संघर्षरत बलुचिस्तान आणि पाकिस्तानपुढील वाढता पेच!

    15-Feb-2026   
Total Views |


बलुचिस्तानातील बंडखोर गटांनी ‌‘ऑपरेशन हेरोफ - फेज 2‌’च्या नावाखाली पाकिस्तानातील शहरी केंद्रे, लष्करी स्थळे आणि चीनच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत प्रकल्पांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांची एक मालिकाच सुरू केली आहे. यातून पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेतील उणिवा उघड झाल्या असून, लष्कर व गुप्तचर यंत्रणांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन होत आहे. ‌‘सेपेक‌’सारख्या चीनच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवरही याचा प्रत्यक्ष परिणाम दिसू लागला आहे. परिणामी, हा संघर्ष केवळ प्रादेशिक असंतोषापुरता मर्यादित न राहता, पाकिस्तानच्या अंतर्गत स्थैर्य, अर्थकारण आणि परराष्ट्र धोरणावर दूरगामी परिणाम करणारा ठरत आहे. या परिणामांचा आणि पाकिस्तानसमोरील आव्हानांचा घेतलेला आढावा...


बलुचिस्तान आज अशा ज्वालामुखीवर उभा आहे, ज्याचा स्फोट झाल्यास त्याचा हादरा संपूर्ण पाकिस्तानलाच हादरवून सोडेल. ‌‘बलुच लिबरेशन आम‌’ अर्थात, ‌‘बीएलए‌’ने सुरू केलेले ‌‘ऑपरेशन हेरोफ‌’ अर्थात, ‌‘ब्लॅक स्टॉर्म फेज-2‌’ हे केवळ काही बंडखोरीचे कृत्य नसून ती एका पद्धतशीरपणे आखलेल्या छुप्या युद्धाची प्रगत पायरी आहे.

‘ऑपरेशन हेरोफ फेज-2‌’ची रणनीती आणि बदलाचे वारे गेल्या दोन दशकांपासून बलुच बंडखोर डोंगराळ भागातून पाकिस्तानी सैन्यावर लहानलहान हल्ले करत होते. मात्र, ‌‘ऑपरेशन हेरोफ‌’च्या दुसऱ्या टप्प्याने या युद्धाचे स्वरूपच पूर्णपणे बदलून टाकले आहे.

अ) शहरी युद्धाचा उदय : पूव बलुच बंडखोर केवळ दुर्गम भागातच सक्रिय होते. मात्र, ‌‘फेज-2‌’मध्ये ‌‘बीएलए‌’ने क्वेट्टा, ग्वादर, मस्तुंग आणि कलात यांसारख्या शहरी केंद्रांना लक्ष्य केल्याचे दिसते. पाकिस्तानच्या शहरीभागाला लक्ष्य केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी तर मिळालीच, त्याचबरोबर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे अपयशही जागतिक समुदायाच्या नजरेत आले. एकाच वेळी दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये समन्वित हल्ले करणे, हे ‌‘बीएलए‌’च्या वाढलेल्या लष्करी क्षमतेचे द्योतक आहे.

ब) महिलांच्या आत्मघाती पथकांचा प्रभावी वापर : बलुच संघर्षात महिलांचा सहभाग हा सर्वात मोठा ‌‘गेम चेंजर‌’ ठरला आहे. ‌‘बीएलए‌’च्या ‌‘मजीद ब्रिगेड‌’ने आत्मघाती मोहिमांमध्ये ‌‘फियादीन‌’ म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांना सामील करून घेतले. शारी बलुच या सुशिक्षित महिलेने केलेल्या पहिल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हा ट्रेंड वाढताच राहिला. परिणामी, पाकिस्तानी लष्करासमोर एक वेगळाच पेच निर्माण झाला. पाकिस्तानात महिलांची शारीरिक तपासणी, ही बाब लष्करासाठी संवेदनशील असल्याने त्याचाच फायदा घेत, या फियादीन महिला सुरक्षा कडे भेदून हल्ले करत आहेत.

क) तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांचा वापर : ‌‘बीएलए‌’ने बंदुकांबरोबरच ड्रोन तंत्रज्ञान, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि प्रपोगंडा वॉरफेअरमध्येही प्रगती साधली आहे. त्यांच्या कारवायांचे व्हिडिओ अवघ्या काही तासांतच इंटरनेटवर प्रसारित होतात. त्यामुळे तरुण पिढीमध्ये या चळवळीबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण होत आहे.

‌‘सेपेक‌’ - संघर्षाचा केंद्रबिंदू

चिनी नागरिक लक्ष्य : ‌‘ऑपरेशन हेरोफ‌’अंतर्गत चिनी अभियंते आणि प्रकल्पांवर ‌‘बीएलए‌’च्या थेट हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, या हल्ल्यांमुळे चीनमध्ये कमालीची असुरक्षितता निर्माण झाली असून, चीनने आता उघडपणे पाकिस्तानला जाब विचारला आहे की, जर तुमचे सैन्य आमच्या नागरिकांना सुरक्षा देऊ शकत नसेल, तर आम्ही आमचे सैन्य का आणू नये? हा प्रश्न पाकिस्तानी लष्करासाठी अपमानजनकच आहे. ‌‘बीएलए‌’च्या ‌‘ऑपरेशन हेरोफ फेज-2‌’मुळे, चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर अर्थात, ‌‘सेपेक‌’ आणि पाकिस्तानातील अन्य चिनी गुंतवणुकीवर अत्यंत गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता वाढली आहे.

गुंतवणुकीचा वेग मंदावणे आणि प्रकल्पांना स्थगिती

चीनने ‌‘सेपेक‌’अंतर्गत सुमारे 62 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पाकिस्तानात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बलुचिस्तानातील वाढत्या हिंसाचारामुळे अनेक प्रकल्पांचे काम आज संथगतीने सुरू आहे. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे चिनी कंपन्या नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास कचरत असून, काही महत्त्वाचे ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आधीच रखडले आहेत.

ग्वादर बंदराची उपयुक्तता धोक्यात

‌‘सेपेक‌’ प्रकल्पाचे केंद्रबिंदू असलेले ‌‘ग्वादर बंदर‌’ हे बलुचिस्तानमध्येच आहे. चीनला या बंदराद्वारे अरबी समुद्रापर्यंत थेट पोहोचणे शक्य होणार असून, चीनची तीच इच्छाही आहे.

परिणाम : बलुच बंडखोरांनी ग्वादरला जवळपास घेराव घातला असून, स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांची आंदोलने आणि बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे हे बंदर आजही पूर्णक्षमतेने कार्यरत झालेले नाही. जर हे बंदर सुरक्षित झाले नाही, तर चीनची अब्जावधींची गुंतवणूक पाण्यात जाणार आहे.

विमा आणि सुरक्षेचा वाढता खर्च

बलुचिस्तानमध्ये काम करणाऱ्या चिनी कंपन्यांना आता कर्मचारी आणि प्रकल्पाच्या सुरक्षेसाठीही प्रचंड खर्च करावा लागत आहे.

आर्थिक फटका : चीनच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला आपल्या सैन्याची विशेष तुकडी तैनात करावी लागली आहे. त्यामुळे साहजिकच, त्याचा आर्थिक भार पाकिस्तानच्या आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. तसेच या वाढत्या धोक्यामुळे प्रकल्पांच्या विमा हप्त्यात वाढ झाली असून, त्यामुळे प्रकल्पांचा एकूण खर्च आवाक्याबाहेर जात आहे.

कर्जाचा विळखा अधिक घट्ट होणे

पाकिस्तानने ‌‘सेपेक‌’साठी चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली आहेत. जर बलुचिस्तानमधील अस्थिरतेमुळे हे प्रकल्प नफा कमवू शकले नाहीत, तर पाकिस्तानला कर्जाचे हप्ते फेडणेही अशक्य होणार आहे.

परिणाम : चीनकडून घेतलेले कर्ज पाकिस्तान फेडू शकला नाही, तर यामुळे तो अधिकच चीनच्या अधिपत्याखाली येईल किंवा त्याला आपल्या महत्त्वाच्या मालमत्ता (उदा. बंदरे किंवा खाणी) चीनच्या ताब्यात द्याव्या लागतील. यामुळे स्थानिक बलुच जनतेच्या रोषामध्ये आणखीच वाढ होईल.

चीनच्या ‌‘बेल्ट ॲण्ड रोड‌’ अर्थात, ‌‘बीआरआय‌’च्या प्रतिमेला धक्का ‘सेपेक‌’ हा चीनच्या जागतिक ‌‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह‌’ अर्थात, ‌‘बीआरआय‌’ प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. जर पाकिस्तानसारख्या जवळचा मित्र असलेल्या देशात चीन आपले प्रकल्प सुरक्षित ठेवू शकला नाही, तर इतर देशही चीनच्या गुंतवणुकीबाबत साशंक होतील. असे झाल्यास हा चीनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठाच राजनैतिक धक्का असेल.

पाकिस्तानी लष्कराच्या अपयशाची कारणे - एक सखोल विलेषण

इस्लामिक बंधुत्वाची संकल्पना वापरणारे पाकिस्तानी सैन्य आता बलुचिस्तानमध्ये बॅकफूटवर आले आहे.

भौगोलिक आव्हाने : बलुचिस्तानचे क्षेत्रफळ इतके अफाट आणि भूप्रदेश इतका दुर्गम आहे की, तिथे प्रत्येक कोपऱ्यावर सैन्य तैनात करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातच हे बलुच बंडखोर भौगोलिक संसाधनांचा वापर करून हल्ले करतात आणि डोंगरात दिसेनासे होतात.

स्थानिक जनतेचा वाढता पाठिंबा : कोणतेही बंड तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा त्याला जनतेचा पाठिंबा असतो. पाकिस्तानी लष्कराने लोकांचे अपहरण करणे आणि मारून फेकून देण्याचे धोरण राबवल्याने स्थानिकांचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आज बलुच घराघरांत पाकिस्तानी लष्कराप्रती शुद्ध तिरस्काराचीच भावना आहे.

राजकीय नेतृत्वाचा अभाव : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राजकीय नेतृत्व केवळ इमरान खान यांना रोखण्यातच व्यस्त आहेत. बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई करण्याशिवाय त्यांच्याकडे आजमितीला कोणताही राजकीय किंवा विकासाचा आराखडा नाही.

‌‘मिसिंग पर्सन्स‌’ आणि नागरी उठाव

बलुचिस्तानमधील वाढत्या असंतोषाचे एक मोठे कारण म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन. हजारो बलुच तरुण वर्षानुवर्षे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी काढलेला ‌‘लॉन्ग मार्च‌’ आणि माहंग बलोच यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाचा झालेला उदय हेच दर्शवते की, आता हा लढा केवळ शस्त्रांनी नाही, तर नागरी हक्कांच्या माध्यमातूनही लढला जात आहे. जेव्हा एखादे राष्ट्र आपल्याच नागरिकांना शत्रूसारखी वागणूक देते, तेव्हाच तिथे फुटीरतावादाची बीजे अधिक खोलवर रुजण्यास सुरुवात होते.

अफगाणिस्तान आणि प्रादेशिक प्रभाव

पाकिस्तानचा आरोप असतो की, ‌‘बीएलए‌’ला अफगाणिस्तानमधून रसद पुरवली जाते. यात काही अंशी तथ्य असूही शकते. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध आता पूवसारखे मधुर राहिलेले नाहीत. ‌‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान‌’ अर्थात, ‌‘टीटीपी‌’ आणि ‌‘बीएलए‌’सारख्या गटांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करणे अधिक सुलभ जात आहे. यामुळेच पाकिस्तानवर आता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याची वेळ आली आहे.

आर्थिक दिवाळखोरीचा धोका

जर ‌‘सेपेक‌’ प्रकल्पातील चिनी गुंतवणूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती त्यांना वाटते. बलुचिस्तानमधील अस्थिरता ही पाकिस्तानला एक अयशस्वी राष्ट्र बनवण्याच्या दिशेने नेणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे.

भविष्यातील शक्यतांचा अंदाज...

एका विशिष्ट टप्प्यावर गुप्तचर माहितीच्या आधारे (चीन किंवा अमेरिकेसह) एक संयुक्त हवाई आणि जमिनी मोहिमेची सुरुवात केली जाईल. यामध्ये मोठ्या संख्येने ‌‘स्वातंत्र्यसैनिक‌’ मारले गेल्याचे चित्र रंगवण्यात येईल. यामध्ये सुरुवातीला ‌‘टीटीपी‌’ आणि ‌‘बीएलए‌’कडून बचावात्मक पावले उचलली जातील. ते हल्ल्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरही करतील. परंतु, त्यानंतर त्यांच्या हल्ल्यांचे प्रभाव क्षेत्र पंजाब आणि कराचीपर्यंत पसरवतील. जर ‌‘तालिबान‌’ने मागे न हटता त्यांना आश्रय आणि शस्त्रे-दारुगोळा पुरवला, तर पाकिस्तान करता हा लढा अत्यंत प्राणघातक ठरेल.

निष्कर्ष

थोडक्यात सांगायचे, तर बलुचिस्तानमधील अस्थिरता ‌‘सेपेक‌’साठी ‌‘डेथ वॉरंट‌’ ठरू शकते. चीन सध्या ‌‘वेट ॲण्ड वॉच‌’च्या भूमिकेत आहे. जर पाकिस्तानने लष्करी दडपशाहीऐवजी राजकीय तोडगा काढून सुरक्षा प्रदान केली नाही, तर चीन आपली गुंतवणूक मर्यादित करेल किंवा पूर्णपणे थांबवेल. असे झाल्यास याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेवर आणि भविष्यावर होईल, हे निश्चित.

‌‘ऑपरेशन हेरोफ फेज-2‌’ हे पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. हा केवळ एका गटाचा हल्ला नसून तो शासन यंत्रणेच्या विरुद्ध केलेला उद्रेक आहे. जर पाकिस्तानने आपल्या धोरणात मूलगामी बदल केले नाहीत, तर बलुचिस्तानमधील ही ‌‘काळी वादळे‌’ पाकिस्तानच्या अखंडतेला कायमचा तडा देऊ शकतात. इतिहासात 1971 मध्ये जे पूर्व पाकिस्तानच्या (बांगलादेश) बाबतीत घडले, त्याची पुनरावृत्ती बलुचिस्तानमध्ये होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेवटी, कोणत्याही राष्ट्राचे अस्तित्व तिथल्या शस्त्रास्त्रांवर नाही, तर तिथल्या नागरिकांच्या समाधानावर अवलंबून असते. पाकिस्तानच्या हातातील वेळ वेगाने निघून जात आहे.

- हेमंत महाजन

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.