दक्षिण कोरिया आणि स्त्री

13 Feb 2026 11:46:41

South Korean official remark

घटता जन्मदर वाढवण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे व्हिएतनाम किंवा श्रीलंकेमधून कुमारिका मुली आयात करून त्यांचा विवाह आपल्या देशातील ग्रामीण युवकांशी लावून द्यायचा, असे दक्षिण कोरियाच्या ‘जिंदो काऊंटी’चा प्रमुख किम ही-सू याने बैठकीत म्हटले. त्याच्या वक्तव्यावरून जगभरात वादळ उठले. या वक्तव्यावर श्रीलंकेकडून अद्याप कोणतेही प्रत्युत्तर आले नाही. मात्र, व्हिएतनामने या विधानाचा तीव्र विरोध दर्शवला. द. कोरियाच्या नेत्याचे हे म्हणणे म्हणजे श्रीलंका आणि व्हिएतनाम देशातील मुलींना वस्तूसारखे आयात करायचे? या मुली काय वस्तू आहेत का?

त्यामुळे किम ही-सू याच्या विधानावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर किम ही-सू याने नंतर सारवासारव केली की, त्याचा शब्द चुकला. त्याला ‘मुली आयात करा,’ असे म्हणायचे नव्हते; तर ‘त्या देशातील मुलींचा विवाह दक्षिण कोरियातील ग्रामीण भागातील युवकांशी करून द्या’ असे म्हणायचे होते. पण, ते देश आणि त्या देशातील मुली काय रस्त्यावर पडलेल्या आहेत? की, या मुलींना त्यांच्या देशातून उचलायचे आणि तडक द. कोरियाच्या ग्रामीण भागात नेऊन त्यांचा विवाह करून द्यायचा? या मुली माणूसच आहेत ना? त्यांनाही भावना असणारच. मग, त्यांची इच्छा-अनिच्छा, कसलीही तमा न करता त्यांचा विवाह द. कोरियाच्या ग्रामीण भागातील पुरुषांशी लावून द्या, असे बिनदिक्कत किम ही-सू कसे काय बोलू शकला?
 
असो. ज्यांना द. कोरियामधली महिलांची सद्यस्थिती माहिती आहे, त्यांना किम ही सू याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटणारच नाही. कारण, द. कोरिया या देशात महिलांबाबत अशाच टिप्पण्या-वादविवाद सहज केले जातात. २०१० साली द. कोरियामधल्या ‘इल्बे’ नावाच्या वेबसाईटचा याबाबत आवर्जून उल्लेख करावा लागेल. ही वेबसाईट द. कोरियामध्ये लोकप्रिय झाली. वेबसाईटचा मजकूर काय, तर महिलांविषयक कमालीचा तिरस्कार. या वेबसाईटवरचे विधान, मत खोडून टाकण्यासाठी द. कोरियामध्ये २०१५ साली ‘मेगैलिया’ नावाची एक कट्टर स्त्रीवादी संघटना उभी राहिली. ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ हा संघर्ष देशभर पेटवण्यामध्ये या दोन्ही संघटनांनी कोणतीच कसर बाकी सोडली नाही.
 
यामुळे द. कोरियातील आधीचीच कठोर पुरुषसत्ताक समाज पद्धती आणखीन कठोर झाली. मुलींना घराबाहेर पाठवले, स्वयंरोजगाराच्या संधी दिल्या, तर त्या हाताबाहेर आणि समाजाविरोधात जातील, असा गैरसमज समाजात पसरला. त्यामुळे स्त्रियांना संधी नाकारणे, त्यांचे दमन करणे, शोषण करून त्यांना ताब्यात ठेवणे, या अशा कुकृत्यामध्ये द. कोरियाचा समाज पुढे राहिला. त्याची प्रतिक्रिया म्हणून अन्याय-अत्याचाराच्या विरोधात महिला आणखीन पेटून उठल्या. स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या भूमिका नाकारण्याकडे स्त्रियांचा कल वाढू लागला.
 
‘बी ४’ नावाच्या संघटनेने तर महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली द. कोरियाच्या समाजव्यवस्थेला हादरे दिले. पुरुषांवर प्रेम करणे, विवाह करणे आणि मुलांना जन्म देणे या गोष्टी न करता, आपले जीवन मन मानेल तसे जगावे, मौज करावी, अशी या संघटनेची संकल्पना. या सगळ्यासाठी पैसे मिळवून देणारी नोकरी किंवा कौशल्य आले पाहिजे, या हेतूने दक्षिण कोरियातील महिला जिद्दीने शिकू लागल्या, कला-कौशल्य प्राप्त करू लागल्या. जगभरात प्रशिक्षण कौशल्यामुळे जितके म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध आहेत, त्या सर्वांमध्ये द. कोरियाच्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इथल्या पुरुषवर्गाचे म्हणणे, महिला काम करतात म्हणून पुरुषांना नोकरी मिळत नाही.
 
दुसरीकडे मुली शिकल्या की, रोजगारासाठी शहरामध्ये तळ ठोकतात. पुन्हा त्या गावी जात नाहीत. यातल्या अनेक मुली निश्चय करतात की, विवाह करायचा नाही. केला तरी शहरातील मुलासोबतच करायचा; पण सगळ्याच मुलींना शहरातील मुले लग्नासाठी कसे मिळतील? त्यामुळे त्यांचा विवाह होत नाही आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील युवकांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. या सगळ्यामुळे द. कोरियामध्ये लिंगभेद वाढला आहे. व्हिएतनाम आणि श्रीलंका देशातील मुलींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या किम ही-सू याचा निषेध.
Powered By Sangraha 9.0