रोजच्या जीवनात लेखिका, कवयित्री आणि व्यावसायिक अशा विविध भूमिका साकारणार्या आणि महिलांनी व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी अहोरात्र झटणार्या नेहा यांच्याविषयी...
नेहा गोसावी या मूळच्या बुलढाण्याच्या. वडिलांची बदलीची नोकरी असल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले आहे. गावांमध्ये अनेक तरुणी विविध व्यवसाय करतात. व्यवसायवाढीचे योग्य ज्ञान नसल्याने त्यांच्या व्यवसायात म्हणावी तशी वाढ होत नाही. यासाठी नेहा यांनी व्यवसायात यश मिळवण्यासाठी धडपड करणार्या तरुणींसाठी काहीतरी करण्याचे ठरवले. त्यासाठी आपले शिक्षण या महिलांच्या कामांसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महिलांना डिजिटल मार्केटिंगसह, तांत्रिक गोष्टी हाताळण्याचे प्रशिक्षण त्या देऊ लागल्या आणि त्यातून त्यांच्या व्यवसाय सल्लागाराचा प्रवास सुरू झाला.
नेहा यांचा जन्म खामगाव येथे झाला. वडिलांची नोकरीमध्ये बदली होत असल्याने हिंगणघाट, बुलढाणा, नागपूर याठिकाणी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. नागपूरमधूनच पदव्युत्तर पदवी संपादन करत संगणक क्षेत्रात नोकरी स्वीकारली. लग्न झाल्याने पुण्यात आल्यावर संसार आणि नोकरी यात संसाराला वेळ देता यावा म्हणून नोकरी सोडली. संसारात लक्ष देताना गावाकडील महिलांसाठी विशेषतः विविध व्यवसाय करू इच्छिणार्या महिलांसाठी आपण काहीतरी करायला हवे, हा विचार काही केल्या डोयातून जात नव्हता. वडिलांची बदलीची नोकरी असल्याने नेहा यांचे वास्तव्य अनेक गावांमध्ये होते. गावातील महिला खूप कष्टाळू आहेत, तसेच त्या खूप कल्पक दृष्टीच्या आहेत, हे नेहा यांना जाणवले. अशा महिलांसाठी त्यांचा व्यवसाय वाढावा, यासाठी काहीतरी करायला हवे; या विचाराने झपाटलेल्या नेहा यांनी महिलांना डिजिटल सपोर्ट देण्याचा निर्णय घेतला. संसार सांभाळत जमेल तसे महिलांना फोनवरून संभाषण करून त्यांना व्यवसायवाढीत कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यावर मार्ग कसा काढायचा, याचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
या माध्यमातून त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. लहानपणापासून त्यांना लिखाणाची आवड होती. त्यामुळे कविता करणे, लेख लिहिणे, गोष्टी लिहिणे, कादंबरी लिहिणे हे त्यांचे छंददेखील त्यांनी जोपासले. कामातून वेळ काढून त्या आवर्जून लिखाण करतात. आपल्या वडिलांनादेखील त्यांनी लिहिते केले. वडिलांनी लिहिलेले सर्वांना वाचायला मिळावे, यासाठी त्यांनी वडिलांनी लिहिलेल्या पुस्तकांची निर्मिती केली. पुस्तकांच्या माध्यमातून वडिलांना अनोखी भेट त्यांनी दिली. अनेक लेखक चांगले लिहितात; परंतु ते प्रकाशित होत नाही. यासाठी त्यांनी प्रकाशन संस्था काढली. आजच्या पिढीला चांगले वाचायला मिळावे, यासाठी त्या प्रयत्न करत असतात. त्या स्वतः देखील कविता वाचन करतात. कामाचा कंटाळा आला की, लिखाण काम करतात.
त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांचे ‘शब्दवेडी नेहा’ असे नामकरण केले आहे, तर काहीजण ‘डिजिटल नेहा’ म्हणूनही त्यांना संबोधतात.
आपल्या कार्यात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी त्या प्रयत्न करीत असतात. त्यांनी दहाजणांची टीम तयार केली आहे. कोणाच्याही व्यवसायात अडचणी आल्या की, ही टीम त्यांना मदत करते. सध्याच्या ‘एआय’च्या काळात ‘डिजिटल साक्षर’ करण्याचे काम त्या करतात. डिजिटल मार्केटिंग, मोबाईल अॅप्लिकेशन, वेबसाईट अशा सुविधा त्या देतात आणि महिला व्यावसायिकांना या सुविधांचे प्रशिक्षण देतात, जेणेकरून महिलांना आपल्या व्यवसायात प्रगती करता येईल. आपल्या लिखाणाचा वापर व्यवसायवाढीसाठी करतात. व्यावसायिक भगिनींची कथा त्या तांत्रिक माध्यमांचा वापर करून जगाच्या समोर आणतात. समाजमाध्यमांवर व्यवसाय कसा वाढवावा, याचा वापर करतात.
आतापर्यंत आयुर्वेदिक उत्पादन करणार्या, डॉटर, भांडी बनवणारे, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स अशा विविध क्षेत्रात व्यवसाय करणार्या महिलांना नेहा यांनी व्यवसायवाढीसाठी मदत आणि सहकार्य, तसेच तांत्रिक आणि कौशल्य मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, यामुळे या बहुतांश महिलांचा व्यवसाय ८० टक्क्यांनी वाढला. विविध व्यवसाय नेटवर्कच्या माध्यमातून त्या विविध महिलांना भेटत असतात. आपला संसार सांभाळताना अनेक महिलांचा संसार ताठ मानेने उभा करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक संस्थांनी गौरविले आहे.
"महिला संसाराचे नियोजन उत्तम पद्धतीने करू शकतात, तर त्या व्यवसायाचे नियोजनदेखील करू शकतात. फक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे,” असे नेहा नेहमी सांगतात. महिलांना त्यांच्या व्यवसायात आघाडीवर नेण्याचा ध्यास घेतलेल्या नेहा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
७२७६०१५०४६