‌‘भूक‌’ : सामाजिक वास्तवाची जाणीव करून देणारा लघुपट

    14-Feb-2026
Total Views |

सामाजिक वास्तवावर थेट बोट ठेवणारे चित्रपट आणि लघुपट आजच्या काळात अधिक प्रभावी ठरताना दिसतात. अशाच आशयघन मांडणीसह ‌‘भूक‌’ हा नवा लघुपट प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकतेच या लघुपटाचे खास स्क्रीनिंग पार पडले.

या लघुपटाचे नाव जसे साधे, तितकाच त्यामागील आशय अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे. कथेच्या केंद्रस्थानी आहे, एका शाळकरी मुलीचे आयुष्य. मर्यादित वेळ, मोजके संवाद आणि साधी मांडणी तरीही तिच्या डोळ्यांतून आणि शब्दांतून ‌‘भूक‌’ या संकल्पनेचा गहिरा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. काही मिनिटांच्या या प्रवासात ती मुलगी समाजासमोर अनेक प्रश्न उभे करते आणि नकळत आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रल्हाद परीट यांनी केले आहे. त्यांनी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी संवाद साधताना या कथेमागील प्रेरणा, सामाजिक वास्तवाचे भान आणि लघुपटाच्या निर्मितीप्रक्रियेतील अनुभव याविषयी मनमोकळेपणाने चर्चा केली.

ते म्हणाले, “खरं तर 2020 साली हा प्रोजेक्ट सूचला. समाजात अनेकदा लोकांना अन्न वाया घालताना पाहिलं, तर दुसरीकडे अनेकजण उपाशीपोटी झोपतात, हे तीव्र वास्तव जाणवले. त्यातूनच समाजाला एक अर्थपूर्ण संदेश द्यावा, या उद्देशाने ‌‘भूक‌’ची कल्पना आकाराला आली. या विषयावर अभ्यास करून स्क्रिप्ट आणि संवाद लिहिले आणि आज हा लघुपट प्रेक्षकांसमोर साकार झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “सुरुवातीपासूनच आमचा उद्देश स्पष्ट होता, प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार आणि अर्थपूर्ण पाहायला मिळालं पाहिजे. ‌‘कॅली स्टुडिओ‌’च्या संपूर्ण टीमने एकत्र बसून प्रत्येक बाबीवर सविस्तर चर्चा केली. साऊंड डिझाईनपासून ते चित्रणापर्यंत प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ठरवली, जेणेकरून लघुपट प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. चित्रपटाचा दर्जा उंचावण्यासाठी अनुभवी ‌‘डीओपी‌’ची निवड केली. कलाकारांच्या बाबतीतही विशेष मेहनत घेतली. बहुतेक कलाकार हे नवखे असले, तरी त्यांनी यापूव मालिका आदी माध्यमांत काम केलेले आहे. विशेषतः 13-14 वर्षांच्या मुलींच्या भूमिकेसाठी योग्य चेहऱ्यांचा शोध घेतला. सर्व कलाकारांनी भूमिकेनुसार मनापासून मेहनत घेतली आणि अपेक्षेप्रमाणे प्रभावी अभिनय साकारला.

बरं, आता फिल्म तर आली आहे; पण ही आता प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवली जाणार आहे? म्हणजे स्पर्धांमध्ये तर जाईलच. पण प्रेक्षकांपर्यंत कशी जाईल आणि मग सामान्य प्रेक्षकांना ती पाहता येईल.”

लघुपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी बोलताना ते म्हणाले की, “सध्या ‌‘भूक‌’चा फेस्टिव्हल सर्किटमध्ये प्रवास सुरू आहे. विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये लघुपट सादर केला जात असून, प्रेक्षक आणि परीक्षकांच्या प्रतिसादाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत. फेस्टिव्हलनंतर पुढील टप्प्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा विचार केला जाणार आहे. एखाद्या ओटीटीकडून आम्हाला संपर्क आला किंवा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हा लघुपट आवडला, तर नक्कीच ‌‘भूक‌’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे.”

भविष्यातील प्रोजेक्टसविषयी सांगताना परीट म्हणाले की, “ ‌‘भूक‌’नंतर आमचे आणखी दोन सामाजिक आशयाचे प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांपैकी एक आहे, ‌‘वदतला देवमाणूस‌’, तर दुसरा म्हणजे माझ्या पहिल्या चित्रपटाचा पुढील भाग ‌‘बूट पॉलिश 2.‌’ ‌‘बूट पॉलिश‌’ हा चित्रपट सध्या युट्यूबवर उपलब्ध आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच कथेला पुढे नेत, अधिक प्रभावी संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ही दोन्ही प्रोजेक्ट्सही सामाजिक विषयांवर आधारित असून, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि सकारात्मक संदेश देणारा सिनेमा करण्यावर आमचा भर असेल.”

- अपर्णा कड