काळू-बाळूचा बहुरंगी तमाशा...

    14-Feb-2026   
Total Views |

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात शोककळा पसरलेली असतानाच, आ. रोहित पवार यांनी या दुर्घटनेवर शंका उपस्थित करणारे ‌‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन‌’ सादर करून नवा राजकीय वाद निर्माण केला. त्यामुळे अधिकृत चौकशी सुरू असताना, सार्वजनिकरीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यामागचा हेतू काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. हा प्रयत्न पारदर्शकतेसाठी होता की दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका अधोरेखित करण्यासाठी, यावर मतमतांतरे उमटू लागली आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भावना, संशय आणि सत्तेच्या समीकरणांचा एक विचित्र खेळ सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकुल असताना, दादांच्या मृत्यूभोवती जाणूनबुजून संशयाचे वर्तुळ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

दोन दिवसांपूव अजित पवार यांचे पुतणे तथा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जवळपास एक तास ‌‘पीपीटी प्रेझेंटेशन‌’ देऊन दादांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केल्या. या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी काही व्हिडिओ आणि कागदपत्रे दाखवत प्रश्नही उपस्थित केले. त्यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अपघाताच्या वेळापत्रकाबाबत, तांत्रिक बाबींविषयी आणि काही प्रशासकीय निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांच्या मते, काही मुद्द्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

मात्र, आधी महाराष्ट्रात मतचोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि आता विमान अपघातानंतर रोहित पवार या दोघांनीही राहुल गांधी यांची प्रेझेंटेशन देऊन जनतेची दिशाभूल करण्याची परंपरा कायम ठेवलेली दिसते. या ‌‘प्रेझेंटेशन पॅटर्न‌’ची सुरुवात राहुल गांधींनी ‌‘व्होटचोरी‌’वरून केली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही तोच मार्ग अवलंबला. आता रोहित पवारांनी परवा तेच केले. परंतु, हे प्रकार दिसायला आकर्षक वाटत असले, तरी लोक अशा प्रेझेंटेशन्सना किती गांभीर्याने घेतात, हाच खरा प्रश्न. शिवाय, अशा प्रेझेंटेशमुळे काही काळ माध्यमांचे लक्ष वेधले जाते; पण पुढे काहीच ठोस हाती लागत नाही, हेसुद्धा वारंवार स्पष्ट झाले आहे.

खरेतर, अजितदादा पवार यांच्या निधनाच्या दिवशी इतक्या दु:खद प्रसंगात खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा निव्वळ अपघात असून, यात राजकारण नाही, असे स्पष्टपणे जाहीर केले होते. शरद पवार यांनी स्वतः पुढे येत दुःखाच्या क्षणी अफवांना आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. मग रोहित पवारांना याचा विसर पडला का? की आता पवार साहेबांनीच हा अपघात नसून, घातपात असल्याचे रोहित यांच्या माध्यमातून सांगून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला? पण, जर शरद पवारांनी स्वतः हा अपघात असल्याचे सांगितले असेल, तर त्याच पक्षातील नेत्याने वेगळा सूर लावणे म्हणजे पक्षांतर्गत विसंगती नाही का? हाच सध्या राजकारणातील ‌‘काळू-बाळूचा बहुरंगी तमाशा‌’ म्हणता येईल.

वास्तविक, कोणताही विमान अपघात झाला आणि त्यात कोणाचेही निधन झाले, तरी प्रत्येक विमान अपघाताची चौकशी यंत्रणांमार्फत केली जातेच. ‌‘डीजीसीए‌’, काही स्वतंत्र कंपन्या किंवा विमान निर्मिती कंपन्याही या अपघाताचा तपास करतात. शिवाय, घातपाताची शक्यता तपासण्यासाठी ‌‘सीआयडी‌’ किंवा ‌‘सीबीआय‌’ चौकशीही केली जाते. यानुसार, अजित पवार यांच्या अपघाताचाही सखोल तपास सुरू आहे. ‌‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो‌’ (एएआयबी) आणि ‌‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)‌’ यांच्या पथकाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त अजित पवार यांच्या विमानाचा ‌‘ब्लॅक बॉक्स‌’देखील सापडला असून, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याबद्दल माहिती मिळवणे सुरू आहे. 

अपघाताच्या चौकशीला कुणीही नकार दिलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीला दुजोरा दिला. मात्र, ही सुरू असलेली चौकशी पूर्ण न होता, आपण तर्क-वितर्क केले; तर लोकांच्या मनात शंकांचे काहूर माजते. रोहित पवार हे सगळे भावनेच्या भरात बोलत असले, असे भाबडेपणाने क्षणभर मान्य केले, तरी तरी यातून केवळ संशयास्पद वातावरण निर्माण होण्यापलीकडे दुसरे काहीही साध्य होत नाही. ही शंका चौकशी पूर्ण झाल्यानंतर मांडायला हवी होती; पण भावनांच्या लाटेवर स्वार होत राजकीय वातावरण तापवण्याचा हा प्रयत्न असावा का?

एकूणच, अजितदादा विमानाने बारामतीला जाणारच नव्हते, असा रोहित पवार यांच्या बोलण्याचा सूर आहे. कदाचित, कारने रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी त्यांनी विमानाचा पर्याय निवडला असावा. शिवाय, अजित पवार पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होते, असेही नाही. थोडक्यात, अपघाताची चौकशी पूर्ण होण्याआधीच रोहित पवारांना स्वत: ‌‘जेम्स बॉण्ड‌’ बनण्याची आवश्यकता काय? इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‌‘मोसाद‌’चे वगैरे उदाहरण देऊन रोहित पवारांना हे सगळे प्रकरण सरकारपुरस्कृत असल्याचे भासवायचे होते का? शिवाय, ‌‘सीआयडी तपासाने काय साध्य होणार?‌’ असे म्हणून आपल्या देशातील तपास यंत्रणांवर शंका घेणे योग्य नाही. एकूणच तर, अधिकृतपणे या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू असताना निष्कर्षांपूवच सार्वजनिकरीत्या वेगळा सूर लावणे चुकीचेच.

याउलट, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याआधीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा पेरणे कुणी सुरू केले, हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. खुद्द शरद पवार, जयंत पाटील यांसारख्या अनेक बड्या नेत्यांनी अजितदादांच्या नावाने विलीनीकरणाचे दावे केले. आताही विलीनीकरणासाठी शरद पवार गट अधिक आग्रही दिसतो. त्यावेळी दुःखद प्रसंगानंतर लगेच राजकीय गणिते मांडली गेली आणि आता, चौकशी पूर्ण होण्याआधीच अपघातावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. हा विरोधाभास जनतेच्या नजरेतून सुटणारा नाही.

अजितदादा हयात असताना एका कार्यक्रमात रोहित पवारांनी त्यांच्यावर भावकी विसरल्याचा आरोप केला होता. त्यावर अजितदादांनीही, “भावकीकडे लक्ष दिले म्हणून तू आमदार झालास,” असे रोहित पवारांना रोखठोक उत्तर दिले होते. यातून केवळ रोहित पवार यांचा बोलघेवडेपणाच सिद्ध होतो. शिवाय, यामुळे अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय आणि प्रशासनकेंद्री प्रतिमेच्या नेत्यासमोर रोहित पवारांच्या अपरिपक्वतेचेच दर्शन घडले. तसेच त्यांच्यावर कौटुंबिक संदर्भ सार्वजनिक व्यासपीठावर आणल्याची टीकाही झाली. याऐवजी, रोहित पवारांनी स्वत:च्या पक्षासाठी, निवडणूक रणनीतीसाठी असे काही प्रेझेंटेशन वगैरे करण्यात थोडा जरी वेळ खच घातला असता, तर कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाला नसता. असो...

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, रोहित पवार यांचे असे राजकीय स्टंट किंवा वर्तनामुळे संजय राऊतांसारख्या नेत्यांनाही बिनबुडाचे आरोप करण्याचा चेव येतो. त्यामुळे मूळ विषय बाजूला पडून भलत्याच विषयांच्या चर्चेला तोंड फुटते. विमान अपघातासारख्या गंभीर घटनेत पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहेच. परंतु, चौकशी पूर्ण होण्यापूव सार्वजनिक मंचावर संशयाची मांडणी करणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हायला हवा. रोहित पवार यांचे हे पाऊल काहींना धाडसी वाटेल, तर काहींना ते असंवेदनशील राजकारणाचे उदाहरण वाटेल.

थोडक्यात, या सगळ्यातून रोहित पवारांचा उद्देश नेमका काय? सहानुभूतीची लाट निर्माण करणे? अजितदादांच्या समर्थकांना भावनिकदृष्ट्या एकत्र आणणे? की राजकीय दबावाचे नवे समीकरण उभे करणे? कोणत्याही अपघाताची चौकशी सुरू असताना अशा शंका सार्वजनिकरीत्या मांडल्याने तपास यंत्रणांवर दबाव येतो. तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर राजकीय रंग चढवणे योग्य नाही. प्रश्न विचारणे चुकीचे नाही; पण प्रश्न विचारण्याची वेळ, पद्धत आणि उद्देश महत्त्वाचा असतो, अन्यथा ते सत्याचा शोध घेण्यापेक्षा राजकीय ‌‘स्टंट‌’ अधिक वाटू लागतो. काळू-बाळूच्या या बहुरंगी तमाशात सत्य कोणत्या रंगात रंगले आहे, हे येणारा काळच ठरवेल!

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....