संघर्षशील दीपक

14 Feb 2026 12:33:13

संघर्षातून सेवेकडे वाटचाल करत इतरांना प्रेरणा देत, त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या दीपक थोरे यांच्या जीवनप्रवासाविषयी...

ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली नेवाशाची मातीत अंगी मुरलेल्या संघर्षाला आपला मित्र मानून पुढे जाणारे आणि यशाला नम्रतेने कवटाळणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे दीपक थोरे. आज ते ‌‘एलआयसी‌’मध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या यशामागे असलेली वाट काही सोपी नव्हती. वडील भारतीय हवाई दलात कार्यरत असल्याने दरवष बदली ठरलेलीच. दरवष नवे गाव, नवी शाळा, नवे मित्र, नवे शिक्षक आणि पुन्हा नव्याने स्वतःला सिद्ध करण्याची परीक्षा त्यांना द्यायला लागायची. नवीन शाळेत दाखल झाले की, वर्गातील शेवटचा बाक त्यांची वाटच बघत बसलेला असायचा. ओळख नसलेली वर्गखोली, अपरिचित वातावरण दरवष अनुभवायला मिळत असूनही, अभ्यासातून स्वतःला सिद्ध करायचे, हा एकच ध्यास दीपक यांनी आपल्या मनात कोरला होता.

चाचणी परीक्षा आली आणि त्यांची दखल घेणारे गुण मिळाले की, मग मात्र वर्गातील चित्र पूर्णपणे बदलायचे. प्रथम क्रमांक, शिक्षकांची दखल आणि मग पुढच्या बाकावर बसण्याची संधी.असा हा संघर्षाचा सिलसिला सलग दहा वर्षे सुरू राहिला. उराशी शिकण्याची आवड, जन्मजात तल्लख बुद्धिमत्ता आणि मेहनतीची शिदोरी यांच्या बळावर त्यांनी वर्गातील पहिल्या तीन क्रमांकांत राहण्याचा मान कधीच सोडला नाही. दहावीनंतर शिक्षणासाठी संगमनेर येथे येणे, बारावी पूर्ण करणे आणि ‌‘बीएस्सी‌’ पदवी मिळवणे, हा प्रवासही दीपक यांच्यासाठी तितकाच जिद्दीचा राहिला. वडील 15 वर्षांची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते ‌‘एसटी‌’ खात्यात नाशिक येथे नोकरीला लागले.

त्या काळात दीपक यांनी ‌‘आयएमआरटी‌’ महाविद्यालयात आपल्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यासोबतच त्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगलादेखील नंबर लागला. एकाच वेळी दोन वाटा, दोन जबाबदाऱ्या आणि सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, या सगळ्या धावपळीत त्यांनी ‌‘एलआयसी‌’ची परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले आणि विकास अधिकारी म्हणून निवड झाली.

पहिलीच नोकरी दीपक यांना नाशिकलाच मिळाली. हा आनंद शब्दांत मावणारा नव्हता. एकाच वेळी अभियंता आणि विकास अधिकारी होण्याचा मिळालेला मान हा क्षण आयुष्यभरासाठी त्यांच्या मनात कोरला गेला. दरम्यान, एक भाऊ, एक बहीण, वडिलांच्या नोकरीमुळे पुन्हा बदल्या झाल्या. पण, दीपक यांच्या कुटुंबाने नाशिक सोडले नाही.

कारण आता दीपक यांचे स्वप्न केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिले नव्हते. ‌‘एलआयसी‌’मधील नोकरीतून त्यांना केवळ आर्थिक स्थैर्यच मिळाले नाही, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी मिळाली.

सामान्य कुटुंबातील मुले-मुली, व्यवसायाची ओढ असलेले होतकरू तरुणांचा शोध घेणे, त्यांना संधी देणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविणे आणि उभे करणे हेच त्यांचे आयुष्यभरासाठी खरे काम बनले. दीपक यांनी स्वतःला 11 ते 5 या साच्यात बंद करून ते फक्त कागदावरचे अधिकारी राहिले नाहीत. प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन, मित्र अथवा नातेवाईकांशी बोलून, व्यवसाय कसा वाढेल याचा विचार करून, स्वतः वेळ देऊन त्यांनी अनेक संसारांना आधार दिला.

अनेकांना व्यवसायाची गोडी लावली, रोजगार निर्माण केला आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. आपल्या 36 वर्षांच्या नोकरीच्या प्रवासात दीपक यांनी जवळपास 450 विमा प्रतिनिधी व्यावसायिकांच्या माध्यमातून तब्बल 51 हजार पॉलिसीधारकांना विम्याचे छत्र देण्याचे काम केले. असंख्य ‌‘क्लेम‌’च्या माध्यमातून गरजेच्या वेळेस पॉलिसीधारकांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली.

सर्वांना सामावून घेण्याच्या या त्यांच्या चांगल्या वृत्तीमुळेच हजारो माणसे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्याशी कायमची जोडली गेली. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे समाधान, आत्मविश्वास आणि आनंद यातच दीपक थोरे यांनी आपला स्वतःचाही खरा आनंद शोधला. सर्वांसाठी धावून जाणे आणि मदत करणे ही वृत्ती अंगी असल्याने आजही त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये अहंकार आलेला नाही.

फक्त आपल्या हातून कोणाचे तरी आयुष्य माग लागून उजळून निघाले की, यातच ते समाधान मानतात. सततच्या संघर्षातून घडलेला हा प्रवास, सेवेतून समृद्ध झालेली दीपक यांची कारकीर्द आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले त्यांचे आयुष्य ही शिदोरी भावी पिढीच्या अंगी बाणवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात. त्यामुळेच दीपक थोरे म्हणजे केवळ एक अधिकारी नव्हे, तर अनेक स्वप्नांना उभे करणारा एक हक्काचा माणूस आहे. अशा या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून पुढील निरेोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!

- विराम गांगुर्डे
9404687608

Powered By Sangraha 9.0