25व्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या माध्यमातून, भारतीय नाट्यविष्काराचा आगळावेगळा जागर आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. हा महोत्सव केवळ काही राज्यांपर्यंत मर्यादित राहिलेला नसून, जगाच्या सातही उपखंडांमध्ये साजरा होत आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या नाट्यकलेने मानवी मनाचा, समाजाचा अचूक ठाव घेतल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जागतिक राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात जसे वेळोवेळी राजकारणाचे संदर्भ बदलतात, त्याचप्रकारे कलेचा, अभिव्यक्तीचा संदर्भसुद्धा बदलत असतो. येणारी प्रत्येक नवीन पिढी नवा विचार लोकांसमोर मांडते, आपल्या भोवतालाचा वेगळा अन्वयार्थ लावते. याच पार्श्वभूमीवर समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांचे आवाज लोकांसमोर मांडले जावेत, यासाठी ‘भारत रंग महोत्सव’ हे सशक्त व्यासपीठ म्हणून पुढे आले.
दि. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये, मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर येथील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या संकुलात पहिल्यांदाच ‘भारत रंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या अनेक दिग्गजांचे पाय या मातीला लागले. होतकरू विद्यार्थ्यांसाठी, नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी तर होतीच, मात्र त्याचबरोबर आशयसंपन्न अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्वही अधोरेखित झाले. या महोत्सवातील काही कलाकृतींच्या माध्यमातून या महोत्सवाचा घेतलेला आढावा...
भारताला एका समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभल्याचे ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळी इथली संस्कृती इथल्या माणसांच्या दैनंदिन जीवनातील अभिव्यक्तीतून बहरली, असाच त्याचा अर्थ होतो. या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये ज्यावेळी कलेने प्रवेश केला, तेव्हाच खऱ्या अर्थाने सभ्यता जन्माला आली. या सभ्यतेने माणसांच्या जीवनाला अर्थ दिलाच मात्र, त्याचबरोबर इथला समाज नैतिक आणि जबाबदारीच्या चौकटीमध्ये घडवलाही. राजाचे कर्तव्य काय असावे इथपासून, ते जीवनामध्ये द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण झाल्यावर नेमकी निवड कशाची करावी यावर ऊहापोह करणारे संत, महंत, ऋषिमुनी याच मातीत होऊन गेले. भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्रा’च्या माध्यमातून एक आकृतिबंध, वस्तुपाठ इथल्या कलाकृतींना दिला. तेव्हापासून आजतागायत हा वारसा समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करून, एखाद्या खळखळणाऱ्या नदीप्रमाणे वाहतो आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक काळाचा त्या-त्या काळातील कलाकृतींवरती प्रभाव असतो, त्याच पद्धतीने काही कलाकृतींचा ठसा कायमस्वरूपी काळावर कोरला जातो. समाजाचे हात ज्यावेळेला अनिष्ट रूढी-प्रथांच्या साखळदंडांनी करकचून बांधले होते, त्यावेळेला संतांच्या रचनांनी मुक्तीचा मार्ग दाखवला. भारत देश ज्या क्षणाला इंग्रजांच्या गुलामगिरीत सापडला, त्यावेळेला या भारतवासीयांची चेतना जागृत करण्यासाठी ज्ञानवंतांनी लेखणीचा आधार घेतला. कलाविश्वाचा हा व्यापक धांडोळा घेण्यामागचे कारण म्हणजे, 25व्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या निमित्ताने सुरू असलेला नाट्यसृष्टीचा महाकुंभ.
इथे ‘महाकुंभ’ या शब्दाचे प्रयोजन केवळ गौरव किंवा स्तुती यासाठीच नसून, या महोत्सवाची व्यापक खोली लोकांना कळावी यासाठी आहे. मागच्या दोन दशकांहून अधिक काळ, भारतीय रंगभूमीवरती अत्यंत सक्षम कलाकृतींचे सादरीकरण होत आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली भाषा आणि संस्कृती संपली, असे निराशेचे ढग काहींच्या मनाभोवती दाटले होते. मात्र, काळाच्या ओघात परिवर्तनाचे कितीही प्रवाह आले, तरी जे-जे अस्सल आहे; आपल्या मातीशी जोडले गेले आहे, ते टिकून राहील याचीच प्रचिती यानिमित्ताने सगळ्यांना येत आहे.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या 25व्या भारतीय रंग महोत्सवाचे वैशिष्ट्य, वेगवेगळ्या पातळीवर समजून घ्यावे लागेल. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हा महोत्सव सध्या सुरू आहे. तब्बल 228 भाषा तथा बोलींमधल्या कलाकृती यावेळी रंगभूमीवर सादर होत आहेत. यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जगाच्या सातही उपखंडांमध्ये हा महोत्सव साजरा होत असून, भारतीय रंगभूमीच्या चेतनेचा आवाज यानिमित्ताने जगभरात निनादतो आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी, या महोत्सवाच्या सर्वसमावेशकतेवर जास्त भर दिला. रंगभूमीवर सादर होणारी नाटके म्हणजे केवळ प्रायोगिक आणि व्यावसायिक, तद्नंतर युवावर्गातील प्रयोगशील आणि सुप्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री यांच्याद्वारेच सादर केली जातात, असा प्रवाद आहे. मात्र, या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, बालरंगभूमीपासून ते वयोवृद्धांच्या नाट्यकृतींपर्यंत सगळ्यांना इथे स्थान आहे. सर्वसमावेशकतेचा हाच भारतीय विचार इथल्या लोकांना जोडून ठेवतो आणि त्याचबरोबर सर्जनाची प्रेरणासुद्धा देतो. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या माध्यमातून ज्याप्रकारे नाटकाला आणि सिनेमाला नव्या दमाचे कलाकार लाभतात; त्याचप्रकारे इथे सादर केली जाणारी नाटकेसुद्धा समाजमनावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारी असतात. लोकांचे मनोरंजन करणे एवढाच या नाटकांचा हेतू नसून, समाजाची जागृत अवस्था टिकून राहावी, यासाठी इथल्या नाट्यकृती प्रयत्नशील असतात.
‘तमस’ आणि नंतर...
भारताच्या जिव्हारी बसलेला फाळणीचा घाव काकणभर जास्तच वेदानादायी होता. एकाच क्षणात आपल्याच मुलखातील आपले बांधव माणुसकीच्या व्यवहाराला पोरके होतील, याचा विचार कोणीही केला नव्हता. मात्र, इंग्रजांची कूटनीती आणि धार्मिक कट्टरतावादाच्या पार्श्वभूमीवर अखेर ही फाळणी झालीच. ज्या घटनेने समाजाचे अंतरंग ढवळून निघाले आहे, तिचे पडसाद कलाकृतींवर उमटले नाही, तरच नवल! याच पार्श्वभूमीवर भीष्म साहनी यांनी ‘तमस’ ही कादंबरी लिहिली. ‘तमस’ म्हणजे अंधार. देशावर ज्याप्रकारे अंधाराची छाया होती, तद्वतच माणसाच्या अज्ञानातून उमटलेला अंधकार किती घातक असतो, याची प्रचिती या कादंबरीतून लोकांना आली. साहजिकच, नंतरच्या काळात या कादंबरीचे नाट्यकृतीत रूपांतर करण्यात आले. नाट्यकृती म्हणून तो संपूर्ण अवकाश उभा करणे, ही आव्हानात्मक गोष्ट होती. मात्र, तत्कालीन दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी हे आव्हान पेलले.
2026 मध्ये ज्यावेळी ही नाट्यकृती ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या विद्यार्थ्यांकडून सादर केली जाते, त्यावेळेला तिला अनेक संदर्भ चिकटलेले असतात. नाटक सादर करताना मूळ विचारांना धक्का लागेल, असे अनेक प्रसंग उभे राहू शकतात. मात्र, चित्तरंजन त्रिपाठी यांच्या नेतृत्वात सादर केलेल्या या नाट्यकृतीने, हे आव्हानदेखील लीलया पेलले. फाळणीच्या काळातील परिस्थिती आणि तत्कालीन समाजमनाच्या भावना कुठल्याही समाजघटकावर अन्याय होऊ न देता, अत्यंत ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत. या नाटकातील संगीत आणि प्रकाशयोजना ही प्रमुख बलस्थाने आहेतच. मात्र, त्याचबरोबर आपल्या अभिनयातून लोकांपर्यंत जो मर्मभाव कलाकारांनी पोहोचवणे अपेक्षित आहे, त्यातदेखील हा चमू यशस्वी झाल्याचे दिसते.
आहे चोर तरीही...
याच महोत्सवामध्ये जीन अनोई या फ्रेंच नाटककाराने लिहिलेले, ‘थीव्हज कार्निव्हल’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचा केवळ हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला नसून, कलाकृतीची स्थानिक बैठक जोपासल्याचेही आपल्याला बघायला मिळते. ‘कॉमेडी बॅलेट’ या प्रकारातील ही नाट्यकृती नृत्य, संगीत आणि विनोद यांच्या त्रिसंगमातून प्रेक्षकांच्या समोर येते. फ्रान्समधील एका वाड्यात घडणारे हे नाटक तीन चोर, श्रीमंत; तरीही कंटाळलेली वयोवृद्ध महिला (लेडी हरफ), तिच्या दोन भाच्या यांच्या भावाविश्वाभोवती पिंगा घालते. तीन चोरांचे लेडी हरफ यांच्याकडे राहायला येणे, त्यांचे खरे रूप ठाऊक असूनसुद्धा त्यांना वाड्यात आश्रय देणे, त्यातून आणखी एका बाप मुलाचा झालेला तळतळाट, लेडी हरफच्या मुलीवर आणि तिच्या संपत्तीवर डोळा ठेवून असणारी मंडळी, त्यातच लेडी हरफच्या मुलीचे आणि त्यातील एकाचे जमलेले प्रेम अशा सगळ्या जंजाळातून हे नाटक प्रेक्षकांना खदखदून हसवते. मात्र, त्याचबरोबर अतिश्रीमंत वर्गाचा लहरी स्वभाव, एकीकडे श्रीमंतांनी घातलेला सभ्यतेचा, तर दुसरीकडे चोरीसाठी चोरांनी घातलेला मुखवटा यातून, समाजातील लोकांच्या स्वभावावर ताशेरे ओढले गेले आहेत. प्रचंड ऊर्जा आणि सशक्त संगीत यांच्या संगमातून, ही नाट्यकृती लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
‘भारत रंग महोत्सवा’तील नाट्यकृतींचा धांडोळा घेतल्यास असे लक्षात येईल की, खऱ्या अर्थाने आपल्या वर्षाचा गौरव इथे होतो आहे. मात्र, त्याचबरोबर विविध विषय आत्मसात करून, नवा विचार देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो आहे. प्रेक्षकांचा या कलाकृतीला लाभलेला उदंड प्रतिसाद या यशाची पावती आहे, हेच खरे.
- मुकुल आव्हाड