Mani shankar Aiyer: "मी गांधीवादी, पण राहुलवादी नाही!", काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं पक्षनेतृत्वावर टीकास्त्र

पक्षांतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

    16-Feb-2026   
Total Views |

Mani shankar Aiyer

नवी दिल्ली : (Mani shankar Aiyer)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.  'मी गांधीवादी आहे, पण राहुलवादी नाही', असं म्हणत अय्यर यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. तसेच 'पवन खेरा हे फक्त कठपुतळी आहेत', अशा शब्दांत पवन खेरा यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मी गांधीवादी, पण राहुलवादी नाही!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अ पार्ट अपार्ट या आत्मचरित्राचा दाखला देत मणिशंकर अय्यर म्हणाले, "राहुल गांधी विसरले आहेत की मी या पक्षाचा सदस्य आहे आणि म्हणूनच मी गांधीवादी आहे. मी नेहरूवादी आहे, मी राजीववादी आहे, पण मी राहुलवादी नाही."

पवन खेरांवरही टीका

अय्यर यांनी पक्षातील नेमणुकांवरही नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे माध्यम व प्रचार विभाग प्रमुख पवन खेरा यांच्यावरही जहरी टीका केली.ते म्हणाले, "सध्याची काँग्रेस अशी आहे का? त्यांनी पवन खेरांसारख्या व्यक्तीला अधिकृत प्रवक्ते केले आहे. मला पवन खेरांबद्दल अजिबात आदर नाही. पवन खेरा कोणत्या प्रकारचे काँग्रेसी आहेत? पवन खेरा यांना प्रवक्ता बनवण्यापेक्षा पक्षात लाखो लोक आहेत जे चांगला प्रवक्ता बनू शकतात. हा माणूस एक फक्त कठपुतळी आहे. जयराम रमेश जे सांगतात तेच पवन खेरा बोलतात. त्यामुळे ते प्रवक्ते नाहीत, ते पोपट आहेतः", अशी टीकाही मणिशंकर अय्यर यांनी केली. ते पुढे म्हणाले, मी काँग्रेस पक्षातच आहे. मी पक्ष सोडलेला नाही. जर पवन खेरा मला पक्षातून बाहेर काढणार असतील तर मी त्यांच्या पार्श्वभागावर आनंदाने लाथ मारेन", असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.

पक्षांतर्गत कलहावर भाष्य

अय्यर यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवरही टीका केली. ज्या पक्षात नेते एकमेकांशी भांडतात, एकमेकांचे गळे कापायला तयार असतात, अशा पक्षाला जनता मत का देईल? ही परिस्थिती लोकांना माहिती नाही का? एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये निर्णय सर्वमान्य असायचे. नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा सर्वांनी ते मान्य केले. जर सुभाषचंद्र बोस १७ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या विमान अपघातातून वाचले असते तर मला खात्री आहे की ते भारताचे राष्ट्रपती झाले असते."

पवन खेरांनी दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, या टीकेवर पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ते त्यांच्या क्षमतेनुसार बोलतात आणि लिहितात. त्यांचा गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसशी काहीही संबंध नाही.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\