तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु...!

15 Feb 2026 12:58:15

भारतीय अध्यात्मपरंपरेत मन, बुद्धी आणि चित्त यांचे शुद्धीकरण हेच जीवनोन्नतीचे मूळ मानले आहे. सत्य, शुभ आणि शांती यांचा त्रिवेणी संगम साधणारे शिवतत्त्व, मानवी अंतःकरणाला प्रकाशमान करणारी प्रेरक शक्ती ठरते. चंचलतेतून स्थैर्याकडे, अहंकारातून निरहंकाराकडे आणि अज्ञानातून तेजस्वी जाणिवेकडे नेणारी ही अंतर्मुख साधना व्यक्तीला व्यापक विश्वाशी जोडते. भोगापेक्षा योग, स्वार्थापेक्षा सेवा आणि आसक्तीपेक्षा निःसंगता यांची जाणीव जागवणारे हे चिंतन जीवनदर्शक ठरते. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सत्य आणि सुंदर असलेल्या शिवस्वरूपाचे केलेले हे चिंतन...

यज्जाग्रतो दूरमुदैति देवं तदु सुप्तस्य तथैवैति |
दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ॥

वैदिक आणि उपनिषद ग्रंथातील अनेक मंत्रांत आत्मिक उत्थानासाठी केलेली प्रार्थना, भावस्वरूपात प्रकट झालेली दिसून येते. ‌‘शुक्ल यजुर्वेदा‌’तील 34व्या अध्यायाच्या आरंभी आलेल्या सहा मंत्रांचा शेवट हा, ‌‘तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु‌’ या ऋचेने झाला आहे. ‌‘शिवसंकल्पसूक्त‌’ अथवा ‌‘शिवस्तुती‌’ या नावाने शिवालयामध्ये या मंत्रांचा जागर होतो. या सहा मंत्रांत मनाची लक्षणे आणि वैशिष्ट्यता यांचा उल्लेख केला असून, माझे मन शांतिमय (शिव-शांती-सत्य-शुभ) विचार करणारे होवो, अशी प्रार्थना केली आहे. मंत्रात म्हटले आहे की, ‌‘यज्जाग्रतो दूरमुदैति‌’ म्हणजेच मानवी मन जागृत अवस्थेत दूर जाते आणि हेच मन सुप्तावस्थेत तसेच परत येते. ज्या मनाजवळ दूरपर्यंत जाण्याचे सामर्थ्य आहे, अशा ज्योतिर्मयासारखे (प्रकाशमान) माझे मन शांत, शुभ आणि कल्याणकारी विचारांनी युक्त व्हावे. मनाचे विचरण आणि संचार ही गोष्ट भौतिक बाब आहे, असे प्राचीन मंत्रद्रष्ट्या ऋषींचे मत नसावे. मनाचा संचार वैचारिक संसारात होत असतो आणि क्षणात हे मन कुठून कुठे जाते, हे कळतदेखील नाही. ‌‘ज्योतिर्मय‌’ या शब्दाचा संदर्भ ‌‘पंच ज्ञानेंद्रिय‌’ असा असून, त्यायोगे जगतातील विशिष्ट ज्ञान (विज्ञान) मनुष्याला प्राप्त होते. मनाला ज्योतिर्मय म्हटले असल्याने ते ज्ञानवाहक आहे. ज्ञानाच्या अभावाने अज्ञान नष्ट कसे होणार? मुळात ज्ञान हे सर्वत्र आहेच; परंतु अज्ञानाच्या अंधकाराने ज्ञानाचे अस्तित्वच समजून येत नाही. जेव्हा ज्योतिर्मय ज्ञानप्रकाश त्या अज्ञानरूपी काळोखावर पडतो, तेव्हा प्रकाशमान ज्ञानाचा आभास सर्वांना होतो.

‌‘यजुर्वेदसंहिते‌’तील मंत्र असलेल्या ‌‘तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु‌’ मध्ये, मनाच्या शुभसंकल्पाने युक्त होण्याची वैदिक प्रतिज्ञा आहे. शिवयुक्त मन शुभ विचारांचे, एकाग्रता आणि प्रसन्नतेचे अधिष्ठान आहे. शिवाचे तत्त्व आदर्श जीवनाचा परिपाठ आहे. शिव म्हणजेच सत्य आणि शुभ आदर्श जीवनात आल्यास, आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. शिवतत्त्व हे सृजनापासून संहारापर्यंत, म्हणजेच जीवनापासून मृत्यूपर्यंतचा विस्तारित प्रकाश आहे. शिव म्हणजेच प्रकृतीला प्राण देणारी ऊर्जा होय. शिवतत्त्व सत्याचे प्रकाशकिरण आहे, जे अनादी अंधकाराला छेदून हृदयस्थळातील मनाला प्रकाशमान करते. शिव सर्वमुक्त आहे, निःसंग आहे, अकिंचन आहे. कोणत्याही विषय बंधनात न बांधली जाणारी देवता म्हणजे शिव. सद्गुरू मनोहरनाथ महाराज शिवतत्त्वाचे वर्णन करताना म्हणतात,

विदेही न देही मी त्यागी न भोगी श्रीकृष्ण गोविंद मी शिव निःसंगी

अमृत सोडून विषपान शिवाचे सामर्थ्य असलेली शक्तीच करू शकते. रत्न, मणिहार सोडून विषारी नागांना शिवच धारण करू शकतो. श्रीराम आणि दशानन रावण दोघांनाही पूज्य शिवशक्ती आहे. शिव देवतांचे आराध्य आणि दानवांचे अधिष्ठान आहे. सुर-असुर, शुभ-अशुभ यातील सेतू म्हणजेच शिव होय. शिवतत्त्व एकाच वेळी परमशांती आणि शीतलता यांचे प्रतीक असलेला चंद्र भाळी धारण करतो आणि दुसरीकडे महाविनाशक विष निळकंठात धरतो. म्हणूनच, एकीकडे शिव हा सज्जनांसाठी सौम्यतादर्शक भालचंद्र आणि मानवतेचा विनाश होऊ नये म्हणून महाभयंकर रुद्र नीळकंठ, अशा दुहेरी रूपात भासतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक सुख आणि उपभोग यापासून दूर राहून, निःसंग राहण्याचा परिपाठ शिवतत्त्वदर्शन आहे. शुद्धता, पवित्रता आणि निरपेक्षता यांचा समन्वय म्हणजेच ‌‘शिवचरित्र‌’. मनात प्रेम आणि आत्मीयता असेल, तर समस्त जीवजगत आपले वाटायला लागते आणि मग अन्याय किंवा शोषण करण्याचा विचारही मनात येत नाही. सेवा आणि संस्कार शिवतत्त्वाचा गाभा आहे. अहंकाररहित जीवन कसे जगावे आणि आत्मिक सौंदर्य कसे वर्धिष्णू करावे, याचा वस्तुपाठ म्हणजेच शिवसंकल्प होय. हा शिवसंकल्पच मनुष्याला भोगातून योगाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि तिमिरातून तेजाकडे नेत असतो.

येनेदं भूतं भुवनं भविष्यत्परिगृहीतममृतेन सर्वम्‌‍ |
येन यज्ञस्तायते सप्तहोता तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ॥

हे मन भूत-वर्तमान-भविष्यकाळात जिथे काही नसेल तिथे, जिथे काही झाले नाही, तिथे आणि जिथे काही होऊ शकणार नाही अशा ठिकाणी पोहोचते. म्हणूनच म्हणतात, पंचप्राण, एक जीवात्मा आणि सातवे अव्यक्त रूप (सप्त होता) यांच्या माध्यमातूनच, विज्ञानरूप व्यवहार यज्ञमय व्यवस्थेने विस्तृत करता येतो. मात्र, त्यासाठी आमचे मन आणि चित्त शुभसंकल्पयुक्त असावे. शिवरात्री काळात जागरण केले जाते. जागरण म्हणजे मनुष्याने मनन करून, आपल्या अंतःकरणाला पवित्र (शिवस्वरूप) करणे. महाशिवरात्री म्हणजेच महत्त कल्याण करणारी रात्र होय. परंतु, ही कल्याण रात्र नित्य-निरंतर आमच्या जीवनात येत राहावी, यासाठी आमच्या मन, बुद्धी आणि चित्ताजवळ अज्ञान-अंधकाराला भटकू देऊ नये. त्यासाठी काम-क्रोधादी जंजाळातून मुक्त होऊन, वैदिकमार्ग प्रवर्तक होऊन शुभसंकल्पाला धारण करायला हवे. महाशिवरात्री हे विचारमंथनाचे महापर्व आहे. शून्यातून अनंताकडे आणि कूपमंडुकतेकडून विराटाकडे जाण्याची साधना म्हणजेच महाशिवरात्री होय. सद्गुरू मनोहरनाथ महाराज म्हणतात, ‌‘धर्म-अर्थ-काम-मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची साक्ष‌’.

जगद्गुरू तुकाराम महाराजही त्यांच्च्य गाथेत म्हणतात,
सत्य संकल्पाचा दाता नारायण | सर्व करी पूर्ण मनोरथ ॥

आपला संकल्प सत्यम्‌‍, शिवम्‌‍ आणि सुंदरम्‌‍ असेल, तर आपले मनोरथ नक्कीच पूर्ण होते. शुभ संकल्प हेच सिद्धीपर्यंत जाण्याचे सोपान आहे. मनुष्य जन्मातील पुरुषार्थ चतुष्टयाची यात्रा सुफळ संपूर्ण करण्यासाठी, महाशिवरात्रीला जागर करूया आणि म्हणूया,

तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु | तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ॥

- डॉ. भालचंद्र हरदास
(लेखक भारतीय शिक्षण मंडळाचे
नागपूर महानगर मंत्रीपदावर कार्यरत आहेत)


Powered By Sangraha 9.0