पाकिस्तानचा नेपाळ होणार का? राष्ट्रपतींचे इस्लामाबाद येथून पलायन..

15 Feb 2026 19:59:53
मुंबई : पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. शनिवारी रात्री कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ हिंसक निदर्शने झाली. यामध्येच पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली जरदारी अचानक इस्लामाबाद सोडून एका खाजगी विमानाने दुसऱ्या शहरात गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी निदर्शने होत असताना निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या घडामोडीमुळे इस्लामाबादमध्ये माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि आसिफा भुट्टो यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कराचीमध्ये, जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते 'कराचीला जगू द्या' अशी मोहिम काढत रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरातील खराब रस्ते, ड्रेनेज समस्या आणि पायाभूत सुविधांमध्ये त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारले तेव्हा निदर्शक संतप्त झाले. काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली.  

पोलिसांकडून लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमाव पांगला नाही तेव्हा त्यांनी लाठीमार केला. मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून १० जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे.

रावळपिंडीतील वातावरणही तणावपूर्ण
इम्रान खान यांना नवीन तुरुंगात हलवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. ते सध्या रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात आहेत. ही बातमी पसरताच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते तुरुंगाबाहेर जमू लागले. मोठ्या संख्येने लोक निषेध करत घोषणाबाजी केली.



Powered By Sangraha 9.0