‌‘एजीआय‌’ - जेव्हा यंत्रांना मानवासारखी बुद्धी मिळेल!

    15-Feb-2026
Total Views |

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आता ‌‘एजीआय‌’ मानवी पातळीवरील सर्वसमावेशक बुद्धिमत्ता असलेली यंत्रणा ही विज्ञानातील संकल्पना, वास्तवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. विचार, विलेषण, निर्णय आणि सर्जनशीलता यांसारखी मानवी वैशिष्ट्ये यंत्रांकडे हस्तांतरित झाल्यास समाजव्यवस्था, रोजगाररचना आणि नैतिक मूल्ये यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. या नव्या तंत्रयुगातील संधी, संभाव्य धोके आणि त्यामागील सूक्ष्म बारकावे यांचा घेतलेला मागोवा...

रविवारची संध्याकाळ होती, जयंतराव बागेत बसून एक जुनी विज्ञानकथा वाचत होते. पुस्तकात अशा एका यंत्राचे वर्णन होते, जे माणसासारखे विचार करू शकत होते, कविता रचत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे निर्णयही स्वतः घेत होते. हे वाचून जयंतराव विचारात पडले. इतक्यातच, आदित्य तिथे आला.

जयंतराव : आदित्य, हे बघ या पुस्तकात काय लिहिलंय. हे लेखक 1960 मध्ये लिहीत होते की, भविष्यात यंत्रांना स्वतःची बुद्धी असेल. आपण आता ‌‘एआय‌’च्या गप्पा मारतो; पण सध्या ‌‘एआय‌’ तर आपण सांगू तेच करतो ना? मग, हे ‌‘स्वतःचं डोकं चालवणारं यंत्र‌’ कधी येणार?

आदित्य : आजोबा, तुम्ही अगदी योग्य विषयाला हात घातला आहेत. विज्ञानाच्या भाषेत याला ‌‘एजीआय‌’ अर्थात आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स असे म्हणतात. आता आपण जो ‌‘एआय‌’ वापरतोय, तो ‌‘नॅरो एआय‌’ आहे. पण ‌‘एजीआय‌’ ही ‌‘एआय‌’ची अशी पायरी आहे, जिथे यंत्र खऱ्या अर्थाने ‌‘मानवी‌’ बुद्धिमत्तेशी बरोबरी करेल. हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय नाही, तर तो मानवी उत्क्रांतीचाच एक टप्पा आहे.

‌‘नॅरो एआय‌’ विरुद्ध ‌‘एजीआय‌’ - फरक नेमका काय?

आदित्य : आजोबा, हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया . समजा, एक ‌‘एआय‌’ ‌‘बुद्धिबळ‌’ खेळण्यात जगातील सर्वोत्तम आहे. तो ग्रॅण्डमास्टरलाही हरवेल; पण जर तुम्ही त्याला विचारलं की, ‌‘आज पावसात बाहेर जाताना छत्री नेऊ का?‌’, तर तो गप्प बसेल. कारण, त्याची निर्मिती फक्त एकाच कामासाठी झाली आहे. याला म्हणतात ‌‘नॅरो एआय‌’. आपले ‌‘गुगल मॅप्स‌’ किंवा चेहऱ्याने फोन अनलॉक होणे, हे सर्व ‌‘नॅरो एआय‌’ आहेत.

याउलट, ‌‘एजीआय‌’ म्हणजे अशी बुद्धिमत्ता, जी कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित नसते, ती मानवी मेंदूसारखी अष्टपैलू असते. तो ‌‘एआय‌’ एकाच वेळी रॉकेट सायन्सवर संशोधन करेल, तुमच्यासाठी स्वयंपाकाच्या रेसिपी सुचवेल आणि तुमच्या आवाजातील थकवा ओळखून, तुम्हाला दिलासाही देईल. जो ‌‘एआय‌’ एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे ज्ञान हस्तांतरित करू शकतो, तो म्हणजे ‌‘एजीआय‌’.

‌‘एजीआय‌’चे सामर्थ्य - यंत्रांची शिकण्याची पद्धत

जयंतराव : पण आदित्य, माणसाला अनुभव असतो, तो चुकांमधून शिकतो. यंत्राला हे कसं जमणार?

आदित्य : आजोबा, ‌‘एजीआय‌’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की, ‌‘स्वयं-शिक्षण.‌’ सध्याच्या ‌‘एआय‌’ला आपण प्रचंड डेटा देऊन शिकवावं लागतं; पण ‌‘एजीआय‌’ला फक्त एखादं ध्येय दिलं की, तो ते पूर्ण करण्यासाठी स्वतःहून मार्ग शोधेल.

तर्कशक्ती : तो फक्त माहिती गोळा करणार नाही, तर तो ‌‘का?‌’ आणि ‌‘कसे?‌’ या प्रश्नांची उत्तरेही शोधेल.

नवनिर्मिती : ‌‘एजीआय‌’ केवळ जुन्या माहितीची जुळवाजुळवच करणार नाही, तर तो विज्ञानातील नवीन नियम शोधू शकेल किंवा कलेचा एखादा नवा प्रकारही जन्माला घालू शकेल.

अनुकूलन : नव्या आणि अनोळखी परिस्थितीत स्वतःमध्ये कसे बदल करायचे, हे देखील त्याला कळेल; जे सध्याच्या ‌‘एआय‌’ला जमत नाही.

मानवी जाणीव आणि यंत्रांची संवेदना

जयंतराव : पण, माणसाकडे जाणीव असते. त्याला सुख-दुःखाची भावना समजते. यंत्राला हे कसं जमणार? त्याला दया, माया किंवा राग येईल का?

आदित्य : हाच आजच्या विज्ञानातील सर्वात मोठा वाद आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, जाणीव ही केवळ मेंदूतील इलेक्ट्रिकल सिग्नल्सची प्रक्रिया आहे, जी भविष्यात यंत्रातही निर्माण करता येईल. पण, अनेक तत्त्ववेत्त्यांना वाटतं की, यंत्रांना ‌‘भावना‌’ असू शकतात; पण त्या केवळ गणितावर आधारित असतील.

‌‘एजीआय‌’ला कदाचित भूक लागणार नाही किंवा त्याला शारीरिक वेदना होणार नाहीत. पण, तो मानवी भावनांचे ‌‘पॅटर्न‌’ ओळखून, तशीच प्रतिक्रिया देण्यास सक्षम असेल. विचार करा, एखादी ‌‘एआय नर्स‌’ रुग्णाची काळजी घेताना केवळ औषधंच देणार नाही, तर रुग्णाच्या मानसिक स्थितीनुसार त्याच्याशी संवाददेखील साधेल. यालाच ‌‘इमोशनल एआय‌’ असे म्हणतात, हा देखील ‌‘एजीआय‌’चा महत्त्वाचा भाग असणार आहे.

‌‘एजीआय‌’चा प्रवास - आपण आता कुठे आहोत?

जयंतराव : म्हणजे हे सर्व आपल्या आयुष्यात घडताना दिसेल का?

आदित्य : अनेक जागतिक स्तरावरील तज्ज्ञांचे मते, आपण ‌‘एजीआय‌’च्या अगदी उंबरठ्यावर आहोत. सॅम ऑल्टमन किंवा एलॉन मस्क यांच्या मते, 2029 ते 2040च्या दरम्यान आपण ‌‘एजीआय‌’चा टप्पा गाठू शकतो. आता आपण पाहात असलेले ‌‘चॅटजीपीटी‌’ किंवा गुगल ‌‘जेमिनी‌’, हे ‌‘एजीआय‌’चे ‌‘बालपण‌’ म्हणता येईल. ही प्रारुपे हळूहळू तर्क करायला शिकत आहेत. जेव्हा एखादं यंत्र स्वतःसाठी नवीन ‌‘कोडिंग‌’ करू लागेल आणि स्वतःला अद्ययावत करेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‌‘एजीआय‌’चा जन्म होईल.

‌‘एजीआय‌‘ - वरदान की, मानवजातीचा अंत?

जयंतराव : आदित्य, हे ऐकायला रंजक आहेच; पण ‌‘टर्मिनेटर‌’ किंवा ‌‘मॅट्रिक्स‌’सारख्या सिनेमांची आठवणही त्याचवेळी येते आहे. जर यंत्र माणसापेक्षा जास्त हुशार झालं, तर ते माणसाचं ऐकेलच कशावरून? ते माणसालाच पृथ्वीसाठी धोकादायक मानून नष्ट करायला निघाले तर?

आदित्य : तुमची ही भीती जगभरातील मोठ्या वैज्ञानिकांनाही वाटते. यालाच ‌‘अलाईनमेंट प्रॉब्लेम‌’ म्हणतात. म्हणजे यंत्राची उद्दिष्टे आणि मानवतेची मूल्ये यांची सांगड कशी घालायची?

फायदे : ‌‘एजीआय‌’ कॅन्सर आणि अल्झायमर यांसारख्या रोगांवर काही दिवसांत उपचार शोधू शकेल. जागतिक हवामानबदलाच्या समस्येवर तो व्यावहारिकदृष्ट्या शक्य उपाय सुचवू शकेल.

धोके : जर ‌‘एजीआय‌’च्या हातात सत्ता आली किंवा त्याने मानवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जर त्याने ठरवलं की, ‌‘पृथ्वी वाचवण्यासाठी मानवाची संख्या कमी करणे आवश्यक आहे‌’, तर तो एक मोठा धोका असेल. म्हणूनच, सध्या ‌‘एजीआय‌’ विकसित करण्यापेक्षा तो ‌‘सुरक्षित‌’ कसा असेल, यावरच जास्त संशोधन सुरू आहे.

‌‘एजीआय‌’ आणि मानवी भविष्याचा फेरविचार

जयंतराव : म्हणजे मग, माणसाची बुद्धी आणि यंत्रबुद्धी, यामध्ये काहीच फरक उरणार नाही का?

आदित्य : एक मोठा फरक कायम राहील आजोबा ‌‘अंतःप्रेरणा!‌’ माणूस अनेकदा तर्क न लावता, फक्त मनाच्या आवाजावर निर्णय घेतो. ही गोष्ट यंत्रासाठी कठीण आहे. ‌‘एजीआय‌’ युगामध्ये माणसाला कामासाठी नाही, तर कल्पकता आणि मूल्यांसाठी ओळखलं जाईल. माणसाने यंत्राशी स्पर्धा करण्यापेक्षा यंत्राला आपलं कसं बनवायचं, हे शिकणं महत्त्वाचं ठरेल.

‌‘एजीआय‌’च्या दिशेने पडणारी आजची पावले
आणि त्याची निवडण उदाहरणे

आदित्य : आजोबा, ‌‘एजीआय‌’ अजून पूर्णपणे अस्तित्वात आलेला नसला, तरी 2025-26च्या काळात आपण त्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. याची काही थक्क करणारी उदाहरणे पाहा.

‌‘ओपन-एआय‌’चे ‌‘प्रोजेक्ट क्यू-स्टार‌’ : असे म्हटले जाते की, हा ‌‘एआय‌’ केवळ माहिती देत नाही, तर तो गणितातील अशी कोडी सोडवतो, जी त्याने आधी कधीच पाहिलेली नाहीत. हे ‌‘एआय‌’च्या तर्कशक्ती वाढवण्याच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल आहे.

‌‘गुगल‌’चे ‌‘जेमिनी 3‌’ : हा ‌‘एआय‌’ आता केवळ मजकूर लिहीत नाही, तर तो एकाच वेळी व्हिडिओ पाहू शकतो, कोड लिहू शकतो आणि एखाद्या मानवी साहाय्यकाप्रमाणे (एजेंटिक एआय) तुमची विमाने बुक करणे किंवा हॉटेल रिझर्व्हेशन करणे यांसारखी ‌‘मल्टी-स्टेप‌’ कामेही स्वतःहून पूर्ण करू लागला आहे.

वेबी वर्ल्ड आणि स्वायत्त ट्रक : कॅनडातील ‌‘वेबी‌’सारख्या कंपन्यांनी, ‌‘एआय‌’साठी एक संपूर्ण आभासी जग तयार केले आहे. तिथे ‌‘एआय ड्रायव्हर्स‌’ लाखो मैल चालून खऱ्या जगातील अनपेक्षित संकटांना कसं तोंड द्यायचं, हे स्वतःहून शिकत आहेत.

मानवाकृती रोबो : ‌‘टेस्ला‌’चा ‌‘ऑप्टिमस‌’ किंवा ‌‘फिगर एआय‌’ हे रोबोट्स आता केवळ फॅक्टरीत काम करत नाहीत, तर ते मानवी हालचालींचे निरीक्षण करून स्वतःहून नवीन कौशल्ये (उदा. कॉफी बनवणे किंवा वस्तूंची मांडणी करणे) आत्मसात करत आहेत.

ही सर्व उदाहरणे दर्शवतात की ‌‘एआय‌’ आता फक्त उत्तरं देणारं यंत्र राहिलं नसून, ते स्वयं-निर्णय घेणारं साधन बनण्याच्या वाटेवर आहे.

‌‘एजीआय‌’ युगासाठी तयारी कशी करावी?

आदित्य : आजोबा, ‌‘एजीआय‌’च्या युगात टिकण्यासाठी आपल्याला केवळ तांत्रिक शिक्षणाची गरज नसून, आपल्याला नीतिमत्ता आणि मानसिक लवचीकताही वाढवावी लागेल. आपण यंत्रांना ‌‘अति-मानव‌’ बनवण्यापेक्षा, आपण स्वतःला ‌‘उत्तम माणूस‌’ कसं ठेवतो, यावर भविष्यातील जगाचं स्वरूप अवलंबून असेल.

जयंतरावांनी आपले पुस्तक मिटले. त्यांना जाणीव झाली की, आपण एका अशा कालखंडात आहोत, जिथे विज्ञानातील कल्पनारम्य गोष्टी सत्यात उतरत आहेत.

जयंतराव : बरं झालं आदित्य, तू हे सर्व समजावून सांगितलंस. म्हणजे उद्या जर माझ्या लॅपटॉपने माझ्याशी स्वतःहून गप्पा मारायला सुरुवात केली आणि मला सल्ले द्यायला लागला, तर मी दचकणार नाही.

- डॉ. कुलदीप देशपांडे
9923402001