दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे सध्या पालकांसाठीही वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, विद्याथसुद्धा पूर्णवेळ परीक्षाथ झाल्यामुळे त्यांचा भोवताल पूर्णपणे बदलून गेला. स्पर्धेच्या युगात वावरताना ताणतणाव, नैराश्य अशा अनेक गोष्टींचा सामना आपल्याकडे युवकांना करावा लागतो. अपयशाच्या भीतीचं पर्यवसान काही वेळेला थेट आत्महत्येमध्येसुद्धा घडतं. जीवनामध्ये असे प्रसंग आल्यावर, आपल्या ‘मना’ची नेमकी भूमिका काय असायला हवी, बिकट प्रसंग ओढल्यावर त्याच्याशी दोन हात कसे करायचे, याचा विचार समर्थांनी कसा मांडला, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं पुस्तक ‘समर्थ मनासाठी-लोक मनाचे’ हे पुस्तक आज दि. 14 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. मानसोपचारतज्ज्ञ अद्वैत पाध्ये यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली (पूर्व) येथील ब्राह्मण सभा हॉल येथे सायंकाळी 6 वाजता, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ नंदू मुलमुले, संतसाहित्याच्या अभ्यासिका अलका मुतालिक यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लेखकाशी साधलेला हा विशेष संवाद...
सर्वप्रथम आपल्या नवीन पुस्तकाबद्दल सांगा. ‘समर्थ मनासाठी’ हे नाव देण्यामागे आपला मुख्य उद्देश काय होता आणि या पुस्तकातून वाचकांना काय वाचायला मिळणार आहे?
मी मानसोपचरतज्ज्ञ असल्यामुळे मागची 27 वर्षे मी याच विषयावर काम करत आलो आहे. मनाच्या आजारांवर, विकारांवर उपचार करत असलो, तरी कुठल्याही व्यक्तीवर ती वेळ येऊ नये, यासाठी सुदृढ किंवा समर्थ मन आवश्यक आहे. आधुनिक काळातील विवेकनिष्ठ उपचारपद्धतींचा अवलंब करून, आमची संस्था कार्यशाळा, वर्ग आयोजित करत असते. त्याच वेळेला आपण जर गीतेचा अभ्यास केला, तर भगवान श्रीकृष्णसुद्धा कुरुक्षेत्रावर अर्जुनाचे समुपदेशन करत आहेत; विवेकाचे तत्त्वज्ञान वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत. त्याचबरोबर समर्थांच्या मनाच्या लोकांचा जर आपण अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की, विवेकाविषयी समर्थांनी जे निरुपण केले आहे किंवा आपल्या भावनिक विकासासाठी जो मंत्र दिला आहे, तो अत्यंत मार्गदर्शक आहे आणि हा विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला हवा, या उद्देशाने पुस्तकाचे लिखाण केले आहे.
सध्या सर्वत्र परीक्षेचा काळ सुरू आहे. तणाव, भीती, दडपण यांचं वातावरण आहे. अशा काळात मुलांनी आणि पालकांनी आपले मानसिक संतुलन कशा रितीने जपावे?
सर्वप्रथम परीक्षा हा काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही, हे विद्याथ आणि पालक दोघांनी समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षा आवश्यक असली, तरी तिला अति महत्त्व देता कामा नये. खऱ्या अर्थाने इथे विवेक हाच आहे की, आपल्या हातात नेमकं काय आहे, त्याचा विचार करून योग्य ते प्रयत्न करणे. आतापर्यंत आपण जे केलं आहे, त्याचं स्मरण करून, नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून नक्कीच यश मिळू शकतं. यात महत्त्वाचा भाग असा आहे की, बरेचदा आपण मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतो, तसे न करता, कुवतीप्रमाणे अपेक्षा ठेवायला हव्या. काम करणे, अभ्यास करणे आपल्या हातात आहे, त्याचं फळ काय असेल हे आपल्या हातात नाही, याचीसुद्धा जाणीव आपण ठेवायला हवी.
आजची पिढी तंत्रज्ञानाशी पूर्णपणे जोडली गेली आहे. अशा काळात जिथे शिक्षणासाठी, कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे, तिथे आपल्या मनाची काळजी कशी घेतली गेली पाहिजे?
आपली आताची जी ‘जेन-झी’ आहे, ती तंत्रज्ञान सोबत घेऊनच जन्माला आली, तिच्यावर तंत्रज्ञानाचे गारुड असणे स्वाभाविक आहे. मात्र, शेवटी आपण या तंत्राचं गुलाम किती व्हायचं, हे आपल्या हातात आहे. आपण त्याच्या आहारी किती जायचं, याचा विचार आपणच केला पाहिजे. कारण, शेवटी हीदेखील मानवनिर्मित गोष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधित आपण समाज म्हणून, कुटुंब म्हणून काही पथ्ये पाळली, तर आपलं जीवन अधिक सुसह्य होईल, असं मला वाटतं. तंत्रज्ञानाच्या वापराला जर विवेकाचं अधिष्ठान असेल, तर आपण मनाशी संबंधित विकारांवर मात करू शकतो. आपल्याकडे शाळांमध्येसुद्धा ई-लर्निंग होतं. मात्र, तिथेसुद्धा याचा वापर जितका कमी करता येईल, तितके चांगले.
मध्यंतरी एका अहवाल प्रसिद्ध झाला होता, ज्यात असं म्हटलं होतं की, ‘जेन-झी’ आधीच्या पिढीच्या तुलनेत कमी मद्यपान करते. यानंतर दोन निष्कर्ष काढण्यात आले. पहिला म्हणजे, या पिढीची व्यसनं बदलली आहेत आणि दुसरा म्हणजे, या पिढीला तणाव चांगल्या प्रकारे हाताळता येतो, आपलं मत काय?
आपल्याकडे सध्या ‘डूमस्क्रोलिंग’ इतक्या मोठ्या प्रमणात वाढलं आहे की, हेसुद्धा एका प्रकारचं व्यसनच झालं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल गेम्स असो किंवा 30 सेकंदांच्या रीलवर अवलंबून असलेले डोपामिन; यामुळे व्यसनांचं एक वेगळंच क्षेत्र या पिढीपुढे निर्माण झालं आहे. त्यामुळे आपल्यासमोर नवीन आव्हानं आहेत, हे मात्र नक्की. त्याचबरोबर ’Fear of Missing Out' ज्याला आपण ‘फोमो’ म्हणतो, त्यामुळेसुद्धा तरुणांचा ओढा अतिवापराकडे असतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वावर सध्या सर्वत्र सुरू आहे. संवाद साधण्यासाठी एक आभासी जिवंतपणा मिळावा, म्हणूनसुद्धा याचा उपयोग केला जात आहे. काहीजण याकडे मानसिक आधार म्हणूनसुद्धा बघत आहेत. याकडे आपण कसं बघता?
‘एआय’ ही शेवटी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान आहे. माणसाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, तर भावनिक बुद्धिमत्ता त्याला कमवावी लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा समावेश होत नाही. तुमच्या दैनंदिन कामामध्ये ते तंत्रज्ञान तुम्हाला मदत करू शकेल. मात्र, भावनिक बुद्धिमत्ता जर विकसित करायची असेल, तर तुम्हाला माणसांसोबतच संवाद साधणं आवश्यक आहे. आपल्या समस्यांवर ‘एआय’ आपल्याला अतिशय कोरडे उत्तरं देतं. मात्र, खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या समस्या सोडवायच्या असतील, तर मानवी स्पर्श, संवाद या गोष्टी अत्यावश्यक आहे. त्यामुळे ‘एआय’चा वापरसुद्धा आपण तारतम्य ठेवून केला, तर जास्त फायदेशीर असेल.
‘एआय’च्या आक्रमणामुळेच नोकरी जाण्याची शक्यता काही क्षेत्रांतील तरुणांवर आली आहे. त्यांनी कशा रितीने या समस्येला तोंड द्यावं?
संगणक जेव्हा आले, त्यावेळेलासुद्धा अशाच प्रकारची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तितका धोका त्या तंत्रज्ञानाचा नव्हता. आजसुद्धा ‘एआय’ म्हणजे त्या तंत्रज्ञानाची पुढची आवृत्ती आहे. आताच्या घडीलासुद्धा आव्हानं आहेत. मात्र, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कुठलेही तंत्रज्ञान मानवापेक्षा वरचढ नसते. ज्या समस्यांना आपण तोंड देतो, त्यांच्यावर मात करण्याची शक्ती आणि ज्ञान आपल्याकडे असतं. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये आपण ज्ञान कशा रितीने आत्मसात करता येईल, याचा विचार करून आपली प्रगती कशी साधता येईल, याचा विचार आपण केला पाहिजे.
मागच्या काही काळात माणसाच्या जीवनातील परिवर्तनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वेगासोबत जुळवून घेऊन माणसाने निरोगी आणि सुदृढ आयुष्य कसं जगावं?
आपल्या आयुष्याचा वेग वाढला आहे, हे नक्की. मात्र, बरेचदा पण एक गोष्ट विसरतो की, हा वेग कमी किंवा जास्त करण्याचा लगाम आपल्या हातामध्ये आहे. दरवेळेला यशस्वी होण्यासाठी सतत धावत राहिलं पाहिजे, हे गरजेचे नाही. कधीकधी कुठे थांबायचं, याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. रात्री आपण जशी विश्रांती घेतो, तशाच पद्धतीने जरा थांबून विश्रांती घेऊन काम केलं, तरी काही हरकत नाही. आपल्याला माहिती मिळालीच पाहिजे किंवा एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे, असा अट्टाहास न धरता, थोडा काळ मागे राहिलो, तरी आयुष्याचं असं काही नुकसान होत नाही, हे स्वतःला बजावलं पाहिजे. कारण, शेवटी आपण कासवाच्या गतीने जरी उद्या गेलो, तरी जिंकणार आहोत, हे स्वतःला सांगितलं पाहिजे.