
प्रख्यात शिवकथाकार, धर्मभास्कर विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज यांचे नुकतेच निधन झाले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच विविध धर्मग्रंथांचे ज्ञानामृत समाजाला देण्यासाठीच त्यांनी आजन्म अखंडतैलधाराव्रताप्रमाणे कार्य केले. त्यांच्या निधनाने प्रखर राष्ट्रभक्त, निष्काम कर्मयोगी आणि तपस्वी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्माचा विचार घराघरात पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्य खच घातले. त्यांच्या शिवचिंतनाचा आढावा घेणारा श्रद्धांजलीपर लेख...
जनभक्तीचे तुझ्यावरी नची उधाणले भाव |
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव ॥
जरी न गातील भाट डफावरी तुझे यशोगान |
सफल जाहले तुझेच रे हे तुझेच बलिदान ॥
‘राजा शंभूछत्रपती’मध्ये जेव्हा विजयराव लिहितात, तेव्हा त्या शेवटच्या ओळीतील शब्दात छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचे जणू सार असते.
माझ्या आयुष्यात सर्वात पहिले वाचलेले शंभूचरित्र म्हणजे, शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे ‘राजा शंभूछत्रपती.’ या एका संदर्भग्रंथाने आयुष्यात लेखक म्हणून उभे केले आणि विजयरावांच्याच पावलावर पाऊल टाकून, छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र अभ्यासाला घेतले. पुढे अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करत, शंभूछत्रपतींवर एक कादंबरीचे लिखाणही केले. माझ्या आयुष्यात मी राजवाडे पाहिले नाहीत, वा. सी. बेंद्रेही पाहिले नाहीत, डॉक्टर कमल गोखलेही पाहिल्या नाहीत; परंतु मी विजयराव देशमुख बघितले. त्यांच्या मनातील शंभूछत्रपतींच्या इतिहासाला जगासमोर आणण्याची तळमळ मला जाणवली.
आपल्या मित्रासोबत ऐतिहासिक संग्रहालयात गेल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या धिंडीचे समकालीन चित्र बघून, त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू न कळत आमच्याही डोळ्यात तरळलेच होते. तसा विजयरावांना भेटण्याचा क्षण आयुष्यात एकदाच आला. परंतु त्या एका क्षणाने आणि दर्शनाने एक मात्र जाणीव करून दिली की, इतिहास अभ्यासाची एक मोठी शृंखला आपल्या पिढीच्या पाठीशी असून, आता कर्तव्य म्हणून ती नव्या पिढीच्या खांद्यावर आली आहे.
‘शककर्ते शिवराय’ हे ससंदर्भ शिवचरित्र लिहिणारे विजयराव देशमुख शंभूछत्रपतींचं एक विमोचन करताना लिहितात की, छत्रपती शंभूराजांचे श्रेष्ठत्व कशात आहे? ‘त्यांनी धर्मासाठी बलिदान केले, हे त्यांचे श्रेष्ठत्व’ अशी सर्वसाधारण धारणा त्यांच्याविषयी असल्याचे सर्वत्र दिसते. पण, कुठल्या धर्मासाठी त्यांनी बलिदान केले? छत्रपती शंभूराजांनी ज्या धर्मासाठी बलिदान केले, तो शिवाजीराजांनी सांगितलेला ‘राष्ट्रधर्म’ होय. पुण्यलोक शिवाजी महाराजांनी आग्राभेटीत रामसिंह व अन्य राजपूत व जे-जे त्यांच्या संपर्कात आले, त्यांना हाच राष्ट्रधर्म सांगितला. एकात्म राष्ट्रभाव जागवत सुसंघटितपणे शक्तीसंपन्न होऊन, परकीय मुघलांच्या गुलामगिरीतून ‘अहद तंजावर ते तहद पेशावर’ संपूर्ण देश स्वतंत्र करणे, हाच तो खरा ‘राष्ट्रधर्म’!
उत्तरेतील राजपुतांनी एकत्र येऊन मराठ्यांना एकदिलाने साथ दिली तर हे कार्य सहजशक्य आहे, असे महाराजांचे आर्जवी सांगणे होते. महाराज आग्र्याच्या कैदेत असताना, त्यांच्या माघारी महासिंह शेखावतने आपल्या राजपूत सहकाऱ्यांशी बोलताना काढलेले उद्गार यासंदर्भात सूचक आहेत. तो म्हणतो, ‘सेवाजी स्याणो बहोत. जु बात कहे सू ठीकही कहो...खरोही भी राजपूत | जिणो सुणो थो तिसो हो देखो | असी राजपूतपणा की बात कहे थो सू याद रहे तो समयउपर का आवे |’ (‘शककर्ते शिवराय’ खंड 2, पृ.102)
दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. पण, शंभूराजे गादीवर येताच उण्यापुऱ्या वर्षभरातच शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुर्गादास राठोडांच्या प्रयत्नाने, औरंगजेबाचा शाहजादा अकबर फुटला. जोधपूर व उदयपूरचे राजपूत राजे एकत्र येऊन, त्यांनी अकबराला ‘मोगल सम्राट’ म्हणून मान्यताही दिली, वणवा पेटत चालला होता. शंभूराजांनी अकबराला हिंदवी स्वराज्यात जाणीवपूर्वक आश्रय दिला. ते थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊलच होय. यासाठीच सतत सात वर्षे शंभूराजांनी देहभान विसरून, औरंगजेबाशी झुंज मांडली होती. स्वातंत्र्याची ज्योत उंबरठ्यापर्यंत आणून ठेवलीच होती मात्र, दुर्दैवाने स्वामीनिष्ठ राजपूतांनी शंभूराजांना साथ दिली नाही. त्यामुळे ‘दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांचे हाती राखूनही’, त्या शक्तीच्या बळावर झुंजत असलेल्या शंभूराजांच्या पंखातील बळ कमी पडले. त्यांना राष्ट्रधर्मरक्षणार्थ बलिदान द्यावे लागले. ‘याचि देही याचि डोळा’ थोरल्या महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे स्वप्न ते प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत. पण त्यांच्या बलिदानाच्या पायावरच पुढे हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार गेला, हेही तेवढेच सत्य. (पुस्तक - राजा शंभूछत्रपती)
शंभूछत्रपतींच्या बलिदानाची थोरवी गाताना विजयराव म्हणतात, “वडू-कोरेगावचं भाग्य थोर! याच धारातीर्थावर महाराष्ट्रधर्मरक्षणासाठी शंभूराजांनी एक यज्ञकुंड सिद्ध केलं. स्वत:च्या अस्थिमांसांच्या समिधा त्यात टाकून, प्राणज्योतीने ते यज्ञकुंड प्रज्ज्वलित केलं. स्वतःच्या रुधिराचं हवन करून, त्यांनी ते धगधगतं ठेवलं. या धगीत एकीकडे गैरसमजातून निर्माण झालेलं मराठी मनातलं किल्मिष पूर्णपणे जळून गेलं, तर दुसरीकडे औरंगजेबी स्वप्नाची त्याच्यासह पार राखरांगोळी होऊन गेली. काळाबरोबर नि:शेष झालं ते शंभूराजाचं कलेवर. कलेवर नष्ट झालं असलं, तरी त्यांचा मृत्युंजयी आत्मा मात्र आकाश झाकू पाहणाऱ्या औरंगजेबी झेंड्याला भेटून, ध्रुवासारखा अढळपद प्राप्त करून बसलेला आहे.”
’महाराजांच्या मुल्खात’ हे पुस्तक वाचताना तर विजयरावांनी केलेल्या किल्ल्यांच्या भ्रमंतीला आपण आपल्या पावलांनी करतोय की, काय असे भाससुद्धा झाले आहेत. याच पुस्तकात रायगडाला जाण्याअगोदर, अमरावतीला अंबाबाईच्या पुढे विजयरावांनी आशीर्वाद मागितला होता आणि अंबाबाईच्या मूतवरील फूल खालीदेखील पडलं होतं.
खरंतर तो फक्त आशीर्वाद नव्हता, तर अंबाबाई सांगत होती, विजयराव ज्या रायगडाच्या मार्गाने निघत आहात; तो मार्ग आता कधीही सोडू नका. कारण शिवराय तुमची वाट पाहत आहेत आणि हे खरंच होतं. रायगडाच्या दिशेने इतिहास शोधण्यासाठी जाताना, अमरावतीच्या अंबाबाईला कौल मागणारा भुत्या स्वग गेला तो कशासाठी?, शिवरायांची पूजा ‘शककर्ते शिवराय’ लिहून आणि शंभूराजेची ‘राजा शंभूछत्रपती’ लिहून, आपली इतिकर्तव्यता पूर्ण करून विजयराव गेले. जिजाऊ आईसाहेबांची जयंती शोधून, महाराष्ट्रभवानीची पोत फरारून विजयराव गेले ते स्वर्गात देव-देवतांच्या पुढेसुद्धा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करण्यासाठीच.
आपण शब्दसुमनांनी विजयरावांना लिखित श्रद्धांजलीच देऊ शकतो मात्र, मला वाटतं की, विजयरावांना खरी श्रद्धांजली तेव्हाच असेल, जेव्हा येणारी पिढी घरोघरी शिवचरित्राचे पारायण करतील आणि आयुष्यात शिवछत्रपतींच्या गुणसुमनांचे आचरणही करतील. कारण विजयराव शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना, महाराजांच्या गुणांना त्यांनी मस्तकावर भंडारा म्हणून लावला.
‘शककर्ते शिवराय’मध्ये त्यांनी शिवछत्रपतींचा स्वलिखित अभंग दिला आहे -
नाशिवंत सुखासाठी | अंतरला जगजेठी ॥
नाही नाही यति गोडी | लक्ष चौऱ्यांशीची जोडी ॥
मनुष्य जन्म गेल्यावारे | काय करशील बारे ॥
शिवराजे सांगे जना | म्या तो सोडिली वासना ॥
तो अभंग फक्त त्यांनी ‘शककर्ते शिवराय’मध्ये छापलाच नाही, तर अवघ्या आयुष्यभर जपलासुद्धा.तीच विजयरावांनी शिवछत्रपतींच्या जागरासाठी दिलेली निष्ठा, अभ्यास आणि भक्ती आपल्याही अंगी यावी, हीच शिवकथाकार विजयराव देशमुख यांना खरी श्रद्धांजली असेल.
- अक्षय चंदेल
(लेखक ‘अग्निगंध’ कादंबरीचे लेखक असून, शिवशंभू विचार मंच, पुणे विभागामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.)