देशोदेशीचे वृक्ष हे तेथील मातीत रुजलेले असतात; पण भारतीय वृक्षांचे अनोखेपण म्हणजे ते येथील मातीबरोबरच येथील संस्कृतीतही रुजलेले आहेत. प्राचीन वाङ्मयात वृक्षांचे असंख्य उल्लेख सापडतात. वृक्षांंच्या औषधी गुणधर्मांचे विपुल उल्लेख आयुर्वेदातही सापडतात. वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, आंबा, आवळा, सुपारी, नारळ, कवठ हे तसे परिचित वृक्ष; पण नांद्रुक, पळस, पारिजातक, बकुळ, बहावा, साल, सोनचाफा अशा वृक्षांनादेखील सांस्कृतिक संदर्भ आहेत. अर्थात, याच्याशी सर्वसामान्यांचा परिचय असेलच असे नाही. प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ श्री. द. महाजन यांनी ‘सांस्कृतिक वृक्ष’ या पुस्तकात, अशा 30 वृक्षांचा रोचक परिचय करून दिला आहे.
प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस त्या-त्या वृक्षाची वनसंपत्ती म्हणून वैशिष्ट्ये, ती झाडे कोणत्या वातावरणात वाढतात; भारतात कोठे आढळतात; त्या वृक्षांची फळधारणा कधी होते; ते वृक्ष पानझडीचे आहेत की सदाहरित इत्यादी माहिती लेखक देतो. मात्र, पुस्तकाची खुमारी ही, प्रत्येक वृक्षाच्या औषधी गुणधर्मांच्या व सांस्कृतिक संदर्भांच्या परिचयात आहे. यातील बरीच माहिती वाचकांना नव्यानेच मिळेल यात शंका नाही. औषधी वनस्पती म्हणून अर्जुन वृक्षाची ख्याती सुश्रुतापासून असल्याची माहिती लेखक देतो. आपटा म्हणजे दसऱ्याला लुटले जाणारे सोने हे सर्वश्रुत आहेच; पण त्याच आपट्याला ‘अश्मन्तक’ हे एक नावही आहे. अश्म म्हणजे खडा आणि आपट्याच्या मुळांचा वापर, मुतखड्यांवर उपचार म्हणून केला जातो. आवळ्याला संस्कृत वाङ्मयात ‘वयस्था’ असे म्हटले आहे; म्हणजे वय वाढू न देणारे. आंब्याची हिरवी पाने वाळवून त्यांचे चूर्ण करून, विषारी प्राण्यांचा दंशावरील उपचारार्थ त्याचा वापर होतो. डांग्या खोकल्यासाठी उंबराचा चीक टाळूवर लावणे परिणामकारक ठरते. जांभूळ मधुमेहींमधील रक्तशर्करा नियंत्रित करते. थकवा, मूर्च्छा यावर नांद्रुक गुणकारी ठरते. पारिजातकाच्या पानांचा अंगरस साखरेबरोबर दिल्यास जंत मरतात. देवदारच्या तेलाचा वापर त्वचारोगावर केला जातो. बहावाच्या पक्व शेंगांमधील गर ‘सारक’ म्हणून काम करतो; सुपारीची पूड पोटाच्या तक्रारींवर गुणकारी ठरते. शमीच्या सालीची पूड कुष्ठरोगावर लाभदायी ठरते, असे अनेक उल्लेख लेखकाने केले आहेत. हे करताना लेखकाने वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांच्या ‘घरगुती औषधे’ या ग्रंथपासून, अगदी डॉ. वा. ग. देसाई यांचा ‘औषधी संग्रह’; ‘धन्वन्तरिनिघण्टुः’, वैद्य खडीवाले यांचे साहित्य; गॅझेटियर ऑफ बॉम्बे स्टेट असे अनेक अनुषंगिक संदर्भही दिले आहेत. त्यामुळे लेखकाच्या प्रतिपादनास वजन येण्याबरोबरच, प्राचीन भारतीय ज्ञानाचीदेखील प्रचिती येते.
या वृक्षांच्या औषधी गुणधर्मांबरोबरच, त्यांच्या सांस्कृतिक महत्त्वाचा परिचयदेखील अशाच वाङ्मयातून होतो. लेखकाने त्याचेही विपुल संदर्भ दिले आहेत. हे सांगतानाच लेखकाने अनेक गैरसमजदेखील दूर केले आहेत. उदाहरणार्थ, नारळाला आता ‘श्रीफल’ म्हटले जात असले, तरी संस्कृत वाङ्मयात नारळाचा उल्लेख कुठेही ‘श्रीफल’ असा करण्यात आलेला नाही. पण, ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी’ या न्यायाने तो उल्लेख होत असला, तरी प्राचीन वाङ्मयात आवळा व बेल या दोन वृक्षांनाच ‘श्रीफल’ म्हटले गेल्याची रंजक माहितीही लेखक देतो. मोहाच्या वृक्षाच्या दोन जाती आहेत. त्यांतील उत्तरेत आढळणारा मोह हा वन्य व पानझडीचा असून, दक्षिणेतील मोह सदाहरित असल्याचे लेखक नमूद करतो. तसेच मोहाला आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटले जात असल्याचा संदर्भही लेखक देतो. अर्जुन वृक्षाचा उल्लेख ‘वाल्मिकी रामायणा’त आहे. सीतामातेला रावणाने अशोकवनात बंदिवान म्हणून ठेवले असले, तरी प्रत्यक्षात सीतामातेला ज्या वृक्षाखाली ठेवले होते, तो मात्र अशोकाचा वृक्ष नव्हे, तर शिसवीचा होता. त्याचे कारण म्हणजे अशोक वृक्ष हे तुलनेने कमकुवत असतात, वादळवाऱ्यात उन्मळून पडतात. तेव्हा सीतामातेला अपाय होऊ नये म्हणून रावणाने तिला अशोकाच्या ऐवजी शिसवीच्या वृक्षाखाली ठेवले होते इत्यादी माहिती पुस्तकाची खुमारी वाढवते. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का लुटतात, याचा उलगडा करताना लेखक वरतंतू ऋषी व कौत्स या गरीब ब्राह्मण शिष्याची कथाही कथन करतो. त्या कथेचा संबंध अयोध्या व रघुराजाशी आहे, हेही नोंद घेण्याजोगेच. ‘श्रीगुरुचरित्रा’त दत्तात्रेयांचे निवासस्थान औदुंबराच्या तळी असल्याचा उल्लेख आहे. कदंब वृक्षापासून ‘कादंबरी’ नावाचे मद्य तयार होते व ते श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याचे अत्यंत आवडते पेय असल्याचा उल्लेख ‘हरिवंशा’मध्ये आहे. करंज वृक्षाचा उल्लेख ‘वाल्मिकी रामायणा’त आहे. ‘वाल्मिकी रामायणा’नुसार भारद्वाज मुनींच्या आश्रमानजीकच्या विविध जातींच्या वृक्षांमध्ये, कवठाचाही समावेश होता. अयोध्येत राजप्रासादाजवळ फणस, बकुळाचे वृक्ष होते. ककविकुलगुरू कालिदास यांच्या ‘कुमारसंभव’ महाकाव्यात पारिजातकाच्या पुष्पसौंदर्याचे वर्णन आढळते. ‘ऋग्वेदा’त पळसाचा उल्लेख आढळतो. ‘महाभारता’त ‘शांतिपर्वा’त बेलाचा उल्लेख आला आहे. वडाचा उल्लेख लेखकाने भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असा केला आहे; तर दक्षिणेत पिंपळ व कडुनिंब या वृक्षांचे लग्न लावण्याची प्रथा असल्याचेही लेखक सांगतो. चिंच हा परदेशी वृक्ष असल्याचा दावा लेखक सप्रमाण खोडून काढतो. संस्कृत वाङ्मयात चिंचेच्या झाडाचे अनेक संदर्भ सापडतात, हे त्याचे एक कारण; पण अरबांनी त्याचे नाव ‘तमार-ए-हिंद’ म्हणजे ‘भारतीय खजूर’ असे ठेवले व त्यावरूनच ‘टॅमरिंड’ हे इंग्रजी नाव आले. प्राचीन वाङ्मयातील संदर्भांबरोबरच लेखकाने काही ठिकाणी, अगदी अलीकडच्या काळातील साहित्यातील संदर्भ दिले आहेत.
लेखकाने हे पुस्तक मेहनतीने सिद्ध केले असून, संदर्भ-विपुलता हे त्याचे ठसठशीत लक्षण. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत त्याच वृक्षांबद्दलच्या सांस्कृतिक महतीचे दिलेले संदर्भ, भारतीय सांस्कृतिक एकात्मकतेचा परिचय घडवतात. मुख्य म्हणजे वृक्षांची पर्यावरणीय उपयुक्तता इत्यादी संकल्पना आधुनिक नसून, प्राचीन भारतीय संस्कृतीतही त्याचा विचार असल्याचा प्रत्ययच हे पुस्तक देते. लेखकाने वृक्षलागवडीसाठी, वृक्षशेतीसाठी या भारतीय सांस्कृतिक वृक्षांचा समावेश करावा, अशी व्यक्त केलेली अपेक्षा रास्त अशीच. लेखकाने यापैकी अनेक वृक्ष सध्या कुठे पाहायला मिळतात याचाही उल्लेख केल्याने, जिज्ञासूंना ते प्रत्यक्ष जाऊन पाहणेही सोयीचे होईल. 30 जातींच्या भारतीय वृक्षांचा हा सविस्तर परिचय वाचकांना या सगळ्या विषयाकडे वेगळ्या, नव्या दृष्टीने पाहण्यास नक्कीच उद्युक्त करेल.
पुस्तक : सांस्कृतिक वृक्ष
लेखक : श्री. द. महाजन
प्रकाशक : दीपक प्रकाशन, पुणे (9371020638)
पृष्ठे : 238
मूल्य : रुपये 400
- राहुल गोखले
9822828819