वाड्यात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन; काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर कारवाईची मागणी

15 Feb 2026 16:20:15

वाडा : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने आज रविवार( ता.१५) रोजी भाजप पक्ष कार्यालय ते वाडा बसस्थानक दरम्यान निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

या आंदोलन प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हाउपाध्यक्ष संदीप पवार, उपनगराध्यक्ष मनीष देहेरकर, नरेश आकरे, जेष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, वाडा शहर मंडल अध्यक्ष स्वप्नील रोठे,कुडूस मंडल अध्यक्ष मोनिष पाटील, सोनाळे मंडल अध्यक्ष संतोष पाटील, सरचिटणीस अर्चना भोईर, महीला आघाडी अध्यक्षा अंकिता दुबेले, गटनेते रामचंद्र भोईर, नगरसेवक तेजस पाटील, नगरसेवक हर्षल खांबेकर, जनार्दन भोईर, कुणाल साळवी,अनंता वनगा, कांतीलाल गोरे,हेमंत पष्टे, सुरेश पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0