CM Mohan Yadav : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हवेत डगमगले; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव थोडक्यात बचावले

    16-Feb-2026   
Total Views |
CM Mohan Yadav
 
मुंबई: ( CM Mohan Yadav )  राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचे नुकतेच विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या अपघातामुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामध्ये आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे थोडक्यात बचावले आहेत. यादव यांचे हेलिकॉप्टर हे हवेमध्ये असंतुलित झाले होते. त्यांच्या असंतुलित हेलिकॉप्टरचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर शनिवारी दिनांत १४ फेब्रुवारीला हवेत असंतुलित झाले होते. ते खंडवा येथील पंधाना येथे राज्यस्तरीय लाडली बहना योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रम संपल्यानंतर टेकऑफसाठी हेलिकॉप्टर हवेत वर आले, मात्र ते पुढे जाण्याऐवजी मागे सरकू लागले आणि काही क्षणांसाठी हवेत थांबले. पायलटने प्रसंगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उड्डाण केले. यानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव खंडवा येथून भोपाळसाठी रवाना झाले. रविवारी दिनांक १५ फेब्रुवारीला या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
असं होणं सामान्य आहे, कोणतीही चूक नाही
खंडवा एसपी मनोज कुमार राय म्हणाले की, अशी परिस्थिती सामान्य आहे आणि कोणतीही चूक नाही, तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचण निर्माण झालेली नव्हती. टेकऑफच्या वेळी हेलिकॉप्टर अपेक्षित दिशेऐवजी वेगळ्या दिशेला गेले, त्यामुळे ते त्याच्या निर्धारित मार्गावर परत फिरले. दरम्यान हवेत जास्त धूळ उडल्याने पायलटने वेग कमी केला आणि काही सेकंदातच हेलिकॉप्टर थोडे खाली आणून स्थिर केले. यानंतर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे भोपाळसाठी रवाना झाले.
 
या आधी अनेक दिग्गज नेत्यांचे अशाच विमान अपघातांमध्ये निधन झाले आहेत -
 
२०२६ : अजित पवार
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याच वर्षी २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झालं. स्पष्टवक्तेपणा आणि मिश्किल भाषणांसाठी ओळखले जाणाऱ्या अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले होते. राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली होती.
 
२०२५ : विजय रुपाणी
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे गेल्या वर्षी अहमदाबादजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. शांत, सौम्य नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या रुपाणी यांच्या मृत्यूने गुजरातचे राजकारण हेलावून गेले.
 
२०२१ : जनरल बिपिन रावत
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. भारतीय लष्करासाठी ही अत्यंत मोठी हानी ठरली. त्यांच्यासह पत्नी माधुलिका रावत आणि ११ जवानांनीही प्राण गमावले.
 
२०११ : दोरजी खांडू
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे तवांगजवळ हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले होते. सीमावर्ती प्रदेशातील विकासकामांवर भर देणारे खांडू यांच्या जाण्याने उत्तर-पूर्वेतील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
 
२००९ : वाय.एस.आर. रेड्डी
आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी हेलिकॉप्टर अपघातानंतर नल्लामला जंगलात मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या अकाली निधनाने आंध्रचे राजकारण ढवळून निघाले.
 
२००१ : माधवराव सिंधिया
मध्य प्रदेशातील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे मैनपुरीजवळ विमान कोसळून निधन झाले.
 
१९८० : संजय गांधी
भारताचे तरुण आणि महत्त्वाकांक्षी काँग्रेस नेते संजय गांधी यांचे दिल्लीतील सफदरजंगजवळ विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने काँग्रेसचे नेतृत्व समीकरणच बदलले.
 
१९६६ : होमी भाभा
भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक आणि जागतिक कीर्तीचे अणुभौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाइट १०१ च्या अपघातात निधन झाले. जिनेव्हा हवाई नियंत्रणातील चुकीच्या संपर्कामुळे विमान माँट ब्लँक पर्वतरांगांवर कोसळले.
 
हवाई सुरक्षेवर पुनर्विचाराची गरज
देशातील या अपघातांचा मागोवा घेतला असता अनेकदा हवामान, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुका हे घटक समोर आले आहेत. मात्र, सर्वच घटनांचा एक समान धागा म्हणजे अनुभवी, परिणामकारक आणि देशहितासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना अकाली गमावणे.अजित पवार यांच्या निधनानंतर या मुद्द्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. हवाई सुरक्षा, उपकरणांचे आधुनिकीकरण आणि व्हीआयपी उड्डाणांसाठीच्या प्रोटोकॉलचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाल्याचं बोलले जात आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.