टोकियोच्या उत्तरेला डोंगराळ प्रदेशात पावसाच्या मंद सरींमध्ये गाडीच्या काचा बंद करून वेग काटेकोरपणे ताशी 40 किलोमीटर पाळत तुम्ही संगीतमय प्रवासाचा अनुभव घेऊ शकता. जपानमध्ये गाडी चालवत असताना एखाद्या वळणावर रस्त्याच्या फलकावर अचानक ‘ट्रेबल क्लेफ’चं चिन्ह दिसतं किंवा रस्त्यावरच रंगवलेलं असतं आणि काही क्षणांतच तुमच्या गाडीखालून एक हलकंसं, थोडंसं थरथरणारं सूरमालिकेचं गाणं ऐकू येऊ लागतं! ही काही जादू नाही, तर हे आहेत संगीतमय रस्ते.
अशा सुरेल महामार्गांचा अनुभव केवळ जपानपुरताच मर्यादित नाही; अमेरिका, दक्षिण कोरिया आणि डेन्मार्कमध्येही असे रस्ते आहेत. मात्र, जपान हे या ‘हम्मिंग हायवे’चे खऱ्या अर्थाने केंद्र मानले जाते. देशभरात तब्बल 20हून अधिक संगीत वाजवणारे रस्ते तिथे तयार करण्यात आले आहेत. जपानमधील गुन्मा प्रीफेक्चरमधील नाकानोजो या गावाजवळचा ‘मेलडी रोड’ वेगमर्यादा पाळणाऱ्या चालकांना सरकारने संगीतमय भेट दिली आहे. जपानमध्ये सध्या अशा 33 मेलडी रस्त्यांचा समावेश आहे. केवळ गुन्मा प्रांतातच दहा ठिकाणी असे संगीतमय रस्ते आहेत. रस्त्यावर आडव्या दिशेने सूक्ष्म खाचा वाहनाच्या टायरखाली वेगवेगळ्या पट्ट्यांच्या अंतरामुळे भिन्न सूर निर्माण करतात. खिडक्या बंद ठेवून गाडी चालवली, तरच हा सुरेल अनुभव स्पष्ट ऐकू येतो.
जपानमध्ये नियमपालनाला खेळकर पद्धतीने प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. वेगमर्यादा ओलांडली, तर हेच सुरमयी संगीत बेसूर होते. त्यामुळेच वाहनचालकांना योग्य वेग राखण्याची प्रेरणा मिळते. काही ठिकाणी तर अशा रचनाही धाडसी आहेत. जपानमधील अकिताकाता शहरात उजव्या टायरखाली ताल आणि डाव्या टायरखाली धून अशी मांडणी करण्यात आली आहे. तथापि, 2012 मध्ये गुन्मा प्रांतातील किता-कारुइझावा येथील रहिवाशांनी झोपमोडीची तक्रार केली. पर्यटकांना हा अनुभव आवडला; पण स्थानिकांना त्रास झाला. हा आवाज सुमारे 500 मीटरपर्यंत पोहोचत असल्याचे मोजमापातून स्पष्ट झाले. अखेर एका वर्षाने अतिरिक्त डांबरी थर टाकून तो भाग शांत करण्यात आला.
या संकल्पनेचे जनक शिझुओ शिनोडा ठरले. 2004 मध्ये होक्काइदो बेटावर शिनोडा यांना त्यांच्या गावाजवळ ट्रॅक्टरमुळे खराब झालेल्या रस्त्यांवरून निर्माण होणारे वेगळे सूर त्यांनी अनुभवले. ‘होक्काइदो इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या सहकार्याने 2007 मध्ये पहिला मेलडी रोड साकारला गेला. 175 मीटर लांबीच्या या पट्ट्यावर ताशी 40 किमी वेगात गाडी चालवली, तर ‘शिरेतोको र्योजो’ हे गीत ऐकू येत होते. इशिकावा प्रांतात 1.2 किमी लांबीचा मेलडी रोड ताशी 70 किमी वेगात वाहने गेल्यास संगीतमय होतो. साधारणपणे 250 ते 320 मीटरचे पट्टे 40 किमी वेगासाठी डिझाईन केले जातात. एका मेलडी रोडची किंमत दोन लाख युरोपर्यंत जाऊ शकते.
फुजी-सुबारू लाईनवर म्हणजे माऊंट फुजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्या भव्य पर्वताचे गुणगान करणारे सूर ऐकू येतात. ताकायामा येथील वेधशाळेकडे जाणारा रस्ता ‘व्हेन यू विश अपोन अ स्टार’ हे गीत वाजवतो. फुकुशिमा प्रांतात जॉन डेन्वरचे ‘टेक मी होम’, ‘कन्ट्री रोड्स’ या गाण्याची धून ऐकू येते. या प्रयोगात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत मात्र फारसे लोकप्रिय ठरले नाही. कारण ते ओळखू येईल अशारीतीने वाजले नाही.
चीनने 2013 मध्ये हेनान प्रांतात राष्ट्रगीत रस्त्यावर कोरले, तर अमेरिकेने 2014 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये ‘अमेरिका द ब्युटीफुल’ ही धून साकारली. मात्र, वाहतुकीचे धडे देण्यासाठी संगीतमय रस्त्यांचा व्यापक वापर जपाननेच यशस्वी केला. एकदा जपानमध्येच वाहतूक सूचना देणारा रस्ता तयार करण्यात आला; पण तो लोकांना आवडला नाही. त्यामुळेच आज ‘मेलडी रोड’ ही केवळ पर्यटन आकर्षण नसून वाहतूक शिस्तीला सुरेल स्पर्श देणारी अभिनव संकल्पना ठरली आहे. नियम पाळताना आनंद मिळावा, हा जपानी दृष्टिकोन जगभरातील वाहतूक व्यवस्थांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यामुळे भारतात भरधाव वाहने चालविणाऱ्यांना मुंबईत कोस्टल रोडवरून ‘जय हो’ ही धून ऐकायची असल्यास वेग मर्यादा पाळत वाहने चालविणे बंधनकारक झाले आहे, हे नक्की!