हेल‌’ची संख्या साधारण 60 हजार ते 90 हजार इतकी आहे. आता याच ‌‘हम्पबॅक व्हेल‌’ची अरबी समुद्रात आढळणारी प्रजात ही विशिष्ठ प्रदेशनिष्ठ संख्या असलेली जात आहे. या जातीला ‌‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल‌’ (अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल) असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामधील समुद्र किनाऱ्यांलगत ही व्हेल दिसून येते. अरबी समुद्रात आढळणाऱ्या ‌‘हम्पबॅक व्हेल‌’ ही जगातील फक्त चारपैकी एक असलेली विशिष्ट प्रदेशनिष्ठ संख्या असलेली जात आहे. अरबी समुद्रातील ‌‘हम्पबॅक व्हेल्स‌’चा समुदाय (DPS) इतर व्हेल्सपेक्षा वेगळा आहे. कारण ही प्रजात स्थलांतर करत नाही. या व्हेल्स त्याच भौगोलिक क्षेत्रात जन्म देतात, अन्न शोधतात आणि वाढतात. या व्हेलचा नैसर्गिक आधिवास पश्चिमेला येमेन आणि ओमानच्या किनाऱ्यांपासून ते पूर्वेला इराण, पाकिस्तान आणि भारताच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेले आहेत. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर अरबी समुद्रातील ‌’हम्पबॅक व्हेल्स‌’च्या संशोधनात महत्त्वाची प्रगती होत असल्याचे ‌‘अरबियन सी व्हेल नेटवर्क‌’च्या अलीकडील अहवालात नमूद केले आहे. ओमान आणि भारतामध्ये आढळणाऱ्या अरबी समुद्रातील ‌‘हम्पबॅक व्हेल्स‌’चे गाणे 30 किमी अंतरापर्यंत पाण्यात ऐकू येते. नर दरवष नवीन गाण्याचे ट्रेंड कॉपी करतात आणि अरबी समुद्रातील पॅसिफिक व्हेल्सपेक्षा तुलनेने सोपे आवाज काढतात.

ब्रूडीज व्हेल

व्हेलची अशी एक प्रजात आहे, जी महाराष्ट्राच्या सागर किनारी आणि थोडे पुढे खोल पाण्यात सगळ्यात जास्त वेळा दिसते, ती आहे ‌‘ब्रूडीज व्हेल.‌’ व्हेलची ही प्रजात बऱ्याच वेळा मच्छीमार बाधंवाना मासेमारी करताना दिसते. ‌‘ब्रूडीज व्हेल‌’च्या वरच्या जबड्यावर आणि ओठांवर साधारणपणे एकसमान गडद रंग असतो. त्यांच्या घशावर 40 ते 70 पर्यंत पट्ट्या (throat pleats) असतात, ज्या नाभीपर्यंत किंवा त्यापुढेही पसरलेल्या असू शकतात. हे पट्ट्या त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आणि अन्न गिळण्यास मदत करतात. त्यांच्या तोंडात 250 ते 370 जोड्या राखट रंगाच्या बेलीन प्लेट्स (कर्परपट्ट्या) असतात, ज्यांच्या काठावर फिकट राखट रेशमासारखे केस (fringes) असतात. हे केस जाड आणि खरखरीत स्वरूपाचे असतात, जे पाण्यातून लहान मासे आणि क्रिल्स (सागरी जीव) गाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. ‌‘ब्रूडीज व्हेल‌’चा आकार प्रचंड असतो, पण त्यात ही मादी नराच्या तुलनेने मोठी असते. नर व्हेल 15 मीटर इतके लांब असतात. याची तुलना केल्यास ते जवळपास पाच मजली इमारतीएवढे असू शकतात, तर मादी त्याहूनही मोठी 16.5 मीटरपर्यंत वाढते. तुलना करता, एका क्रिकेट पिचच्या निम्म्याहून अधिक तिची लांबी असते. ‌‘एंडेंजर्ड स्पिसीज रिसर्च‌’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर केलेल्या सर्वेक्षणांदरम्यान ‌‘ब्रूडीज व्हेल्स‌’ची पाचवेळा निरीक्षणे नोंदवली गेली आहेत, जी या प्रजातीची स्थानिक उथळ किनारी पाण्यातील (2.6 ते 26.4 मीटर खोली) उपस्थिती दर्शवतात. या व्हेल्स सामान्यतः उष्ण-समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय पाण्यात आढळत असून, या अभ्यासात त्या महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ (0.09 ते 6.7 किमी अंतरावर) दिवसाच्या प्रकाशात दिसून आल्या, ज्यामुळे त्यांच्या किनाऱ्याजवळच्या अधिवास वापरावर प्रकाश टाकला गेला.

ब्ल्यू व्हेल

जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे ब्लू व्हेल. हे 30 मीटरपेक्षा (100 फूट) अधिक लांब असतात. वजन 173 टनांपर्यंत पोहोचते. 2015 साली सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथे किनाऱ्यापासून अडीच किमी अंतरावर समुद्रात ‌‘ब्ल्यू व्हेल‌’ची मादी आपल्या वासरासोबत पोहत असल्याची नोंद ‌‘कोकण सीटेशियन्स रिसर्च टीम‌’च्या संशोधकांनी केली होती. त्यावेळी महाराष्ट्रात ‌‘ब्ल्यू व्हेल‌’ची नोंद जवळपास 100 वर्षांनी करण्यात आली होती. ‌‘बलिन व्हेल्स‌’ हे सामान्यतः एकलकोंडे असतात. केवळ अन्नाच्या शोधात आणि प्रजोत्पादनाच्या प्रदेशात ते मोठ्या संख्येने एकत्र येतात. डॉल्फिन आणि पॉरपोईज दिशा शोधण्यासाठी ज्याप्रमाणे प्रतिध्वनीचा वापर करतात, तसा ‌‘बलिन व्हेल्स‌’ करत नसावेत, असा अंदाज आहे. ते अतिशय खालच्या पट्टीतला आवाज वापरून खूप दूरपर्यंत संपर्क साधू शकतात.

व्हेलच्या उलटीची तस्करी

स्पर्म व्हेलच्या उलटीला ‌‘एम्बर्ग्रिस‌’ म्हणतात. व्हेल हे कटलफिश आणि ऑक्टोपस म्हणजेच माकुळ प्रजातीचे मासे खातात. या माशांच्या काटेरी दंत्तपट्टिकेमुळे शरीराअंतर्गत इजा होऊ नये, म्हणून व्हेल आपल्या पित्ताशयामधून एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. हा स्राव या दंत्तपट्टिकांना शरीराअंतर्गत इजा करू देत नाही. सरतेशेवटी स्पर्म व्हेल उलटीद्वारे आपल्या शरीरातून हा अवांछित स्राव बाहेर फेकतो. काही संशोधकांच्या मते, स्पर्म व्हेल विष्ठेद्वारे ‌‘एम्बर्ग्रिस‌’देखील शरीराबाहेर टाकून देतो. याच कारणामुळे व्हेलच्या विष्ठेमध्ये माकुळ माशांचे काटेरी दात आढळून येतात. व्हेलच्या शरीरामधून बाहेर पडणारा हा स्राव समुद्राच्या पाण्यात तरंगतो. सूर्यप्रकाश आणि खाऱ्या पाण्यामुळे ‌‘एम्बर्ग्रिस‌’ तयार होतो. ‌‘एम्बर्ग्रिस‌’ हा काळा, पांढरा आणि राखाडी रंगाचा एक तेलकट पदार्थ आहे. समुद्रात तरंगताना त्याला अंडाकृती किंवा गोल आकार येतो. हा पदार्थ ज्वलनशील आहे. असे मानले जाते की, स्पर्म व्हेलच्या डोक्यावर असा एक अवयव असतो, ज्याला ‌‘स्पर्मेट्टी‌’ म्हणतात. हा अवयव तेलाने भरलेला असतो. हे तेल व्हेलचे वीर्य किंवा शुक्राणू असल्याचे मानले जाते. म्हणूनच या व्हेलला ‌’स्पर्म व्हेल‌’ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला ‌’एम्बर्ग्रिस‌’ला सुगंध नसतो. परंतु, हवेबरोबर या पदार्थाचा संपर्क वाढल्यानंतर त्यामधील सुगंध वाढत जातो. त्यामुळे सुगंधित वस्तू खास करून परफ्यूम तयार करण्यासाठी ‌‘एम्बर्ग्रिस‌’ खूप उपयुक्त आहे. ‌‘एम्बर्ग्रिस‌’ हे परफ्यूममधील सुगंधाला हवेमध्ये उडू देत नाही. ते दुमळ असल्याने त्याची किंमतदेखील खूप जास्त असते. त्याला ‌‘समुद्री सोने‌’ किंवा ‌‘तरंगणारे सोने‌’देखील म्हणतात. त्याचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रतिकिलो 1.5 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

व्हेल श्वास कसा घेतात?

समुद्रातील ऑक्सिजनची मर्यादित उपलब्धता ही आणखी एक मोठी अडचण आहे. व्हेल आणि डॉल्फिनसारख्या प्रजाती बऱ्याच वेळा श्वास रोखून ठेवू शकतात. हे त्यांच्या शरीरातील अनोख्या शारीरिक बदलांमुळे शक्य होते, जसे की फुप्फुसांची कार्यक्षमता. प्रत्येक श्वासोच्छ्वासात फुप्फुसातील जास्तीत जास्त हवा बाहेर टाकली जाते, ज्यामुळे ऑक्सिजनची कार्यक्षम देवाणघेवाण होते. दुसरी विशेषता म्हणजे, रक्तातील ऑक्सिजन साठवणूक.

त्यांच्या स्नायूंमध्ये मायोग्लोबिनचे जास्त प्रमाण असते, ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ ऑक्सिजन साठवता येतो. रक्तप्रवाह नियंत्रण करण्याचे कसब विशेषतः पाण्यात बऱ्याच वेळ बुडी मारताना रक्तप्रवाह केवळ आवश्यक अवयवांकडे वळवला जातो. डुबकी घेताना ते हृदयाचे ठोके मंदावतात, ज्याला ‌‘ब्रॅडिकार्डिया‌’ म्हणतात, त्यामुळे ऑक्सिजन वाचवला जातो. वर्तनाच्या दृष्टीनेही, ते डुबक्या योग्य प्रकारे नियोजन करतात आणि ऊर्जा वाचवण्यासाठी हालचाल कार्यक्षमतेने करतात. वेडेल सील्ससारखे प्राणी बुडी मारताना त्यांच्या प्लीहा (स्प्लीन)च्या ऑक्सिजनयुक्त लाल रक्तपेशींचा साठा वापरतात. आणखी एक विशेषता म्हणजे, कमी ऑक्सिजनवर जगण्याचे सामर्थ्य. समुद्री सस्तन प्राणी नेहमीच कमी ऑक्सिजनच्या (हायपॉक्सिया) स्थितीत असतात. मिलियन वर्षांच्या उत्क्रांतीमुळे त्यांच्या शरीरात अशा जीनमध्ये बदल झाले आहेत, ज्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होणाऱ्या हानीपासून बचाव करता येतो.

- प्रदीप चोगले
(लेखक ‌‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट‌’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)