देखणं डूडल व हिवाळी ऑलिम्पिकचे चटके

16 Feb 2026 12:12:47

सध्या गुगलने सादर केलेली विविध खेळावरची डूडल्स चर्चेचा विषय ठरली आहेत. अशीच चर्चा इटलीमधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेची देखील आहे. विरोधापासून राजकारणापर्यंत विविध गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या स्पर्धेच्या आणि गुगल डूडल्सच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...

ओळख गुगलची : ‌‘गुगल‌’ हे नाव माहित नाही असा माणूस सापडणे विरळच. ‌‘गुगल‌’ ही एक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या ‌‘गुगल‌’ची स्थापना दि. 4 सप्टेंबर 1998 रोजी, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी केली. त्याआधी जानेवारी 1996 मध्ये लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात ‌‘पीएचडी‌’चा अभ्यास करताना, गुगलची निर्मिती एका शोध प्रकल्पाच्या रूपात केली होती. नंतर लॅरी पेज यांच्यावर त्याच समूहातील एका अन्य कंपनीची जबाबदारीही सोपवण्यात आली. त्यानंतर दि. 24 ऑक्टोबर 2015 रोजी सुंदर पिचाई यांची ‌‘गुगल‌’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गेल्या काही वर्षात ‌‘गुगल‌’ने विविध सेवा देण्यात झपाट्याने वाढ केली आहे. जीमेल, क्लाऊड कॉम्प्युटिंग, व्हिडिओ शेअरिंग, ॲण्ड्रॉईड आणि क्रोमओएस, भाषांतर, फोटो स्टोरेज, व्हिडिओ टेलिफोनिक अशा एक ना अनेक सेवा देत यांनी हातपाय पसरले. जगभरात इंटरनेट वापराक्रते सर्वाधिक भेट गुगल सर्च आणि युट्यूबला देतात. यांच्यानंतरच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि चॅटजीपीटी यांचा क्रमांक लागतो.

गुगलचं डूडल : क्रीडाक्षेत्रातील विशेष घटना, तसेच सण, जयंती अशा जागतिक घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे गुगल जे काम करते, त्याला ‌‘गुगल डूडल‌’ म्हणतात. ‌‘डूडल‌’ म्हणजे ‌‘गुगल‌’च्या मुख्य पानावरील लोगोमध्ये केलेला सर्जनशील असा बदल. हे ‌‘डूडल‌’ चल किंवा अचल चित्रांच्या स्वरूपात असते.

डूडल काय काय दाखवतंय :
नेहमीप्रमाणेच ‌‘गुगल‌’ने आपल्यापुढे देखणी डूडल्स सादर केली आहेत. जानेवारीतील ‌‘गुगल डूडल‌’ अनेकदा वर्षाची सुरुवात, प्रजासत्ताक दिन किंवा महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठीचे असतात. 2026 मधले डूडल प्रजासत्ताक दिनी भारताची अंतराळ मोहीम, ‌’स्वच्छ भारत‌’ अभियान आणि क्रिकेट यांवर आधारित होते, तर फेब्रुवारी 2026च्या डूडलमध्ये ‌‘गुगल‌’ने हिवाळी ऑलिम्पिक आणि टी20 विश्वचषकासारख्या प्रमुख जागतिक कार्यक्रमांना स्थान दिले.

पहिले डूडल दर्शन : ‌’गुगल‌’ने पहिलं डूडल 1998 मध्ये प्रकाशित केले. ‌‘गुगल‌’चे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी ‌’बर्निंग मॅन‌’ कार्यक्रमासाठी आपण कार्यालयाबाहेर जात असल्याचे लोकांना कळवण्यासाठी, एक सोपा मार्ग म्हणून ‌‘डूडल‌’चा वापर केला होता. तेव्हापासून आजवर पाच हजारांहून अधिक डूडल्स प्रसिद्ध झाली आहेत. सगळ्यांच्या परिचयाच्या ‌‘पॅक-मॅन‌’ या संगणकीय खेळाचा 30वा वर्धापन दिनही, दि. 21 मे 2010 रोजी डूडलद्वारे गुगलने साजरा केला होता.

डूडलवर विषय कसे निवडले जातात : डूडल टीमला दरवष गुगल वापरकर्त्यांकडून, हजारो कल्पना मिळतात. आगामी काळातील डूडलचे विषय निश्चित करण्यासाठी, ‌‘डूडल‌’शी संबंधित गुगलचे आधिकारी एकत्र येत बैठका घेतात. त्या बैठकांत संशोधन, सांस्कृतिक सल्लागारांशी चर्चा, स्थानिक
तज्ज्ञांशी साधकबाधक चर्चा होते. त्यानंतर डूडल्सची एक सर्वसमावेशक वार्षिक यादी तयार केली जाते.

चला हिवाळी ऑलिम्पिकला :
सध्याचं हिवाळी ऑलिम्पिक इटलीतील मिलान आणि कोर्टिना डी‌’एम्पेजो या शहरांमध्ये, दि. 6 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये 92 देशांतील खेळाडू सहभागी होत असून, भारतानेही आपले खेळाडू पाठवले आहेत.

नवीनतम डूडल्स :
‌‘गुगल‌’ने तयार केलेले काही डूडल्स पुढीलप्रमाणे (1) 2026चं हिवाळी ऑलिम्पिक दि. 6 फेब्रुवारीला सुरू. (2) दि. 7 फेब्रुवारीच्या डूडलमध्ये, भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकाचा प्रारंभ दाखवण्यात आला. (3) हिवाळी ऑलिम्पिकमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आईस हॉकीचेही सादरीकरण करण्यात आले. (4) दि. 8 फेब्रुवारी रोजी उन्हाळी ऑलिम्पिकमधील स्नोबोर्डिंगचा खेळ डूडल्सवर होता. (5) फिगर स्केटिंगचा खेळ दि. 9 फेब्रुवारी रोजी होता. (6) स्की जम्पिंगच्या खेळाची ओळख दि. 10 फेब्रुवारी रोजी डूडल्सद्वारे गुगलने करून दिली होती.

थोडे विरोधही हवेत :
इटलीतील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा निषेधाची सुरुवात, इटलीतील लोकांनीच केली होती. विरोधकांचं म्हणणं होतं की, ही क्रीडा स्पर्धा पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या हितकारक नाही. आवश्यक गोष्टींसाठीच आपल्याकडे आर्थिअ चणचण असतानाच, सार्वजनिक पैसे अशा प्रकारे खर्च करण्यात काही अर्थ नाही. एका निदर्शकाने राष्ट्रीय सरकार आणि मिलानच्या महापौरांवर टीका करत, खेळांसाठी केलेल्या कामांचे वर्णन पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ नसल्याचे केले. एक निदर्शक म्हणतो की, इटलील सत्ताधीशांनी मिलान आणि लोम्बाड शहराचा कोणताही विकास केला नाही. उलटपक्षी, त्यांनी सामाजिक कल्याण, सार्वजनिक शाळा आणि आरोग्यसेवेचा निधी कमी केला. यजमान शहर मिलानमध्ये हिवाळी ऑलिम्पिकच्या विरोधात निदर्शनाच्या आयोजकांमध्ये, पॅलेस्टिनी समर्थककांचाही समावेश होता. यावेळी पॅलेस्टिनी समर्थकांनी इटलीतील पॅलेस्टिनी असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद हन्नून यांच्या सुटकेची मागणी लावून धरली. त्यांना डिसेंबरमध्ये ‌‘हमास‌’साठी लाखो युरो उभारल्याच्या संशयावरून, अटक करण्यात आली होती.

वादग्रस्त हेलमेट : इटलीतील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत युक्रेनचे खेळाडूदेखील सहभागी आहेत. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर सध्या युक्रेन-रशिया युद्धाचा हमखास उल्लेख होतोच. रशिया- युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रतिमा असलेले राखाडी हेल्मेट, युक्रेनच्या राष्ट्रीय संघाचा ध्वजवाहक असलेल्या हेरास्केविच याने घातले होते. या हेलमेटवर बंदी घालण्यात आली होती. हेरास्केविच याला फक्त काळी ‌‘दंडपट्टी‌’ लावण्याची परवानगीच देण्यात आली होती. हेरास्केविचच्या म्हणण्यानुसार, हेल्मेटमध्ये युक्रेनच्या लोकांचे चेहरे दिसत होते, ज्यांना सन्मानित करू इच्छित होता. या घटनेबद्दल कळताच युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी यांनी, त्यांच्या हेरास्केविचच्या कृतीचे कौतुक केले. युक्रेनचे पंतप्रधान युलिया स्वीरीडेन्को यांनीही, हेरास्केविच याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात अशी आजवर अनेक उदाहरणे नोंदवली गेली आहेत.

मिलानो-कोर्टिनात भारत :
भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची, इटलीच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून निवड झाली. बिंद्रासारखा महान भारतीय खेळाडूचे नाव प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये आहे, हा भारतासाठी एक अभिमानाचाच क्षण. तथापि, हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 110 सुवर्ण, 110 रौप्य आणि 110 कांस्यपदके मिळवली असताना, भारताने हिवाळी ऑलिम्पिकच्या इतिहासात एकही पदक जिंकलेले नाही. हे क्रीडा प्रशासनाने हिवाळी खेळांबद्दल सजगतेने बघण्याची गरज आहे. या आव्हानांना न जुमानता, अभिनव बिंद्रा जागतिक स्तरावर भारतीयांना प्रेरणा देत आहे. भारतीय ध्वज पुन्हा एकदा उंच फडकावल्याबद्दल आणि भावी पिढ्यांमध्ये आशा जागवल्याबद्दल अभिनव बिंद्राचं अभिनंदन!

हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदार्पण :
भारताने ऑस्ट्रियातील इन्सब्रुक येथे झालेल्या 1964च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी, एक सदस्यीय संघ पाठवला होता. हिवाळी ऑलिम्पिकमधला भारताचा हा पहिलाच सहभाग. भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू जेरेमी बुजाकोव्स्की हा होता, ज्याने अल्पाईन स्कीईंगमध्ये पुरुषांच्या डाऊनहिल स्पर्धेत भाग घेतला होता. तो त्यानंतर 1968च्या फ्रान्समधील ग्रेनोबल येथे झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्येही त्याने, भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, या दोन्ही स्पर्धांत तो अपयशी ठरला. पोलंडमध्ये बालपण घालवल्यानंतर जेरेमी बुजाकोव्स्की 1946 मध्ये, वयाच्या सातव्या वष त्याच्या पालकांसह भारतात आला होता. त्यांचे वडील एका पेट्रोलियम कंपनीत काम करत होते.

आजकालचा सहभाग : चार वर्षांपूव बीजिंग ऑलिम्पिक पदार्पण करणारा आणि अल्पाईन स्कीअर जागतिक क्रमवारीच्या आधारे पात्रता मिळवणारा आरिफ खान, हा उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक होता. त्याच्यासोबत क्रॉस कंट्री स्कीईंगमध्ये भाग घेणारा स्टॅनझिन लुंडुपही होता. लुंडुप भारतीय लष्करातील सहकारी स्कीअर मनजीतसोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर, उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी शहरात पोहोचला होता. याआधीचं हिवाळी ऑलिम्पिक बीजिंग येथे 2022 मध्ये झालं होतं आणि त्यात फक्त एक पुरुष अल्पाईन स्कीअर आरिफ खानचा समावेश होता. भारताला त्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत एकही पदक मिळाले नव्हते. चीनमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध म्हणून, पश्चिमेकडील अनेक देशांनी तेव्हा राजनैतिक बहिष्काराची घोषणा केली असताना, भारताने बहिष्कारात सामील होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोन्ही देश आणि रशिया यांच्यातील त्रिपक्षीय शिखर परिषदेत, भारताने चीनला पाठिंबा दिला. परंतु, जुलै 2020 मध्ये भारतासोबतच्या सीमा चकमकीतील चीनी सैनिक क्वी फाबाओला, चीनने मशालवाहक म्हणून नियुक्त केल्याने भारतानेही खेळांवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. खेळांचे अनावश्यक राजकारण केले जात असल्याचा दावाही भारताने केला होता, परंतु चीनने तो फेटाळला.

पीटी उषा मिलानोत :
पतीच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून, ‌‘भारतीय ऑलिम्पिक महासंघा‌’ची अध्यक्षा पीटी उषा भारतीय जोडीला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीतील मिलान येथे दाखल झाल्या आहेत. पीटी उषाचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे दि. 30 जानेवारी 2026 रोजी निधन झाले होते.

दोघांपैकी एकाचा लागला निकाल : शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या 10 किमी क्रॉस कंट्री स्कीईंगमध्ये, भारताचा स्टॅनझिन लुंडुप 104व्या स्थानावर राहिला. लुंडुपला अंतिम रेषा पार करण्यासाठी 28:26.7 सेकंद एवढा वेळ लागला. तो सुवर्णपदक विजेता नॉर्वेच्या जोहान्स क्लेबोपेक्षा 7:50.5 सेकंद मागे होता. दुसरा भारतीय जम्मू-काश्मीरचा आरिफ खान हा आता सोमवारी अल्पाईन स्कीईंगच्या स्लॅलम स्पर्धेत सहभागी होणार असून, पाहू तो काय करतोय!

भारत उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंदच्या काळापासून सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी काहीतरी पदके मिळवत आला आहे; परंतु हिवाळ्यातील ऑलिम्पिकचा दुष्काळ संपववण्यात आजपर्यंत कोणालाच यश मिळवता आलेले नाही. काही हरकत नाही, अजून चार वर्षांनंतर कोण दुष्काळ घालवतंय ते पाहू. त्यासाठी आतापासूनच त्यांना आपल्या सकारात्मक भावना व्यक्त करत राहू.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख,
पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704

Powered By Sangraha 9.0