तब्बल 19 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवणारा आणि तितक्याच सहजतेने भावनिक स्पर्श करणारा ‘साडे माडे तीन’ हा मराठी चित्रपट आजही अनेकांच्या आठवणीत ताजा आहे. कुरळे बंधूंची भन्नाट कॉमेडी, गॅरेजमधील धमाल आणि टायमिंगची कमाल यांमुळे हा चित्रपट मराठी चित्रपटांत वेगळं स्थान निर्माण करून गेला. आता अनेक वर्षांनी तीच जुनी टोळी पुन्हा एकदा थेट गॅरेजमधूनच सज्ज झाली आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट दि. 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून, जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला हसवण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पहिल्या भागातील धमाल केमिस्ट्री कायम ठेवण्यात आली आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हीच जुनी जबरदस्त टोळी पुन्हा एकत्र आली आहे. त्यांच्यासोबत रिंकू राजगुरू, संजय नार्वेकर आणि काही सरप्राईज पाहुणे कलाकारही रंगत वाढवणार आहेत, तर दिग्दर्शन अभिनेता अंकुश चौधरी यांनी केले आहे. म्हणजेच, हशा, गोंधळ, गैरसमज आणि गॅरेजमधली धमाल पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. पण हा चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागाइतकाच प्रभावी ठरतो का? जुन्या जादूला नवीन झळाळी मिळते का? हे जाणून घेऊया...
या चित्रपटाची कथा पुन्हा एकदा कुरळे बंधूंच्या गॅरेजमधूनच उलगडते. रतन (अशोक सराफ), मदन (मकरंद अनासपुरे) आणि चंदन (भरत जाधव) हे तीन भाऊ आणि त्यांच्यासोबत कायम गोंधळ घालणारा बबन (सिद्धार्थ जाधव) ही टोळी अजूनही त्याच ऊर्जेने रंगत आणताना दिसते. कुरळे बंधूंची ठाम भूमिका म्हणजे ‘नो लेडीज, नो मॅरेज!’ गॅरेजमध्ये स्त्रियांना कडक बंदी. पण, कथेला खरा ‘ट्विस्ट’ तेव्हा मिळतो, जेव्हा एका रात्री अचानक एक तरुणी गॅरेजमध्ये येऊन धडकते. ही तरुणी म्हणजे कामिनी (रिंकू राजगुरू). तिच्या येण्याने या चौघांच्या आयुष्यात नेमकं काय वादळ येतं, त्यांच्या नियमांना तडा जातो का आणि ‘नो लेडीज’ची पॉलिसी यावेळी टिकते की मोडते, याची उत्तरं चित्रपटातच मिळतात.
चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून संजय नार्वेकर एका भन्नाट, हटके विनोदी तांत्रिकाच्या भूमिकेत दिसतात. तसेच समाजमाध्यामंवर लोकप्रिय असलेले काही विनोदी चेहरेही थोडक्यात हजेरी लावून कथेला वेगळीच रंगत आणतात. गोंधळ, गैरसमज आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला हा प्रवास प्रेक्षकांना पुन्हा एकदा गॅरेजमध्ये खेचून नेतो.
चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अभिनेता अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी केले होते. मात्र, यावेळी अंकुश चौधरी यांनी एकहाती दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर तीच ‘स्टारकास्ट’ पुन्हा एकत्र आणणे आणि पहिल्या भागातील जादू टिकवून ठेवणे, हे नक्कीच सोपे काम नव्हते. ज्यांनी ‘साडे माडे तीन’ पाहिला आहे, त्यांना कुरळे बंधूंचे टायमिंग, त्यांची खास शैली आणि संवादफेक आजही तोंडपाठ असेल. या सिक्वेलमध्येही तीच गंमत आणि तीच ‘केमिस्ट्री’ अनुभवायला मिळते. या सातत्यासाठी दिग्दर्शकाचे विशेष कौतुक करावे लागेल. चित्रपटाची कथा साधी आणि सरळ आहे; पण ती प्रेक्षकांना आपलीशी वाटते.
चित्रपटाची खरी ताकद म्हणजे, कलाकारांचा सहज-सुंदर अभिनय. विशेषतः ‘कुरळे ब्रदर्स’ची जमलेली भट्टी हा या चित्रपटाचा आत्माच म्हणावा लागेल. त्यांच्या अचूक टायमिंगमुळे अनेक प्रसंग अधिक रंगतदार होतात. पहिल्या भागाच्या शेवटाशी या भागाचा ताळमेळ पूर्णपणे बसत नसला, तरीही दुसरा भाग स्वतंत्रपणे पाहता येतो, ही जमेची बाजू. चित्रपटाचे लेखन आणि संवाद साधे असले, तरी तितकेच प्रभावी आहेत. कलाकार आता वयानुसार ज्येष्ठ झाले असले, तरी त्यांनी पूवचीच ऊर्जा आणि जादू कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. सहकलाकारांनीही आपापल्या भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत. कोणतीही व्यक्तिरेखा अनावश्यक किंवा अतिनाटकी वाटत नाही, हे विशेष.
मात्र, विनोदाच्या बाबतीत चित्रपट आणखी प्रभावी ठरू शकला असता असे वाटते. काही प्रसंग प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवतात. पण, एकंदर पाहता, विनोदाचा स्तर अधिक उंचावता नक्कीच आला असता. त्यातच कथा काहीशी सर्वसाधारण असल्याने पुढे काय घडणार, याचा अंदाज सूज्ञ प्रेक्षकांना प्रारंभीच येऊ शकतो. त्यामुळे उत्कंठा थोडी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच अथर्व सुदामे, डॅनी पंडित, शंतनु रांगणेकर असे काही विनोदी सोशल मीडिया स्टार झळकले आहेत. त्यामुळे आता कॉमेडीचा डबल धमाका पाहायला मिळणार, असं वाटलं होतं. पण, ते अगदीच मोजक्या क्षणांसाठी चित्रपटात दिसतात आणि विशेष असा प्रभाव पडत नाही.
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, समृद्धी केळकर आणि संकेत पाठक यांसारखी दमदार कलाकारांची फळी ही साहजिकच या चित्रपटाची जमेची बाजू. प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विशेषतः अनुभवी कलाकारांची सहजता आणि तरुण कलाकारांचा एक तजेलदारपणा यांचा समतोल चित्रपटाला वेगळीच रंगत देतो. वेशभूषा आणि नेपथ्यही कथानकाला अनुरूप ठेवण्यात आले असून, गॅरेजची ओळखीची जागा पुन्हा एकदा जिवंत वाटते. तांत्रिक बाबी व्यवस्थित सांभाळल्या गेल्यामुळे चित्रपट एकसंध अनुभव देतो. विनोद अधिक धारदार असू शकला असता, हे खरे ; तरीही चित्रपट हलक्या-फुलक्या मनोरंजनात यशस्वी ठरतो. विशेष म्हणजे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना सहज पाहता येईल, असा हा सिनेमा आहे. एकंदरितच, ‘पुन्हा एकदा साडेमाडे तीन’ हा सहकुटुंब-सहपरिवार पाहण्याजोगा, हलका-फुलका आणि विनोदी मनोरंजनाचा पर्याय ठरतो.
कथा आणि दिग्दर्शन : अंकुश चौधरी
कलाकार : अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, समृद्धी केळकर, संकेत पाठक
गायक : अवधूत गुप्ते
रेटिंग : 3
- अपर्णा कड