धनेशाची खाद्यविविधता

16 Feb 2026 12:41:38

धनेश हा पक्षी फळहारी आहे. मात्र, त्याची फळे खाण्याची क्षमता आणि त्याद्वारे होणारे बीजप्रसारण पाहता, हा पक्षी चालता-फिरता ‌‘सीड-बँक‌’ आहे. धनेशाच्या या खाद्यवैशिष्ट्याची माहिती करून देणारा हा लेख...

धनेशच्या खाण्यामध्ये जैववैविध्य आहे. शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही स्वरूपाचे खाद्य तो खातो. महाराष्ट्रात मुख्यतः कोकण परिसरातील जंगल, देवराया, फळबागा आणि सह्याद्रीच्या उतारावरील जंगलामध्ये महाधनेश (ग्रेट हॉर्नबिल), कवड्या धनेश किंवा मलबारी धनेश (मलबार पाईड हॉर्नबिल), मलबारी राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल) आणि राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) या प्रजाती आहेत. यातील महाधनेश, कवड्या धनेश आणि मलबारी राखी धनेश या संकटग्रस्त प्रजाती आहेत. धनेश पक्षी फलाहारी असून काही प्रमाणात लहान पक्षी, उंदीर, कीटकदेखील खातात. सर्व प्रजाती वड, पिंपळ, उंबर, धेंड उंबर, करवत, पिंपरी, नांदरुख वृक्षांची फळे खातात. याव्यतिरिक्त काजरा, जायफळ, मायफळ, बकुळ, लिंबारा, चांदफळ, जंगली बदाम, कुकर, रान जायफळ, जांभूळ, करवंद अशा अनेक फळांचा आहारात समावेश आहे. धनेशपक्षी वृक्षांची फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेतून सर्वदूर पोहोचवतात. यात फळांचा आहाराचा विषय येतो, तेव्हा धनेशाला ‌‘जंगलाचा शेतकरी‌’ अशी दिलेली उपमा खरी ठरते. याचे कारण त्याच्या फलाहारातील वैविध्य. आपण थोडा अभ्यास केला, तर धनेश जी फळे खातो, त्या झाडांचे वर्ग हे सपुष्प वनस्पतीत सगळ्यात सुरुवातीला तयार झालेले आहेत. उदा. रानजायफळ, कामट्टी, कानरी जायफळ किंवा पिंडी. ही सगळी झाडं काही कोटी वर्षांपासून आपले अस्तित्व सांभाळत आलेली आहेत. अशाच झाडांना खाद्य म्हणून धनेशानेही पसंती दिलेली आहे. मतितार्थ हाच की, धनेशाच्या प्रजातीसुद्धा आदिम काळातील सर्वांत जुन्या आहेत, ज्या आजही अस्तित्व टिकून आहेत. पाहूया महाधनेशाच्या अस्तित्वाचा लढा टिकवून ठेवणारे वृक्ष...

Beilschmiedia dalzellii
मराठी नाव - कामट्टी
इंग्राजी नाव - Konkan Walnut/Dalzells Walnut
फुलोरा कालावधी - डिसेंबर ते मार्च
फळ कालावधी - एप्रिल ते जून पहिला आठवडा.
तमालपत्राच्या कुटुंबातले हे झाड देवरायांमध्ये सापडते, तेही खूपच कमी प्रमाणात. IUCN संस्थेने केलेल्या परीक्षणात याला 'Vulnerable'चा दर्जा दिला आहे. धनेश पक्षांच्या विविध प्रजातींचे हे फळ आवडते खाद्य आहे. फळाचे देठ लालसर रंगाचे असते. फळ टपोऱ्या जांभळासारखे दिसते. पिकल्यावर पूर्ण काळा रंग होतो. पिकलेल्या फळाला आंबट, तीव्र चव असते. वासही तीव्र येतो. बियांची उगवण क्षमता 80 टक्क्यांपर्यंत दिसून येते.

Sterculia villosa - जंगली बदाम वर्ग/ जास्वंद वर्ग
मराठी नाव - सरडोळ, कुडळ, कुठाडा, इंग्रजी नाव - Elephant Rope Tree फुलोरा कालावधी - डिसेंबर ते फेब्रुवारी फळ कालावधी - मार्च ते मे, IUCN दर्जा जरी ‌‘निर्धोक वृक्ष‌’ श्रेणीत असला, तरी सरडोळ संख्येने कमी होत चाललेला वृक्ष आहे. धनेशाच्या विविध प्रजाती याच्या बिया खातात. इतर Sterculia प्रजातीप्रमाणेच हाही आवडीचा आहार आहे. फळे कठीण कवचाची असतात. झाडावरच उघडतात व बिया उघड्या पडतात. निमपानझडी वनातील हे एक मुख्य झाड आहे. सदाहरित वनातदेखील याचा आधिवास आढळून येतो. बियांची उगवण क्षमता चांगली आहे. पक्ष्यांच्या विष्ठेतील बिया किंवा फळातील बिया दोन्ही चांगल्या उगवतात, असा अनुभव आहे. झाडाची उंची 15 ते 25 मीटरपर्यंत आढळते. पालवी गर्द लाल दिसते, तेव्हा हे वृक्ष लांबूनदेखील ओळखू येतात. ओहोळाच्या काठी दिसून येतो. उंच आणि खाद्याने विपुल वृक्ष हे धनेशाचे आवडते ठिकाण आहे.

Dysoxylum gotadhora - कडुलिंब वर्ग

मराठी नाव - देवदारू/एरंडी
इंग्रजी नाव - Cup Calyx White Cedar
फुलोरा कालावधी - नोव्हेंबर ते जानेवारी
फळ कालावधी - जानेवारी ते मार्च
IUCNच्या यादीत या झाडाची दखल घेतलेली नसली, तरी देवराया व कोअर झोनमधले संख्या कमी झालेले झाड आहे. धनेश पक्षासाठी महत्त्वाचे झाड; कारण फळासोबत या झाडाच्या ढोलीत धनेश निवारादेखील करतो. झाडाची उंची 20 मीटरपर्यंत आहे. खोड मजबूत असते. फळांचा रंग गडद केशरी दिसून येतो. एका फळात तीन किंवा चार बिया असतात. फळाच्या आकारावर बियांची संख्या अवलंबून दिसते. फळ पूर्ण वाढ झाल्यावर थोडे उघडते व बीज खाली पडते. काही वेळा पक्षी किंवा शेखरुंच्या हालाचालीने फळे बियांसह खाली पडतात. उगवण क्षमता चांगली आहे; मात्र भरपूर वेळ घेणारे बीज आहे. पावसाळ्यात याची रोपे झाडाखाली बघायला मिळतात. ती काढून रोपे तयार करता येतात.

Prunus ceylanica - गुलाब वर्ग/बदाम वर्ग
मराठी नाव - ढाका/कोगल
इंग्रजी नाव - Ceylon Cherry
फुलोरा कालावधी - नोव्हेंबर ते जानेवारी
फळ कालावधी - फेब्रुवारी ते एप्रिल
IUCN श्रेणी धोक्यात आलेल्या झाडाची आहे. उंची 25 मीटर आहे. फळ साधारण कठीण व ढोबळपणे बदामाच्या अकाराचे असते. दोन बिया असतात. बियांची उगवण क्षमता मध्यम आहे. उगवणीवर अधिक काम होणे गरजेचे आहे. रासायनिक किंवा तांत्रिक पद्धतीने उगवण लवकर होईल का, यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. धनेशाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाड आहे. फळांचा आहार होतोच; याशिवाय धनेश याचं बीजवहन करतात. बीज उगवणीबाबत जसं वर सांगितलं, तसं वृक्षाखाली रोपे आढळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. तुलनेत फळे व बीजसंख्या झाडाला जास्त असते.

glaia lawii - कडुलिंब वर्ग
मराठी नाव - बुरूंब, काट
इंग्रजी नाव - Four Petal glaia
फुलोरा कालावधी - जानेवारी ते मार्च
फळ कालावधी - मार्च ते मे
IUCN कमी धोकादायक असे झाड असले, तरीही याची संख्या बरीच सीमित झालेली आहे. झाडाची उंची 15 मीटरहून अधिक दिसते. फळाचा आकार सुपारी किंवा त्यापेक्षा मोठा असतो. फळ पिवळसर रंगाचे असते. एका फळात दोन किंवा बहुतांश वेळा तीन बिया आढळतात. बिया उगवायला बराच कालावधी लागतो. विष्ठेतील बियांची उगवण लगेच होते; मात्र उगवण शक्यता कमी असते. ही झाडे शोधून देवराया व धनेशाच्या अधिवासात लागवड करणे गरजेचे आहे.

- रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
7387641201

Powered By Sangraha 9.0