मुंबई: (Sanjay Raut) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. असं आम्ही नाही तर, उबाठाचेचं खासदार संजय राऊत म्हणतायत.
पण राऊत नेमकं असं का म्हणाले? त्यांनी ही खंत कुठे बोलुन दाखवली? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सामनातून रोखठोक समाचार घेण्यात आला. या राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: ठाकरे बंधूंचे कान टोचले. त्यांच्या या जळजळीत लेखातून भाजप-शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विजयाचे तर महाविकास आघाडीच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले.
महायुतीच्या विजयाबद्दल राऊतांचे विश्लेषण
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नैराश्य कायम असल्याचे दिसते. तर दुसरीकडे भाजप आणि मित्र पक्षांचे तळागळात पाळंमुळ घट्ट होत असल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने सरस कामगिरी केली आहे. या सर्व निवडणुकीतील गोळाबेरीज सामनातून मांडण्यात आली. या निवडणुकीचे खासदार संजय राऊत यांनी संपादकीयमधून विश्लेषण केले. त्याचवेळी त्यांनी ठाकरे बंधूंचे कानही टोचले. या संपादकीयमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असा खणखणीत फटकार विरोधकांना लगावला आहे.
मविआ पिछेहाटीचे कारण
विश्लेषण करताना खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विजयाचे गमक काय आहे, याची बारीकसारीक नोंद घेतली आहे. सत्ताधाऱ्यांना फटकारे लगावणारे संजय राऊत यांनी यावेळी स्वपक्षीय आणि 'मविआ'तील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने ‘बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आणि त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत, असे विश्लेषण त्यांनी केले.
तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचेही विश्लेषण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणुकीत उतरले. भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले. पक्षाचा कार्यक्रम राबवला. निवडणूक लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी ठरवतात. तर या निवडणुकीत शिवसेनेला जिल्हा परिषद निवडणुकीत १६२ जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले, याकडे राऊतांनी लक्ष वेधले.
शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने १६५ जागा जिंकल्या, हे विसरून चालणार नाही, याकडे राऊतांनी मोठे भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादीची जमेची बाजू मांडतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पीछेहाटही समोर आणली.
फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे
महाराष्ट्राच्या राजकारणातील उबाठासेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. उबाठासेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व ठाकरेंपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात, हे चमत्कारिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असे मत राऊतांनी मांडले.
राऊत ठाकरे बंधूंना नेमकं काय म्हणाले?
लोकभावनेचा दाखला देत यावेळी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचे चांगलेच कान टोचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता, तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचे कान टोचत घरचा आहेर दिला.