जय सेवालाल, जय जय सेवालाल!

15 Feb 2026 13:31:33

शूरवीर आणि नीतितत्त्वांचे प्रेरणास्थान म्हणजेच संत सेवालाल महाराज होय! धर्म, ज्ञान, सत्य, करुणा आणि समाजजीवन याबद्दल त्यांचे विचार आजच्या काळातही पथदश आहेत. दि. 15 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे संत श्री सेवालाल महाराजांची जयंती. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्म-कर्माची शिकवण देत, समाजाला दिशा देणाऱ्या संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा घेतलेला मागोवा...

रोयती राज मळेनी,
जल्दी धासेती दाडो आटपेनी
कल्लोळ करो, केशुलानई मोरयो...

याचा अर्थ, रडगाणे गाऊन राज्य मिळत नसते. तसेच धरसोडवृत्तीनेही जीवनात यश मिळत नाही. यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. कष्टाशिवाय, समाजाच्या एकजुटीशिवाय, अन्यायाविरुद्ध प्रतिकार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, असा मंत्र संत सेवालाल महाराज यांनी समाजाला दिला. ‌‘निजाम‌’ असू दे की, त्यावेळी भारतात हळूहळू पाय रोवू पाहणारे इंग्रज असू देत, संत सेवालाल महाराजांनी या सगळ्या परकीय आक्रांतापुढे समाजाला कधीच मान खाली घालू दिली नाही. त्यावेळी निजामाने पशूंच्या चराईसाठी आणि स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या लाकूड सरपणासाठी समाजावर भारंभार कर लादला. इतरही अनेक प्रकारे त्याने समाजामध्ये अत्याचाराचे चक्र सुरूच ठेवले होते. अशा वेळी संत सेवालाल महाराजांनी या निजाम राजवटीविरोधात संघर्ष केला. या निजामाच्या अन्यायी राजवटीला विरोध करणे आणि तेही गैरमुस्लिमांनी तो करणे म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण. पण, संत सेवालाल महाराजांनी हे आव्हान हसत-हसत पेलले. निजामाच्या विरोधात समाज संघटित करत, मोठा संघर्ष उभा केला. समाजात चेतना जागवली. शाश्वत मानवी मूल्यांसाठी लढण्याची आणि समन्वय करण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली.

धर्म-सत्य : दया आणि सत्यज्ञान हे महाराजांच्या आत्मशक्तीचे प्रतीक होते. ते म्हणत की,

दया धरम री ओळख, क्रोध करे विनाश
माफी धरन जो सीखसी, पावे जीवन प्रकाश

म्हणजे, दया हीच धर्माची खरी ओळख आहे; क्षमाशीलतेने माणसाचे जीवन उजळते. शोषित-वंचित समाजघटकांप्रती त्यांची संवेदना शब्दातीत होती. त्यामुळेच धर्माची व्याख्या ते करताना म्हणतात की,

स्वार्थ छोड़ सेवा कर,
इच धरम री रीत
दुखिया जन री मदद कर, इच जीवन जीत

याचा अर्थ, स्वार्थ सोडून सेवा करणे हाच खरा धर्म आहे. समाजाची, गोरगरीब, वंचितांची सेवा करणे हा धर्म असून, या धर्माचे पालन समाजाने करावे, यासाठी त्यांनी समाजाला दिशा दाखवली. ही दिशा कालातीत आहे. धर्माचे पालन कसे करता येईल, याबाबत ते म्हणतात की,

सत रस्तो जो चालसी, न डरे कदे काल
सच अने धरम संग, होवे जीवन लाल


अर्थात, सत्याच्या मार्गावर चालणे महत्त्वाचे असून, या मार्गावर चालणारा कधीही घाबरत नाही. सत्य व धर्माचरणाने मानवी जीवन उजळते. मानवतेच्ो हे सत्य सेवालाल महाराजांच्या विचारांचे सार होते.

ज्ञान-शांती : संत सेवालाल महाराज यांच्या आयुष्यात धर्मकार्याला महत्त्वाचे स्थान होते. मात्र, तो काळ असा होता की, मुस्लीम आक्रांत आणि इंग्रज या दोघांमुळे समाजाची धार्मिक मूल्ये रसातळाला जाण्याची शक्यता वाढली होती.पण, संत सेवालाल महाराजांनी धर्म आणि संस्कारांची चौकट राखत, समाजाला जगण्याचे संदर्भ दिले. त्यावेळीही समाजाकडे अनुभवातून ज्ञान होतेच; पण समाजजीवनात प्रगती करणारे, नव्या दिशा देणारे ज्ञान ग्रहण करण्याची जाणीव करून देणे हेदेखील महत्त्वाचे होते. ही जाणीव संत सेवालाल महाराजांनी समाजाला करून दिली. समाजाने ज्ञानाची कास धरावी, असा उपदेश देताना ते म्हणतात की,

ज्ञान बिना अंधार से, मन फिरत उदास
विद्या जो अपनासी, होसी जीवन खास


अर्थात, ज्ञानाशिवाय मानवाचे जीवन अंधारमय होते. त्यामुळे जीवनात प्रकाश प्रज्वलित करायचा असेल, तर ज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. समाजात व्यापार-उदिमासाठी फिरत राहणाऱ्या समाजाने संघटित व्हावे. एकत्र वास्तव्य करून ज्ञान ग्रहण करावे, हा संदेश देणे समाजाची दिशा ठरवणारेच होते. त्याकाळीच काय, आजही मानवापुढे मन:शांतीचा मोठा प्रश्न आवासून उभा आहे. अनेक महापुरुषांनी ही शांती मिळवण्यासाठी विविध मार्ग सांगितले; पण सेवालाल महाराजांनी सांगितलेला मार्ग साधासरळ आहे. मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी महाराज म्हणतात,

मन मा मैल राखसी, शांती कदी न आवे
साफ दिल जो राखसी, देव त्यां वस जावे


म्हणजेच, मनात वाईट विचार असतील; तर मनाला शांततेची अनुभूती होणार नाही. मनात सत्कृत्य करण्याबाबतचे विचार असतील, तरच त्याला शांततेचा अनुभव मिळू शकेल. समाजाने सत्य, ज्ञान आणि सत्कृत्याची कास धरावी, यासाठी संत सेवालाल महाराज अखंड प्रयत्नशील होते.

मुक्या पशुप्रती करुणा विचार : मुक्या पशुपक्ष्यांबद्दलही त्यांच्या मनात अपार दयाभाव होता. त्यावेळीप्रमाणे अगदी अलीकडेदेखील पशू वृद्ध झाले किंवा बिनकामाचे झाले, तर ते निर्दयपणे खाटिकाला विकले जातात. संत सेवालाल यांनी समाजाला कळकळून सांगितले, ‌‘कसाईन गावढी मत वेचो‌’. अर्थात, ‌‘खाटिकाला पशू विकू नका.‌’ मुका प्राणी निःस्वाथपणे आपली सेवा करतो, आयुष्य खच घालतो आणि कसलीही दयामाया न दाखवता त्ाो पशू निकामी झाला की, क्रूरपणे मरण्यासाठी त्याला खाटिकाकडे सोपवतो, हे थांबवणे आवश्यक असल्याचे महाराजांनी म्हटले आहे. कसाई पशूंना तीळतीळ करत वेदनादायी मृत्यू देतात, यावरही महाराज म्हणतात, ‌‘हलालेरी बोटी मत खावो,‌’ म्हणजे हलाला केलेले मांस खाऊ नका. ते तर निजामालासुद्धा म्हणाले होते की, पशुहत्या करू नकोस. संत सेवालाल महाराजांना प्राणिमात्रांच्या संवेदनांची जाणीव होती, मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातल्या वेदना त्यांना जाणवत असत.

महिला सन्मान : आजही ‌‘मुलगी झाली हो‌’ म्हणत मुलींच्या जन्मावर नाक मुरडणारे लोक दिसतात. या पार्श्वभूमीवर 17व्या शतकात महिलांची परिस्थिती कशी होती? हे लक्षात येते. मात्र, संत सेवालाल महाराजांनी त्याकाळातही समाजातील महिलांचे जीवनमान उजळावे, यासाठी अविरत जनजागृती केली. समाजाला शिकवले की, जिवंत स्त्री ही देवीचे रूप असून, तिचा सन्मान केला पाहिजे. मुलींनाच देवी मानून त्यांचा भाव जपा, त्यांचे अहित करू नका, हा संदेशही महाराजांनी दिला. ते स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. मात्र, ही समानता अवाजवी नव्हती, तर समाजरचनेतील न्यायाला धरून होती. त्यांनी समाजात रुजलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध केला, तर देवदासी प्रथा, तसेच बालविवाह रोखण्याचेही काम केले. समाजातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी महिला शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहालाही कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. महिलांना सन्मानजनक जीवन जगता यावे, समाजात महिलांना सुखी-समृद्ध आणि समतेचे आयुष्य जगता यावे, यासाठीचे संत सेवालाल महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. आजच्या युगात संत सेवालाल महाराजांचे विचारकार्य पथदश आहे. ते आणि त्यांचे विचार समाजाचे रक्षण करतात, म्हणूनच प्रार्थना करू या,
जय सेवालाल... जय जय जय सेवालाल,

गाऊ तू बापू घोडेवाळो...
का सांभाळा बापू आई वाळो
जय सेवालाल, जय जय जय सेवालाल!

- योगिता साळवी
9594969638


Powered By Sangraha 9.0