
‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रचेतनेच्या महामंत्राला ‘जन गण मन’पूव संपूर्ण स्वरूपात सादर करण्याच्या केंद्राच्या निर्णयाने पुन्हा एकदा जुन्या वादांनी डोके वर काढले आहे. परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्यात स्वातंत्र्यवीरांच्या चेतनेचे प्रतीक ठरलेल्या या गीताचा इतिहास केवळ काव्यपरंपरेत मर्यादित नसून तो आंदोलन, त्याग आणि राष्ट्रभक्तीच्या भावविश्वाशी घट्ट जोडला गेला आहे. तथापि, त्यावरील आक्षेपांची परंपराही तितकीच जुनी. कधी धार्मिकतेच्या नावाखाली, तर कधी राजकीय समीकरणांच्या चौकटीतून या गीताचे अर्थ लावले गेले. साहित्यिक प्रतीकांची व्यापकता समजून न घेता, संकुचित दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या या वादांचा उगम नेमका का झाला? स्वातंत्र्ययज्ञातील या गीताचे प्रेरणादायी योगदान, सांस्कृतिक अधिष्ठान आणि समकालीन राजकारणातील त्याचे स्थान यांचा घेतलेला सखोल मागोवा...
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे दि. २८ जानेवारी या दिवशीचे जी. पार्थसारथी (जॉईंट सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) यांच्या ऑर्डरने निघालेले राष्ट्रीय गीताबद्दलचे पत्र, याच आठवड्यात प्रसिद्धिमाध्यमांमधून सर्वांपर्यंत पोहोचले. अपेक्षेप्रमाणे त्यावर उलटसुलट चर्चा आणि प्रतिक्रियाही येऊ लागल्या, विरोधाचे सूर आळवले जाऊ लागले. ‘वन्दे मातरम्’च्या संदर्भात हे काही नवे नाही. हे वर्ष ‘वन्दे मातरम्’चे १५१ वे जन्मवर्ष आहे. या दीडशे वर्षांत स्वातंत्र्यापूवची ७२ वर्षे व स्वातंत्र्यानंतरची 78 वर्षे ‘वन्दे मातरम्’ने अनेक विरोध सहन केले असून, त्या प्रत्येक विरोधातून ‘वन्दे मातरम्’ तावून-सुलाखून बाहेर आले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये भारतीय जनतेची ब्रिटिश सत्तेविरुद्धची युद्धगर्जना म्हणून गाजलेल्या ‘वन्दे मातरम्’ला, स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांनी उपेक्षेचीच वागणूक दिली. अलीकडे मात्र ही परिस्थिती बदलू लागली आहे. दि. ७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ आणि दिल्लीतील ‘वन्दे मातरम् गौरव’ कार्यक्रमानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांत घडवून आणलेल्या ‘वन्दे मातरम्’वरील चर्चेमुळे, पुन्हा एकदा ‘वन्दे मातरम्’चे देशव्यापी जागरण सुरू झाले. पुढे त्याच आठवड्यात केंद्र सरकारने ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ गायनाविषयी घेतलेला निर्णय ही ‘वन्दे मातरम्’च्या १५० व्या सार्धशती जयंती वर्षातील, अत्यंत महत्त्वाची व गौरवास्पद घटना ठरावी.
वैदिक वाङ्मय, संतांच्या रचना किंवा स्वातंत्र्यलढ्यातील काही साहित्य, जनसामान्यांनी केलेल्या मौखिक पाठांतरामुळे अखंडितपणे आजच्या पिढीपर्यंत पोहोचले. ‘वन्दे मातरम्’ हे असेच जनसामान्यांच्या मनातील त्याने मिळवलेल्या अत्युच्च स्थानामुळे कायमच तरले आहे व यापुढेही तरून जाणार आहे.
‘वन्दे मातरम्’वर पहिली बंदी बंगालच्या फाळणीनंतर दि. ८ नोव्हेंबर १९०५ रोजी, विभाजित बंगालचा गव्हर्नर फुल्लर याचा चिटणीस पी. सी. लोन याने एका परिपत्रकाद्वारे आणली. त्यानंतर पुढच्याच वष स्थापन झालेल्या ‘मुस्लीम लीग’नेही ‘वन्दे मातरम्’वर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात सन १९०१ पासून ‘वन्दे मातरम्’नेच होत असे. १९२३ मध्ये काकिनाडा येथील अधिवेशनात महम्मद अली यांनी, पं. विष्णू दिगंबर पलुस्करांना हे गीत गाण्यास विरोध केला. १९३७ मध्ये बॅ. जिनांनी ‘वन्दे मातरम्’वर संपूर्ण बंदी आणण्याची मागणी केली. त्याला उत्तर देण्यासाठी, रवींद्रनाथांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली शिवाय, आचार्य नरेंद्र देव, पं. नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांची पोटसमितीही नेमण्यात आली. या वादग्रस्त पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’ या गीताला आक्षेप न घेता, त्यातली पहिली दोन कडवी विनाअट मान्य करावी असे रवींद्रनाथांनी सुचवले. या घटनेमुळे ‘वन्दे मातरम्’च्या छेदनाला जबाबदार धरले जात असले, तरी रवींद्रनाथांसारख्याच व्यक्तीमुळे त्यावेळी पहिल्या दोन कडव्यांपुरते तरी ते वाचले. अन्यथा, ‘मुस्लीम लीग’च्या मागण्या मान्य करून, काँग्रेसकडून हे संपूर्ण गीतही रद्द होऊ शकले असते.
‘वन्दे मातरम्’च्या शेवटच्या कडव्यात, पहिल्या दोन कडव्यांत असलेल्या देवीच्या विविध रूपांच्या उल्लेखांमुळे मूर्तिपूजेचा आक्षेप घेत, मुस्लीम नेत्यांनी याला विरोध केला होता व त्यांचेच वंशज आजही विरोध करत आहेत. मौलाना रेजा उल करीम यांनी १९४४ मध्ये ‘बंकिमचंद्र ओ मुसलमान समाज’ नावाचे बंगाली पुस्तक लिहून, याचे खंडन केले होते. अगदी अलीकडेही ‘वन्दे मातरम् आणि इस्लाम’ या पुस्तकातून अरबिंदो मुजुमदारांनी आक्षेप खोडून काढले आहेत. ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामा’तील स्वातंत्र्यसैनिक, उर्दू- फारसी भाषांवर प्रभुत्व असणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री देवीसिंग चौहान यांनीही ‘वन्दे मातरम् आणि मुस्लिमांचा सिज्दा’ असा लेख १९७३ मध्ये लिहिला होता. प्रसिद्ध पत्रकार मुजफ्फर हुसेन यांनी ‘इस्लामची श्रद्धा आणि वन्दे मातरम्’, तसेच न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी ‘वन्दे मातरम् मुस्लीमविरोधी कसे’ असे २००६ मध्ये लिहिलेले लेखही गाजले होते. ‘वन्दे मातरम्’ची विविध भाषांतील भाषांतरे आणि २० पेक्षा अधिक अनुवादही झाले आहेत. त्यात सिमब अकबराबादी, भानू व अलीकडे अरीफ महम्मद खान यांनी उर्दूमध्येही ‘वन्दे मातरम्’चा अनुवाद केला आहे. याशिवाय, उर्दूतील ‘वन्दे मातरम्’चा पहिला अनुवाद ‘पयाम’ या वृत्तपत्राच्या दि. ७ ऑक्टोबर १९३७ रोजीच्या अंकात प्रकाशित झाला होता, तो काझी अब्दुल गफार यांनी केला होता.
‘वन्दे मातरम्’वरील ज्या ओळींमधले हिंदू देवीचे वर्णन मुस्लिमांना खटकते, त्यांनी एक काव्य म्हणून या गीताकडे प्रथम पाहायला पाहिजे. ‘वन्दे मातरम्’ ही कुठल्याही हिंदू देवतेची प्रार्थना किंवा स्तोत्र नाही, ते एक श्रेष्ठ रूपकात्मक काव्य आहे. कालिदास, ज्ञानेश्वरांपासून आजच्या अनेक सर्वभाषिक साहित्याने, अशी अनेक रूपकात्मक काव्ये लिहिली आहेत. एक साहित्यकृती म्हणून ‘वन्दे मातरम्’कडे पाहताना, त्यातील रूपकात्मक बाज ओळखण्यासाठी धर्माची, जातिभेदाची झापडे उतरवणे आवश्यक असते. धर्मप्रचारक साहित्याची जातकुळी वेगळी; परंतु निखळ सौंदर्यदृष्टी लाभलेल्या साहित्याचे अवलोकन करताना, असा दूषित दृष्टिकोन आडवा येणे चुकीचेच आहे. ‘वन्दे मातरम्’च्या बाबतीत नेमके हेच अनेक वर्षे घडते आहे.
‘वन्दे मातरम्’मधील रूपकात्मक भाग समजून घेतला, तर मुस्लिमांच्या आक्षेपांचे आपोआप खंडन होईल, त्यासाठी ‘वन्दे मातरम्’ची शेवटची तीन कडवी अभ्यासायला हवी. हिंदू धर्माचे नव्हे, तर ‘वन्दे मातरम्’चे श्रेष्ठत्व नेमके याच ओळींमध्ये आहे, हे समजून येईल. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे, तर अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मातृकापूजनास महत्त्व आहे. साने गुरुजींनी वर्णन केलेल्या ज्ञान-विज्ञानाला हृदयाची जोड देणाऱ्या सर्वसमावेशक अशा उदारमतवादी भारतीय संस्कृतीतील मातृपूजनाला, मातृभूमीच्या स्वरूपातील जगदंबेच्या पूजनाला, वंदन करण्याला विरोध असेल, तर तो विरोध भारतीय संस्कृतीला आहे, तो विरोध मातृभूमीसाठी हुतात्मा झालेल्या वीरांनाही आहे. या काव्यातील, या मंत्रातील रूपकात्मक असा भावच समजला नाही, तर या काव्याला असलेला त्यांचा विरोध तात्त्विक पातळीवर न राहता, द्वेषमूलक पातळीवर जातो. ‘वन्दे मातरम्’मध्ये व्यक्त केलेली आपली मातृभूमीवरील भक्ती अशी धर्माधिष्ठित, मूलतत्त्ववादी आणि आंधळी नाही म्हणूनच, अनेक हिंदू देशभक्तांप्रमाणेच अशफाकउल्ला खान, कुर्बान हुसेनसारख्या अनेक मुसलमान देशभक्तांनीही ‘वन्दे मातरम्’ची गर्जना करीतच फाशी स्वीकारली. तरीही, ‘मुस्लीम लीग’चा ‘वन्दे मातरम्’ला विरोध कायमच राहिला. स्वातंत्र्यापूवच चार वर्षे आधी ‘जन गण मन’ला पुढे आणण्याचे प्रयत्न पं. नेहरूंनी सुरू केले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीही नेमक्या राष्ट्रगीताचा निर्णय घेतला नव्हता. ‘घटना समिती’चे काम सुरू होऊन ‘संविधाननिर्मिती’च्या बैठकांमध्येही यावर वेगळी चर्चा घेतली नाही. दि. १४ ऑगस्ट १९४७ च्या उत्तररात्री व दि. १५ ऑगस्टच्या पहाटे या दिल्लीत झालेल्या मुख्य कार्यक्रमात, ‘जन गण मन’ व ‘वन्दे मातरम्’ ही दोन्ही गीते वाजवली गेली. भारतीय स्वातंत्र्यानंतर नियोजित राष्ट्रध्वजही त्यापूवच मंजूर केला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कायमच लोकांच्या मनात राष्ट्रगीताचे स्थान असणाऱ्या आणि या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय कामगिरी केलेल्या ‘वन्दे मातरम्’लाच राष्ट्रगीताचे स्थान मिळेल, याबद्दल कोणालाही शंका नव्हती. मधल्या काळात ‘घटना समिती’समोर मा. कृष्णराव फुलंब्रीकर, तसेच पं. वि. दे. अंभईकर यांनी ‘वन्दे मातरम्’च्या संगीतरचनांचे प्रात्यक्षिक सादरही केले होते. परंतु, पं. नेहरूंनी आधीच ‘जन गण मन’ निश्चित केल्यामुळे या विषयावर कोणतीही चर्चा किंवा मतदान न घेता, ‘घटना समिती’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी थेट निवेदन जाहीर केले. दि. २४ जानेवारी १९५० या दिवशी ‘घटना समिती’ची शेवटची बैठक झाली, त्यात डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले, “ ‘जन गण मन’ या शब्दांनी तयार झालेले गीत व संगीत हे भारताचे राष्ट्रगीत आहे. या गीतातील शब्दांत सरकारला वेळ पडेल, तेव्हा आवश्यक तो बदल करण्याचा अधिकार राहील. भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या ‘वन्दे मातरम्’ला, ‘जन गण मन’च्या बरोबरीने मान दिला जाईल आणि त्याची प्रतिष्ठा त्यासारखीच राहील. मला वाटते, सभासदांचे याने समाधान होईल.”
या निवेदनामुळे ‘जन गण मन’ला राष्ट्रगीत (नॅशनल ॲन्थेम) आणि ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) अशी मान्यता मिळाली. ‘घटना समिती’तील अध्यक्षांचे निवेदन, त्यावर चर्चा किंवा सदस्यांचे मतदान टाळणे हा सारा कटाचाच एक भाग वाटतो.
‘जन गण मन’ची योग्यता काय?
स्वातंत्र्यलढ्यात त्याचा उपयोग झाला होता काय? आणि ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रगीताचे स्थान नाकारण्याइतके गंभीर सांगीतिक दोष त्यामध्ये होते काय? हे प्रश्नही महत्त्वाचे ठरतील. खुद्द रवींद्रनाथ त्यावेळी हयात असते, तर त्यांनीही कदाचित ‘वन्दे मातरम्’लाच पाठिंबा दिला असता. कारण रवींद्रनाथ स्वतः कवी होते, संगीततज्ज्ञ होते आणि बंकिमचंद्र व ‘वन्दे मातरम्’ यांना त्यांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान होते.
राष्ट्रगीतासंबंधीचा अंतिम निर्णय आधीच ठरला होता. चर्चा किंवा इतर प्रात्यक्षिके हा फक्त देखाव्याचा भाग होता, असाच निष्कर्ष यातून निघतो. भारतीय संविधानानुसार, ‘जन गण मन’ राष्ट्रगीत; ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रीय गीत अशी शाब्दिक कसरत केली आहे.
आताही गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये ‘वन्दे मातरम्’चा उल्लेख ‘नॅशनल साँग’ असाच केला असून, ‘जन गण मन’च्या स्थानाला कुठलाही धक्का लावलेला नाही. ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ ही पूर्ण गीते पाच कडव्यांची असली, तरी त्यातील फक्त ध्रुवपद व पहिल्या कडव्यालाच राष्ट्रगीताचा मान आहे. आजच्या या आदेशामुळे सरकारी कार्यक्रमात, शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ तीन मिनिटे, दहा सेकंद एवढ्या कालावधीत ‘जन गण मन’पूव गायले जावे, अशी सूचना आहे. यात चित्रपटगृहांचा समावेश नाही.
चित्रपट सुरू होण्यापूव राष्ट्रगीताला ५२ सेकंदही लोक व्यवस्थित उभे राहू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तीन मिनिटे, दहा सेकंद हा कालावधी तर मोठा आहे. अनेक देशांची राष्ट्रगीते दीर्घ आहेत; पण आपल्याकडे सर्वसामान्यांमध्ये तीन मिनिटे स्तब्ध उभे राहण्याची मानसिकता होण्याची गरज आहे. ज्या देशातील संस्कृतीत योग, प्राणायाम आणि एकाग्रता शिकविणाऱ्या अनेक सांस्कृतिक रचना रुजलेल्या आहेत, त्या आपल्या देशात तीन मिनिटांची स्तब्धता ठेवून मानवंदना देण्याची गोष्ट रुजणे फारसे अवघड मात्र नाही. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सक्तीने हे साधणार नाही; परंतु ‘वन्दे मातरम्’विषयी मुळातच लोकांच्या मनात असणारे प्रेम, आदरभाव पुन्हा जागृत करणे हाच सर्वांत योग्य मार्ग आहे.
- मिलिंद सबनीस
(लेखक ‘वन्दे मातरम्’ या विषयाचे अभ्यासक व संशोधक आहेत.)
9422881783