मुंबई : (Mumbai-Nashik Highway) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घोटी–त्र्यंबक (मोखाडा)–जव्हार–मनोर–पालघर या एनएच-१६०ए महामार्गाच्या उन्नतीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. १५४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी ३,३२०.३८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून हा प्रकल्प ईपीसी पद्धतीने राबवला जाणार आहे. (Mumbai-Nashik Highway)
नाशिकच्या पश्चिमेकडील अंबड आणि सातपूर परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होते. सध्या ही वाहतूक प्रामुख्याने नाशिक शहरातून जाते, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मुंबई आणि पुण्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहे. परिणामी, शहरातील कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा वाढलेला वेळ ही मोठी समस्या बनली आहे. (Mumbai-Nashik Highway)
या पार्श्वभूमीवर एनएच-१६०एच्या उन्नतीकरणामुळे औद्योगिक वाहतूक त्र्यंबकमार्गे वळवता येणार असून नाशिक शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक इगतपुरीजवळील इंटरचेंजमार्गे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा वापर करून घोटीपर्यंत येईल आणि पुढे एनएच-१६०एमार्गे त्र्यंबक व नाशिककडे जाईल. २०२८नंतर या मार्गावरील दैनंदिन वाहतूक १०,००० पीसीयूंपेक्षा अधिक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, त्यामुळे काही भागात चार लेनचा विस्तार प्रस्तावित करण्यात आला आहे. (Mumbai-Nashik Highway)
त्र्यंबकपासून पश्चिमेकडे जाणारा हा महामार्ग मनोर आणि पालघरमार्गे पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे तसेच एनएच -४८शी जोडला जातो. त्यामुळे मुंबई–दिल्ली आर्थिक कॉरिडॉरशी थेट संपर्क साधला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांनाही सुधारित पायाभूत सुविधा मिळणार आहेत. सध्या काही भागात मध्यम-लेनचा रस्ता असून वाहतूक तुलनेने कमी असली तरी भविष्यातील वाढ लक्षात घेऊन दोन लेन व पक्क्या शोल्डरसह रस्त्याचा विकास केला जाणार आहे. मनोर ते पालघर या शहरी पट्ट्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन चार लेन विस्ताराचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (Mumbai-Nashik Highway)
घोटीपासून पालघरपर्यंतचा हा महामार्ग केवळ वाहतुकीचा मार्ग राहणार नाही, तर औद्योगिक वाढ, ग्रामीण आणि आदिवासी भागांचा विकास आणि राष्ट्रीय महामार्ग जाळ्याशी सशक्त जोड निर्माण करणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे देशाच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये सकारात्मक सुधारणा अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहन चालवण्याचा खर्च घटेल आणि मालवाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होईल. याशिवाय थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. (Mumbai-Nashik Highway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.