सत्तेच्या मोहातूनच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा शरद पवारांचा डाव : भाऊ तोरसेकर

    15-Feb-2026   
Total Views |


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विशेषत: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. विशेषत: शरद पवार गटातर्फे विलीनीकरणावर जास्त भर असल्याचे दिसते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्याशी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने साधलेला संवाद...

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला कोणता सर्वात मोठा बदल जाणवतो?

समजा, एखादा टीव्हीचा कुठलाही भाग बिघडल्यास, त्याची सगळी व्यवस्थाच बिघडते. याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांमध्ये तयार झालेली, महायुतीची रचनाही आता बिघडली आहे. विरोधी पक्षातही राष्ट्रवादीचाच एक गट बसलेला असून, त्यांचीही तारांबळ उडाली आहे. त्यामुळे कुणाला काय करावे तेच कळत नाही. यादरम्यानच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे हा काहीसा विस्कटल्यासारखा प्रकार आहे. अजितदादा गेले; पण बाकीचे आहेत. त्यामुळे आतली गणिते बदलतात आणि त्याचा परिणाम सगळ्या राजकारणावरच होतो.

शरद पवार यांनी विमान अपघातानंतर हा घातपात नाही, असे म्हटले होते. पण, त्यांच्याच पक्षाचे नेते यावर शंका उपस्थित करताहेत, याकडे कसे बघता?

शरद पवारांनी केले ते बरोबरच आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, आपल्या देशात लक्षावधी अर्थशास्त्रज्ञ, युद्धशास्त्रज्ञ जन्माला आले. त्यामुळे शंकासुरांचा काही तोटा नाही. अपघात हा अपघात असतो. प्रत्येक अपघातात तुम्ही घातपात शोधायला लागलात, तर ‌‘नासा‌’ किंवा ‌‘इस्रो‌’ बंद करावे लागतील. कल्पना चावलाचासुद्धा अपघात झाला. ‌‘नासा‌’ ही काही एवढी गलथान कारभार करणारी संस्था नाही पण, त्यांचेही कुठेतरी गणित चुकतेच, हे एकदा लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे अशा शंका घेणे हा शुद्ध मूर्खपणाच असतो. आईन्स्टाईन म्हणतो की, ब्रह्मांड आणि माणसाचा मूर्खपणा अमर्यादित आहे. पुढे तो म्हणतो की, कदाचित माझी शंका ब्रह्मांडाविषयी चुकीची असेल. म्हणजे माणसाचा मूर्खपणा हा ब्रह्मांडापेक्षा मोठा असू शकतो. हे आईन्स्टाईन सांगून गेला, तर असल्या शंकासुरांबद्दल आपण काय बोलायचे?

अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावरुन, प्रचंड टीका झाली; तर काहींनी ही राजकीय अपरिहार्यता असल्याचे सांगितले. तुम्ही याकडे कसे बघता?

ती आवश्यकता होती म्हणून त्यांनी केले. त्यात काय चूक आहे? अनेकजण करतात. इंदिरा गांधींचा मृतदेह पडलेला होता. त्या मृत घोषितसुद्धा झाल्या नव्हत्या. जवळजवळ 11 तास त्यांचा मृतदेह पडलेला होता आणि त्यांच्या सुपुत्राने जाऊन, पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तीही अपरिहार्यताच होती. तेव्हा प्रत्येक गोष्टीत शंका काढणे या मानसिकतेतूनच, त्यातून टीका होते. अशावेळी पक्षाची जबाबदारी घ्यायला पुढे येणाऱ्या त्या महिलेचे, कौतुक केले पाहिजे. ती दुःखात असली तरी; पक्षाचा डोलारा सावरणेही अगत्याचेच होते. त्यामुळे ते मला चुकीचे वाटत नाही. ‌’कुछ तो लोग कहेंगे‌’ हीच आपली मानसिकता आहे. दुसरीकडे, ज्यांच्या डोक्यात अजितदादांच्या अपघातानंतर तयार झालेली काही समीकरणे, अशा कृतीमुळे विस्कटली गेल्याने ते देखील चिडून आरडाओरडा करणारच.

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उदय तुम्ही कसा पाहता? सहानुभूती, घराणेशाही की, रणनीती?

मला ती आता रणनीती वाटते. घराणेशाही वगैरे बोलण्यात आता काही अर्थ नाही. सगळ्यांना असे वाटते की, राजकारण ही एकप्रकारे आपली संपत्ती झालेली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, माझा बाप चोरला किंवा सगळ्या पक्षातील नेत्यांची मुलेसुद्धा निवडणुकीत उतरतात, कारण तो सोपा मार्ग आहे. त्यामुळे मला यात रणनीती वाटते. आता पक्ष सावरणे आवश्यक होते, नाहीतर पक्ष कुणी घेऊन जाण्याची भीती होती. अजितदादांच्या दोन्ही मुलांपैकी एक व्यवसायात आहे, तर दुसरा निवडणूक लढवल्यानंतर अज्ञातवासात गेल्यासारखा होता. त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी उचलली असेल, तर मला हे पाऊल रणनीतीचाचा भाग वाटतो.

सुनेत्रा पवारांचा प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभव मर्यादित आहे. अशा वेळी त्या अजितदादांचा राजकीय वारसा सांभाळू शकतील का?

नरेंद्र मोदी यांनी नगरसेवकपदाची निवडणूकसुद्धा लढवली नव्हती, तरी ते थेट मुख्यमंत्री झाले. आज नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात यशस्वी पंतप्रधान मानले जातात. अनुभव नाही या अटीवर गेलो असतो, तर आपल्या देशाला इतका चांगला पंतप्रधान मिळाला नसता. सचिन तेंडुलकर, गावस्कर, विराट कोहली पहिली मॅच खेळले, त्याआधी त्यांच्याकडे अनुभव नव्हता. अनुभव ही परीक्षा असते आणि कामाला लागल्यानंतर जर त्यांनी काम करून दाखवले, तर ते चमत्कार घडवू शकतात. उद्धव ठाकरे यांना ही संधी होती. त्यांनीही कधी निवडणूक लढवली नव्हती, नगरसेवकही नव्हते. जसे मोदी थेट मुख्यमंत्री झाले, तसेच उद्धव ठाकरेही थेट मुख्यमंत्री झाले. अनुभव नसल्यामुळे गडबड होईल, असे मला वाटत नाही. पण, उद्धव ठाकरे मला चुकीचे ठरवू शकतात. कारण मोदींनी हा एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे की, अनुभवाची गरज नाही, इच्छा पाहिजे. अनुभव कामातूनच येत जातो. त्यामुळे अनुभव त्यांच्या गाठीशी नाही याचा फार बाऊ करण्याची गरर्ज नाही, असे मला वाटत नाही.

अजितदादांच्या निधनानंतर अचानक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग का आला? विशेषत: शरद पवार गट विलीनीकरणाबाबत आग्रही का?

शरद पवारांचे आजवरचे सहा दशकांचे राजकारण बघितले, तर ते कायमच त्यांनी सत्तेची उब जवळ केली. त्यांना विरोधी पक्षाचे राजकारण कधी जमलेच नाही. त्यांनी दाखवायला नाटकी स्वरूपाची आंदोलने केली आहेतच; पण ते सतत सत्तेच्या वळचणीला राहिले. १९७८ मध्ये शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर, आठ वर्षे त्यांनी विरोधी राजकारण करून बघितले. काँग्रेसच्या बाहेर राहून विरोधी राजकारण केले, सत्ता आणायचा प्रयत्न केला; पण ते जमले नाही. तेव्हा आठ वर्षांनी म्हणजे १९८६ च्या ऑक्टोबर महिन्यात ते राजीव गांधींचे हात मजबूत करायला गेले. मी हत्तीला मजबूत करणारा माणूस अजून बघितलेला नाही. ज्यावेळी राजीव गांधींकडे ४००हून अधिक खासदार होते, तर शरद पवार आपले दोन खासदार घेऊन त्यांना मजबूत करणार म्हणजे नेमके काय? पण, त्यांची ती शैली आहे. ते आपल्या स्वार्थाला नेहमी राष्ट्रहित, समाजहिताची फोडणी घालतात. मग एकदा ती फोडणी झाली की, खायच्या वेळी फोडणीतला माल बाहेर टाकतात.

त्यामुळे विलीनीकरणाची खरी गरज शरद पवारांनाच आहे. कारण गेल्या 30-35 वर्षांतील या पहिल्या निवडणुका आहेत, ज्यात शरद पवारांच्या लोकप्रियतेचा ऱ्हास झाला आहे. दूरदूरपर्यंत सत्तेची शक्यता नसल्याने, सत्तेत बसण्याचा सोपा मार्ग म्हणजे राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण! मग, आपल्या मुलीला केंद्रात मंत्री करून सेटल करता येईल आणि दोन-चार निष्ठावंतांना राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये स्थान देत, सत्तेच्या उबेत परत एकदा येता येईल. त्यामुळे घाई शरद पवारांनाच आहे, सुनेत्रा पवारांना नाही.

विलीनीकरण झाल्यास भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? याबाबत शरद पवारांनी अजून स्पष्टता दिलेली नाही. याकडे तुम्ही कसे बघता?

शरद पवार कधी स्पष्ट असतात? आयुष्यात शरद पवार अमुकअमुक बोलले आणि ते अगदी शुभ्रस्पष्ट होते, असे कधीच नाही. ते दादा कोंडके यांच्या नंतरचे द्वयाथ बोलणारे आहेत. ते जे बोलतात, त्याचे शेकडो अर्थ निघतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला विलीनीकरणाची इतकी घाई आहे, तर मग सगळ्यात पहिले सर्वोच्च न्यायालयात जाऊन तुमची केस मागे घ्या. निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने अजितदादांचा पक्ष ‌‘खरा‌’ मानला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एक असल्याचे तुम्हाला मनापासून वाटते, तर त्याची सुरुवात तुम्हीच करा. पण, ते करायला तयार नाहीत. सगळी बाजू सुरक्षित करून मग विलीनीकरण पाहिजे, तर तसे होत नाही. माझ्या मते, शरद पवार किंवा त्यांच्या गटातील लोकांच्या बोलण्यावरुन त्यांना सत्तेचे फक्त फायदे हवे आहेत. बाकी विलीनीकरणाची भाषा हा धादांत खोटारडेपणा आहे.

राष्ट्रवादीचे आणि पवार कुटुंबीयांचे राजकीय भविष्य काय असेल?

तुमच्याकडे क्षमता नसेल तर तुम्ही टिकणार नाही. गावस्करचा मुलगा, सचिन तेंडुलकरचा मुलगा असो, ही मोठ्या बापाची मुलेही क्रिकेटमध्ये टिकली का नाही? कारण तिथे खेळावे लागते. इथे राजकारणात तुम्हाला तुमच्या पक्षाला जिंकून आणावे लागते. तुम्ही नुसते पक्षात बड्या नेत्याचे पोर आहात म्हणून टिकत नाही. स्वत:ला ब्रॅण्ड-ब्रॅण्ड जे म्हणतात त्यांना मला विचारावे वाटते की, गांधी ब्रॅण्डचे काय? गांधींची मुले, त्यांची नातवंडे आज कुठे आहेत? ब्रॅण्ड म्हणजे एक गुणवत्ता आणि एक मूल्यव्यवस्था असते. जर बाळासाहेबांची ती गुणवत्ता उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंमध्ये नसेल, तर ठाकरे हे नाव ‌‘लेबल‌’ आहे. ब्रॅण्ड खोक्याच्या आतला माल असतो. आपल्याला आता महापालिका निवडणुकीत मीडियाने इतका ठाकरे ब्रॅण्ड दाखवला; पण लोकांनी त्यावर विश्वास ठेवला का? परिवारामध्ये तुमच्याकडे ती क्षमता असली पाहिजे. तेव्हा पवार परिवाराचे भवितव्य काय आहे, हे आपल्याला कळते. रोहित पवार उडाणटप्पूपणा करतात, सुप्रियाताई शहाजोगपणा करतात, त्यामुळे ते राजकारणात टिकणार नाहीत. अजितदादा कितीही उर्मट माणूस वाटला, तरी त्यांनी ढोर मेहनत घेतली. सकाळी 6 वाजता उठून ते कामाला लागत होते. पवारांइतकी त्यांची क्षमता नसेलही; पण अजितदादांकडे जी मेहनत होती, त्याच्याबळावर ते इथपर्यंत आले. सुप्रियाताईंना पित्याच्या जीवावरच, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा लोकसभेत निवडून जाता आले. पण, वैयक्तिक नेतृत्वाची क्षमता त्यांनी दाखवली का? ती दाखवली असती, तर राष्ट्रवादी फुटलीच नसती. मूळ गोष्ट म्हणजे सुप्रियाताईंचे नेतृत्व राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांना मान्य नसल्यानेच, अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते सगळे नेते बाजूला झाले. इथेच कळते की, परिवाराच्या जीवावर नेतृत्व मिळत नाही. तुम्हाला कसोटीला उतरावेच लागते. सुनेत्रावहिनी काय करतात, आपल्याला अनुभव नाही. पार्थ पवारकडे अजून बघायचे आहे पण, सुप्रियाताई किंवा रोहित पवार यांच्यात पवार परिवाराला भवितव्य आहे, असे तरी मला वाटत नाही.

- अवंती भोयर

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....