Sheikh Hasina : शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? सत्तेवर येताच 'बीएनपी'ने केली मागणी

13 Feb 2026 20:19:46

Sheikh Hasina

मुंबई : (Sheikh Hasina) बांगलादेशात नुकतेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीन (BNP) शुक्रवारी मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर बीएनपीने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर खटला चालवता यावा यासाठी त्यांच्या भारतातून प्रत्यार्पणाची पुन्हा एकदा मागणी केली आहे.

बांगलादेशमध्ये बीएनपीच्या विजयानंतर काही वेळातच पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य सलाउद्दीन अहमद म्हणाले की, त्यांचा पक्ष अधिकृतपणे शेख हसीना यांच्यावर खटला चालवण्यासाठी त्यांना बांगलादेशाकडे प्रत्यार्पित करावे अशी विनंती भारताकडे करेल. पीटीआयच्या वृत्तानुसार, "परराष्ट्र मंत्र्यांनी यापूर्वीच त्यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा मांडला आहे, आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो. आम्ही कायद्यानुसार त्यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. हा दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील विषय आहे. आम्ही भारत सरकारकडेही खटला चालवण्यासाठी त्यांना (शेख हसीना) बांगलादेशात परत पाठवावे अशी विनंती देखील केली आहे," असे सलाउद्दीन अहमद म्हणाले.

बांगलादेशाला भारतासह शेजारच्या सर्व देशांबरोबर सामान्य संबंध हवे आहेत, असे अहमद म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी हे संबंध समानतेवर आधारित असले पाहिजेत यावर भर दिला. "आम्हाला भारतासह सर्व देशांबरोबर परस्पर आदर आणि बरोबरीचा दर्जा याच्या आधारावर उभारलेले मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत," असे ते म्हणाले. शेख हसीना यांनी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात पार पडलेल्या निवडणुका बोगस असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बीएनपीकडून ही मागणी करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0