वडील चर्चचे पाद्री पण हिंदू धर्माने प्रभावित झाला प्रियांका चोप्राचा अमेरिकन पती

    14-Feb-2026
Total Views |

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या परदेशात वास्तव्यास असली, तरी भारतीय संस्कृतीशी असलेलं तिचं नातं आजही तितकंच घट्ट आहे. तिचा पती आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार निक जोनसनेही भारतीय परंपरा मनापासून स्वीकारल्या असून, आपल्या लेकीचं मालती मॅरी चोप्रा जोनसचं संगोपन हिंदू मूल्यांनुसार करत असल्याचं त्यांने स्पष्ट केलं आहे.

सध्या ‘संडे बेस्ट’ या अल्बमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या निकने Zach Sang Show या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत कुटुंबाविषयी खास संवाद साधला. पिता म्हणून अनुभव कसा आहे, याबद्दल बोलताना तो म्हणाला, “लहान मूल एखादी गोष्ट पहिल्यांदाच अनुभवतं, तो क्षण शब्दांत सांगता येणार नाही इतका सुंदर असतो. पालकत्व म्हणजे केवळ जबाबदारी नाही, तर प्रेम आणि संयमाची खरी परीक्षा आहे.” निकने सांगितले की, आता तो अशा गोष्टी लिहित आहेत ज्या भविष्यात आपल्या मुलीला समजावून सांगाव्या वाटतील. “ती आमची गाणी आवडीने ऐकते. ‘Love Me To Heaven’ हे गाणं तिला विशेष आवडतं,” असेही त्याने नमूद केले.

भारतीय संस्कृतीविषयी बोलताना निकने सांगितलं, “पहिल्यांदा भारतात आलो तो अनुभव विलक्षण होता. प्रियंकाच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असताना भारतीय परंपरा, सण आणि कुटुंबप्रणाली जवळून पाहण्याची संधी मिळाली. काही भारतीय सण आता माझ्या अत्यंत आवडीचे झाले आहेत.” तो पुढे म्हणाला की, त्याच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी भारताशी जोडलेल्या आहेत.


हिंदू धर्माविषयी आदर

निकने हिंदू धर्माविषयीही आदर व्यक्त केला. “हिंदू धर्म अत्यंत गहन आणि सुंदर आहे. कर्माची संकल्पना जसं आपण इतरांशी वागतो तसंच आपल्याला परत मिळतं ही शिकवण मनाला भिडणारी आहे,” असं तो म्हणाला. तसेच पुढे त्याने म्हटलं, “आम्ही आमच्या मुलीला हिंदू मूल्यांची जाणीव ठेवून वाढवत आहोत. माझा आध्यात्मिक प्रवास काळानुसार विकसित झाला असून, तो आता माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे.”

विशेष म्हणजे, निक यांचे वडील चर्चमध्ये पाद्री होते. अशा पार्श्वभूमीवर वाढलेल्या निकने भारतीय संस्कृती आणि हिंदू मूल्यांना दिलेला मान भारतीय चाहत्यांना विशेष भावला आहे. एकूणच, परदेशात राहत असतानाही प्रियांका आणि निक यांनी भारतीय परंपरांचा सन्मान राखत आपल्या कुटुंबात संस्कारांची सुंदर परंपरा जपली आहे.