काँग्रेसचे तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारण म्हणजे हिंदू श्रद्धास्थानांवर शंका घेण्याची सवय. राम मंदिरांबाबत काँग्रेसची भूमिका सर्वज्ञात आहेच. हिंदूच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करायचे आणि मग त्यालाच उदारमतवादाचे लेप द्यायचे, हा काँग्रेसचा जुनाच खेळ आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानला शिवरायांच्या तोडीस तोड ठरवण्याचा केलेला प्रयत्न हा केवळ अज्ञानाचा नमुनाच नाही; तर ती इतिहासाची उंची मोजण्याची कुवत नसताना केलेली तुलना आहे. इंग्रजांविरुद्ध तलवार उगारली, म्हणून प्रत्येक शासक शिवरायांच्या उंचीवर पोहोचत नाही. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य ही राष्ट्रनिर्मितीची संकल्पना होती. किल्ल्यांची साखळी, आरमाराची उभारणी, शिस्तबद्ध महसूल व्यवस्था, स्त्रीसन्मानाची कठोर चौकट या सर्वांचा संगम म्हणजे हिंदवी स्वराज्य. सपकाळ यांच्या वक्तव्यात इतिहासापेक्षा त्यांची राजकीय हतबलताच अधिक दिसते. आज काँग्रेस महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास हरवून बसली आहे. त्यामुळेच शिवरायांच्या नावावर वादाची ठिणगी टाकण्याचा हा स्वस्त प्रसिद्धीचा मार्ग सपकाळ यांनी स्वीकारल्याचे दिसते. काँग्रेसचे तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारण म्हणजे हिंदू श्रद्धास्थानांवर शंका घेण्याची सवय. राम मंदिरांबाबत काँग्रेसची भूमिका सर्वज्ञात आहेच. हिंदूच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करायचे आणि मग त्यालाच उदारमतवादाचे लेप द्यायचे हा काँग्रेसचा जुनाच खेळ आहे. शिवरायांचा अपमान याआधीही काँग्रेसने केला आहे.
कर्नाटकमध्ये काही वर्षांपूवपासून काँग्रेसी कार्यकाळात टिपू सुलतान याच्या जयंतीचा शासकीय पातळीवर उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून हा विषय सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय बनला. हा निर्णय घेताना टिपूला ‘स्वातंत्र्यवीर’, ‘ब्रिटिशांविरुद्ध लढणारा शूर योद्धा’ अशी विशेषणे दिली गेली. पण त्याचवेळी, इतिहासाच्या दुसऱ्या पानांवर नोंदवलेले अत्याचार, जबरदस्तीचे धर्मांतरण, मंदिरांची तोडफोड, कर्नाटकात हिंदूंची केलेली कत्तल, कोडगू आणि मलबार भागातील हिंदूंवरील दडपशाही यांचा उल्लेख सोयीस्कर टाळण्यात आला. टिपू सुलतान याने इस्लामी साम्राज्य विस्ताराच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी अनेक हिंदूंवर पाशवी अत्याचारही केले. मलबारमधील नायर, कोडगूतील कूग, मंगळूर परिसरातील सर्व समुदायांवर अनन्वित अत्याचार झाल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज आणि स्थानिक स्रोतांत सापडतात.
याउलट, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी औरंगजेबासारख्या सत्ताधीशांशी संघर्ष केला, अठरा पगड-बारा मावळ जातीतील जनतेचे रक्षण केले. स्वराज्यातील स्त्री-सन्मानासाठीचे नियम हे अत्यंत कठोर होते. तरीही तेलंगणातील एका घटनेत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला गेला, हे केवळ प्रशासनिक कारण म्हणून मानता येईल का? या विरोधाभासातून काँग्रेसची तुष्टीकरणाची प्रवृत्ती स्पष्ट होते. एका बाजूला हिंदू राजांच्या प्रतीकांकडे दुर्लक्ष किंवा त्यांचे अवमूल्यन आणि दुसऱ्या बाजूला मुघल किंवा अन्य परकीय आक्रमकांना उदात्त ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.
काँग्रेसची विचारधारा दीर्घ काळ धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एका विशिष्ट धर्माच्या लांगूलचालनाचीच राहिली. अल्पसंख्याक तुष्टीकरण हा आरोप अनेकदा काँग्रेसच्या राजकारणावर केला गेला आणि त्याची उदाहरणेही समोर आली. शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल, मुघलकालीन इतिहासाचे तुलनेने विस्तृत वर्णन आणि मराठा, राजपूत, विजयनगर साम्राज्य यांसारख्या हिंदू राजसत्तांवरील मर्यादित चर्चा या सर्वांचा अभ्यास केला, तर काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण स्पष्टपणे दिसून येते. तेलंगणातील शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस सरकारने हटवला, ही घटना केवळ स्थानिक प्रशासनाचा निर्णय म्हणून पाहता येणार नाही. कारण प्रतीकांना राजकारणात मोठे स्थान असते. पुतळा म्हणजे स्मृतीचे दृश्यमान रूप. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा पुतळा हटवला जातो, तेव्हा एका समाजाच्या भावविश्वाला धक्का बसतो. आज देशात सांस्कृतिक राजकारणाची तीव्रता वाढलेली आहे. एका बाजूला हिंदुत्वाची स्पष्ट मांडणी करणारे पक्ष, तर दुसऱ्या बाजूला स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे पक्ष. पण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? सर्व धर्मांना समान न्याय की बहुसंख्याकांच्या भावनांकडे संशयाने पाहणे? हिंदू राजाचा गौरव ‘बहुसंख्याकवाद’ ठरतो आणि मुघल सम्राटाचे उभारलेले स्मारक उभारलेले स्मारक हाच का तो काँग्रेसचा ‘सांस्कृतिक समन्वय?’
काँग्रेससमोर आज अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. एका बाजूला परंपरागत मतदारवर्ग, दुसऱ्या बाजूला नव्या पिढीतील मतदार. या दोघांमध्ये समतोल राखताना इतिहासाचा वापर काँग्रेस राजकीय शस्त्र म्हणून करते आहे. टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणे आणि हिंदूंच्या प्रतीकांकडे दुर्लक्ष करणे, ही रणनीती काँग्रेसला अल्पकालीन लाभ देऊ शकते; पण दीर्घकालीन दृष्टीने ती समाजमन दुभंगण्याचे काम करणार आहे. हिंदू समाजाच्या भावनांचा मुद्दा हा धार्मिक नाही; तो सांस्कृतिक आत्मसन्मानाचा आहे. शेकडो वर्षांच्या आक्रमणांच्या इतिहासानंतर उभे राहिलेले स्वराज्य, त्यासाठी दिलेले बलिदान आणि त्यातून निर्माण झालेली ओळख ही महत्त्वाची बाब दुर्लक्षित केली, तर प्रतिक्रिया ही अपरिहार्य अशीच. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत; तर ते राष्ट्रीय प्रतीक आहेत.
इतिहासाचे राजकारण करणे सोपे आहे; पण इतिहासाशी प्रामाणिक राहणे, हे अत्यंत कठीण. टिपू सुलतानचे कर्तृत्व मांडायचे असेल, तर त्याच्या कारभारातील वादग्रस्त बाजूही मान्य कराव्या लागतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल, तर त्यांना राष्ट्रनिर्माते म्हणून पाहावे लागेल. आजची राजकीय लढाई केवळ निवडणुकांची नाही; ती कथानकांची आहे. कोणता इतिहास सांगायचा, कोणत्या नायकाचा गौरव करायचा, कोणत्या प्रतीकाभोवती समाजाला एकत्र आणायचे यावर भविष्यातील राजकारण उभे राहणार आहे. त्यामुळेच टिपूची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घटना वरकरणी साध्या वाटल्या, तरी त्यामागील संदेश हा गंभीर असाच आहे. काँग्रेसची टिपूभक्ती नवीन नाही. प्रश्न इतकाच आहे की, राजकारण कोणत्या बाजूला उभे राहते निवडक गौरवाच्या बाजूला की संतुलित सत्याच्या? अन्यथा प्रतीकांच्या राजकारणात समाजाची ऊर्जा खर्च होत राहील आणि विकासाची खरी चर्चा मागे पडेल. इतिहास हा विभाजनासाठी नव्हे, तर स्वाभिमान आणि समन्वयासाठी असतो ही जाणीव राजकारणाने ठेवली, तरच पुढील पिढ्यांना संतुलित वारसा देता येईल.