शिक्षणमयी शारदा

Total Views |

समाजाच्या हितासाठी झटत, तन-मन-धनाने समाजाची सेवा करत शिक्षण, समाजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शारदा दातीर-पाटील यांच्याविषयी...

पुण्यासारख्या शिक्षणाच्या पंढरीतही काही कथा अशा असतात, ज्या पुस्तकांत नाही, तर माणसांच्या जगण्यात लिहिल्या जातात. कोथरूडच्या साध्या घरातून सुरू झालेली शारदा विनोद दातीर-पाटील यांची शिक्षणक्षेत्रातील वाटचाल, माणुसकी, जिद्द आणि कृतज्ञतेची जिवंत कहाणीच ठरते. ज्या शिक्षणाने त्यांना उभं केलं, त्याच शिक्षणाला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा त्यास त्यांनी घेतला.

शारदा यांची घरची परिस्थिती अत्यंत सामान्य. जे नाही त्यासाठी दुःख करण्यापेक्षा, जे आहे त्यात समाधान शोधण्याची सवय शारदा यांना लहानपणापासूनच होती. शारदा यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण ‌‘राजश्री शिवराय प्रतिष्ठान‌’च्या शाळेत झाले.

घरातील आर्थिक चणचणीमुळे नववीत असतानाच शारदा यांना शाळेचे वार्षिक शुल्क वेळेवर भरता आले नाही. घरात दोन भाऊ आणि शारदा असे तिघांचे शिक्षण सुरू होते. शुल्क थकल्यामुळे शारदा यांना सर्व वर्गासमोर उभं करून मुख्याध्यापकांनी बोलावले. रडत रडतच त्यांनी मुख्याध्यापकांना घरची परिस्थिती सांगितली. इथेच त्यांना माणुसकीचे दर्शन झाले. त्यांच्या मुख्याध्यापिका संध्या यांनी परिस्थिती समजून घेत; शारदा यांना जवळ घेऊन धीर दिला. “त्या एका आधाराने मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली,” असे शारदा आजही सांगतात. आज शारदा स्वतः शाळा चालवतात. जेव्हा कोणीही पालक अथवा विद्याथ आर्थिक समस्या मांडतो, तेव्हा शारदांना त्या प्रसंगाची आठवण होते. त्यामुळे त्या मुलांना आणि पालकांना आईच्या मायेने आधारही देतात.

पुढे कला शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यावर, शारदा यांचे लग्न विनोद दातीर यांच्याशी झाले. विनोद हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना दोघांच्या मनात एकच विचार रुंजी घालत होता तो म्हणजे, शिक्षण केवळ अभ्यासापुरतं मर्यादित न राहाता व्यक्ती घडवणारे असावे!

दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर, उभयतांनी स्वतःची पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. 2010 साली ‌‘गुरुकुल एज्युकेशन फाऊंडेशन‌’च्या माध्यमातून, पुण्यात धनकवडी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. सुरुवात अवघ्या सात-आठ विद्यार्थ्यांपासून झाली. कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसतानाही, केवळ विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर ही शाळा उभी राहिली. शिक्षणासोबत भाषा, संस्कृती आणि संस्कारांवर भर देणाऱ्या या शाळेने, लवकरच पालकांचा विश्वासही जिंकला. दोन वर्षांतच विद्यार्थ्यांची संख्या 200 हून अधिक झाली आणि 2012 मध्ये ही शाळा, सर्वाधिक पटसंख्या असणाऱ्या शाळांपैकी एक ठरली.

यानंतरही दातीर दाम्पत्याची समाजकार्याची क्षुधा तृप्त झाली नव्हती. एकदा राजगडावर गेल्या असताना, पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांनी शारदा यांचे मन अस्वस्थ केले. दारिद्य, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या हे सगळं त्यांनी पाहिले. पुढे पुन्हा मुळशी तालुक्यातील पौड इथल्या आदिवासी पाड्यावर गेल्यानंतर, वास्तव अधिक ठळकपणे समोर आले. या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचीच वानवा होती. बालमातांचे प्रमाण अधिक होते, महिलांच्या आरोग्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. हे पाहून शारदा यांनी या वस्त्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

वस्तीमध्ये स्वीकार मिळावा म्हणून त्यांनी एक हृदयस्पश मार्ग निवडला, तो म्हणजे वस्तीतील लहान मुलांचा सामूहिक वाढदिवस! दिवाळीत हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी, त्यासोबत धान्यवाटपही केले. सुरुवातीला अविश्वास, अपमानाचे प्रसंगही त्यांच्या वाटेला आले, पण शारदा मागे हटल्या नाहीत. याच काळात त्यांच्या शाळेतून, ‌’माणुसकीची आनंद कुटी‌’ हा उपक्रम जन्माला आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून, त्या वस्तू गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले. आश्चर्य म्हणजे, पालकांनीही ते मनापासून स्वीकारलं. गेली 11 वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. जमा होणाऱ्या वस्तू आदिवासी पाड्यांवर पोहोचवल्या जातात.

शारदा या शिक्षण, समाजकार्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. त्या ‌‘गुरुकुल एज्युकेशन फाऊंडेशन‌’ यांच्या सहसंस्थापिका असून, ब्लूमिंग बड्स नर्सरी स्कूलच्या संचालिका व मुख्याध्यापिका म्हणूनही कार्यरत आहेत. महिलांना आनंद, आत्मविश्वास व प्रेरणा देणाऱ्या ‌‘प्रेरणा‌’ व्यासपीठाच्याही त्या संस्थापिका आहेत. मुळशी तालुक्यातील माले गावच्या त्या पोलीस पाटील असून, पुणे जिल्हा महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत. आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू असते. “आज या वस्त्या माझं कुटुंब झालं आहे,” असं शारदा अभिमानाने सांगतात. या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी शारदा यांना, पुणे महानगरपालिकेसह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शारदा जेव्हा आदिवासी पाड्यावर जातात, तेव्हा त्यांना आज आदिवासी समाजातील लहानथोरांकडून प्रेमच अनुभवायला येते. त्यांच्या या माणुसकीच्या प्रवासासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.