मुंबई : (Mumbai Metro Pillar Collapse) मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Mumbai Metro Pillar Collapse)
मुलुंड पश्चिम येथे बांधकामाधीन मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली)च्या कामादरम्यान खांबाचा एक काँक्रीट भाग कोसळून थेट एका ऑटो-रिक्शावर आणि पुलाखालून जाणाऱ्या कारवर पडल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि.१४ रोजी दुपारी १२.१५च्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस पथक, मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. (Mumbai Metro Pillar Collapse)
मुंबईच्या महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी आणि स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेतली. "ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि गंभीर असून आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. मुंबईकरांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलेच पाहिजे मात्र त्याचसोबत मुंबईकरांची सुरक्षितता ही महत्वाची आहे. या घटनेत एमएमआरडीए, त्यांनी नेमलेले कंत्राटदार आणि ज्यांनी या प्रकल्पात सल्ला दिला आहे असे सल्लागार या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल", असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले. (Mumbai Metro Pillar Collapse)