नागपूर : (Devendra Fadnavis) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, अशी भूमिका मांडत लांगूलचालनाचा कळस गाठला आहे. यावरून सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis)
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "ज्या पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आहे, त्यांनी स्वराज्याचा विचार दिला. अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे भूमिपुत्र होते. त्यांनी कोणत्याही विषारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याच्या दृष्टीने टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे." (Devendra Fadnavis)
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "खरे म्हणजे त्यांना (हर्षवर्धन सपकाळ) लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे काम त्यांनी केले असून हे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केले. मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचे काम केले आणि खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. त्याचवेळी हजारों, लाखों हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान होता. त्याच्याशी तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणे, यापेक्षा जास्त लांगुलचालन आणि जोडे चाटणे मी जन्मात बघितले नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे." (Devendra Fadnavis)
हा नवा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही
"काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता असेल तर पक्षानेसुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी यावर त्यांची भूमिका सांगितली पाहिजे. हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचे संशोधन केले पाहिजे. ते लिहित असलेला हा नवा इतिहास महाराष्ट्र आणि भारत खपवून घेणार नाही," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
"छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी आणि आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावे. या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसच्या या विधानाला तुम्ही पाठिंबा देता का? तुमच्या कथित हिंदुत्वाच्या व्याख्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बसतो काय? घराबाहेर या, महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे राहा आणि स्पष्ट उत्तर द्या."
- आ. प्रवीण दरेकर
"ज्या टिपू सुलतानने हजारों हिंदुंवर अत्याचार केले, शेकडो मंदिरे लुटली आणि शेकडो महिलांवर अत्याचार करून त्यांचा छळ केला, अशा टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. ज्या टिपू सुलतानने इतिहासात खलनायक म्हणून काम केले त्याला नायक बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून सुरु असून हे निषेधार्ह आहे."
- नवनाथ बन, नगरसेवक, भाजप माध्यम प्रमुख
"क्रुरकर्मा टिपू सुलतानला आमच्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष संबोधनारा हर्षवर्धन सपकाळ मराठ्यांची औलाद असूच शकत नाही. ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत की, पाकिस्तान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत? काँग्रेस पक्षाने तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून काढून टाकले पाहिजे. नाहीतर, मुसलमानांच्या मतांसाठी तुम्ही आमच्या राजांचा अपमान करता हे यातून सिद्ध होईल."
- आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....