'दूरदर्शन' आणि ‘आकाशवाणी’ ही माध्यमे भारतीय समाजातील सुसंस्कृतपण टिकविण्याला उपयुक्त असतात, हे कोणीही नाकारणार नाही. भारतात ‘दूरदर्शन’चे आगमन झाले आणि घरात दूरदर्शन संच येऊ लागले, तेव्हा भारतीय समाजातील सभ्यता, संस्कार आणि कुटुंबातील नैतिकता यांचा विचार करून कार्यक्रम प्रसारणाला आरंभ झाला. तत्पूव, ‘आकाशवाणी’ने तर हे संस्कारपण अतिशय प्रामाणिकपणे जपण्यात बहुमूल्य योगदान दिले आहे. यासाठी रेडिओ नावाचा संच हा सर्वांचा जिवलग मित्र बनला होता. शेतातील शेतकऱ्यांनादेखील तो तृप्त करीत होता. कान आणि डोळे या मानवी इंद्रियांसाठी सुखकर असे टॉनिक देण्यासाठी ही माध्यमे अत्यंत उपयुक्त ठरली. हा नामोल्लेख करण्याचा हेतू इतकाच की, आज ‘जागतिक रेडिओ दिन’ आणि काल ‘दूरदर्शन’च्या काळात घराघरांत परिचित झालेल्या एका चेहऱ्याने निरोप घेणे. होय, सरला माहेश्वरी या वृत्तनिवेदिकेचे गुरुवारी निधन झाले आणि समाजमाध्यमांवर ‘दूरदर्शन’च्या काळातील आठवणींचा महापूरच आला. त्यांच्या सहयोगी वृत्तनिवेदकांनीदेखील या आठवणी जागविताना सरला माहेश्वरी यांचे बातम्या सांगण्याचे गुण अवगत केले.
तो काळच मुळात अतिशय वेगळा होता. आज जितका वेग बदलाला आहे, तसा तो तेव्हा नव्हता. त्यामुळे ‘दूरदर्शन’वर ‘हिंदी समाचार’ची वेळ झाली की, सगळे घरात एकत्र येऊन दूरदर्शन संचासमोर बसत असत. त्यामुळे आपल्याला बघणारे लोक हे कुटुंबातील सर्वच सदस्य संचासमोर असल्याचे भान ठेवून हे वृत्तनिवेदक अतिशय शालीनतेने आणि विनयाने बातम्या सांगत. यात सरला माहेश्वरी यांचे बातम्या सांगणे ठळकपणे घराघरांत आवडते झाले. भाषेचे शुद्ध उच्चारण आणि त्यातील प्रसंगानुरूप व्यक्त होणे, यातून बातम्या ऐकण्याची गोडी लहानांपासून प्रौढांपर्यंत वाढत गेली. शिवाय, सामान्य ज्ञानात भर पाडण्यात या बातम्यांचा खूप मोठा हातभार होता. सरला माहेश्वरी आणि त्यांच्या समवेतचे शम्मी नारंग, गीतांजली अय्यर, सरिता कौशिक आदींच्या संवादशैलीतून प्रभाव पडत असे, म्हणूनच सरला माहेश्वरी यांच्या वृत्तनिवेदनाच्या शैलीचे कौतुक आज होत आहे. ‘दूरदर्शन’च्या संस्काराचे यात मोठे योगदान आहे, हे मान्य करावेच लागेल.
‘सरल’वाणी
जागतिक रेडिओ दिना’निमित्तदेखील समाजमाध्यमांवर अनेक पोस्टचा पाऊस पडतो. ‘रेडिओ’ नावाची ही वस्तू एखाद्या आडव्या-उभ्या डब्यांसारखी असली, तरी ती घराघरांत अनेक वर्षांपासून मानवी मनाचे रंजन करीत आहे. आता डिजिटल युगात या वस्तूंचा आकार कालमानानुसार बदलला असला, तरी त्यातून येणारा आवाज आणि अन्य प्रबोधनाचे विषय हे समाजासाठी महत्त्वाचे असतात.केवळ मनोरंजनाचे साधन न ठेवता, या रेडिओला प्रबोधनाचे साधन म्हणून जी मान्यता मिळाली, ती येथे अधोरेखित करावीच लागेल. यातून कोणताही वादविवाद किंवा आजच्या काळात बघायला मिळतात, तशा सामान्य लोकांच्या आकलनापलीकडच्या ‘डिबेट’ कधीच रुजल्या नाहीत. किंबहुना, ‘वनिता विश्व’सारखे महिलांचे प्रबोधन करणारे कार्यक्रम आणि बालकांसाठीचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहेत. नेमकी या ‘रेडिओदिनी’च आता पुण्याच्या ‘आकाशवाणी’ केंद्राबाबत सुवार्ता आली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक रेडिओनेदेखील डिजिटल माध्यमांची संगत करीत, मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता आकाशवाणीचे कार्यक्रम ‘न्यूज ऑन एअर’ आणि ‘वेव्हज’ या मोबाईल ॲपवर थेट (लाईव्ह) ऐकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यात ‘पुणे आकाशवाणी’ने पहिला क्रमांक मिळविला आहे. ‘प्रसारभारती’ने देशभरातील सर्व ‘आकाशवाणी’ केंद्रांना मोबाईल ॲपशी जोडले आहे. त्यामुळे श्रोत्यांना देशातील विविध प्रादेशिक केंद्रांचे कार्यक्रम एकाच व्यासपीठावर ऐकता येतात. त्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर बातम्या, मुलाखती, संगीत असे विविध कार्यक्रम उपलब्ध झाले आहेत. ‘पुणे आकाशवाणी’ केंद्राचे कार्यक्रम ॲपवर ऐकणाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. 23 लाखांहून अधिक श्रोते ॲपच्या माध्यमातून पुणे केंद्राशी जोडले गेले आहेत. यात ‘101 उमा सदन’, ‘वनिता मंडळ’, ‘युवावाणी’, ‘माझे घर’, ‘माझे शेत’, ‘रुपेरी मुकुटाचे मानकरी’, ‘आम्ही विशेष’, ‘गीतगंगा’ हे विविध कार्यक्रम ॲपवर ऐकले जातात. विशेष म्हणजे यामुळे श्रोतेवर्ग वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कल्लोळाच्या काळात ही ‘सरल’वाणी लोकप्रिय ठरत आहे.
- अतुल तांदळीकर