अमेरिकन करावर करारी मात

    13-Feb-2026
Total Views |

India-US Trade Deal

अमेरिका आणि भारतादरम्यान झालेला करार हा केवळ व्यापारहितापुरता मर्यादित नसून, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्दी धोरणाचे, संयमित नेतृत्वाचेही दर्शन घडविणारा ठरला आहे. तेव्हा या व्यापार करारानिमित्ताने दोन्ही देशांच्या, नेतृत्वाच्या भूमिका, ध्येय-धोरणे आणि एकूणच व्यवस्थापकीय कौशल्य यांचा ऊहापोह करणारा हा लेख...

अमेरिका-भारत यांच्या दरम्यान नव्याने झालेल्या करकपातीच्या करारावर उभय देशांपेक्षा त्यांचे प्रमुख म्हणून डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व म्हणून प्रकर्षाने पाहिले गेले. त्यामुळे या आर्थिक मसुद्याला मुत्सद्देगिरीचा आयाम जागतिक स्तरावर मिळत गेला. तसे होणे स्वाभाविकसुद्धा होते. कारण, अमेरिकन सिनेट असो वा भारतीय संसद, या उभय सभागृहांपासून जगात लोकशाही मानणार्‍या या दोन्ही देशांमध्ये कर-आकारणी, वाढीव अतिरिक्त कर व शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त कर-आकारणीप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पुढाकारासह घेतलेली माघार घेतली. म्हणजे या सार्‍या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांपेक्षा ट्रम्प यांच्या मनमानीवर मोदींच्या मुत्सद्देगिरीने मात केल्याचे उभ्या जगाने पाहिले.

यानिमित्ताने अर्थशास्त्र आणि आर्थिक व्यवहार- उलाढाल, युद्धजन्य व आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक पातळीवरील धोरणात्मक निर्णयांची परिणामकारकता, शर्थीची मुत्सद्देगिरी व कूटनीती, व्यक्तिगत व अतिरेकी स्वरूपाची महत्त्वाकांक्षा, संयमित- संतुलित आणि एकाग्रपणे घेतलेले निर्णय व त्यातील सातत्य, संभाषण-व्यवहाराला नेमकेपणा व चपखलतेची दिलेली साथ आणि त्याला मिळालेला प्रतिसाद, व्यक्तिमत्त्वासह नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेची जागतिक पातळीवरील कसोटी, देश आणि देशवासीयांप्रती निष्ठा आणि परस्परांवरील आदरावर आधारित विश्वास या विविध प्रमुख मुद्द्यांवर जगाने ट्रम्प, मोदी या उभयतांना पाहिले, परखले हे यासंदर्भात उल्लेखनीय ठरले.

व्यवस्थापनाच्या संदर्भात व्यवस्थापकीय क्षेत्रात मोठ्या जबाबदारीसह काम करणार्‍या व्यक्तीमध्ये वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व हे गुण विशेष विशेषत्वाने महत्त्वाचे ठरतात. यासंदर्भात तुलनात्मक स्वरूपात सांगायचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय संबंधांसंदर्भात असणारे रूढ व प्रस्थापित रूढी आणि संकेत, अमेरिका-भारत परस्पर संबंधांना असणारी दीर्घकालीन पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधांमधील मैत्रीची महत्ता व मान्यता इ. सर्व संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पायदळी तर तुडविलेच. शिवाय, त्याला जोड दिली ती अप्रासंगिक, बेताल वक्तव्ये आणि मनमानीपणाची!

याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेत- वेळेनुसार व समयानुकूल-संयमित भूमिका घेत परिस्थिती हाताळली, हा फरक प्रामुख्याने लक्षात येतो. बदलती आंतरराष्ट्रीय परिस्थिती, अल्पकालीन; पण परिणामकारक छेडलेल्या युद्धात पाकिस्तानला दिलेला चाप, आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक-अस्थिरता व अनिश्चितता असताना पण देशात निर्माण केलेले सबळ अर्थकारण, औद्योगिक विकासाचा राखलेला कायम स्तर, आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणांच्या संदर्भात घेतलेली ठोस भूमिका व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि भारतीयांच्या आर्थिक प्रगतीबरोबर भारतातील शेती आणि शेतकरी, कृषी उत्पादन, मत्स्योत्पादन इ. संदर्भात कुठलीही तडजोड न करता, देशहिताला सर्वोपरि ठेवून घेतलेले निर्णय, याचीच परिणती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली मनमानी बोली, शैली व देहबोली सर्व बाजूला ठेवून पश्चातबुद्धीने का होईना; पण भारतावरील अतिरिक्त, अवास्तव आणि अवाजवी कर सपशेल मागे घेण्याचा निर्णय आणि करार करण्यात पुढाकार घेतला.

व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांमध्ये विशेषत: उच्च व जबाबदारीच्या पदांवर काम करणार्‍यांमध्ये वैचारिक ठामपणा, विलक्षण आकलनशक्ती, भावनांवर नियंत्रण ठेवणारी बुद्धिमत्ता, आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असणारी समतोलता, संपूर्ण आकलनासह निर्णयक्षमता, प्रसंगी विरोधाचा सामना करून आपले म्हणणे मांडून अपेक्षित यश गाठण्याची मानसिकता व प्रवृत्ती व या सार्‍यांचा परिस्थितीनुरूप ताळमेळ घालण्याचे कौशल्य आवश्यक ठरते. या व्यवस्थापकीय कसोट्यांवर भारत आणि मोदी यांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यशस्वीपणे मात केली, हे विशेष.

व्यवस्थापन पद्धती आणि शैलीमध्ये कुठल्याही मोठ्या व महत्त्वाच्या व्यापार-व्यवसायविषयक करार-मदारात चर्चा, वाटाघाटी हे मुद्दे अपरिहार्यपणे महत्त्वाचे ठरतात. विशेषत: अशाप्रकारचे करार आंतरराष्ट्रीय पातळीवरील असल्यास त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. अशा करारांमध्ये विविध व विभिन्न देशांचे व्यापारी व सामरिक हित सामावले असते, हे यामागचे महत्त्वाचे कारण ठरते. अशा व्यापारी कराराच्या प्रक्रियेत उच्च पातळीवर व नेतृत्वासह चर्चा करणार्‍या व्यक्तींकडे संवाद कौशल्यांच्या जोडीलाच उच्चस्तरावरील सातत्यपूर्ण एकाग्रता, लवचीकता, विवेकशीलता, सामंजस्य व त्याच वेळी ठामपणाची जोड, आपला मुद्दा मांडतानाच प्रसंगी पुढच्याची अडचण समजून घेणे, विविध पैलूंचा गांभीर्याने व साधक-बाधक पद्धतीने विचार करतानाच आपले ‘स्व’ आणि स्वहिताला बाधा पोहोचू नये अशी खबरदारी घेणे, याबाबी महत्त्वाच्या ठरतात. वरील महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-मोदी यांच्या दरम्यान झालेल्या चर्चा-बैठकी, संवाद-प्रतिवाद इ.चा ढोबळमानाने विचार केल्यास काय दिसते?

ट्रम्प यांनी अगदी सुरुवातीपासूनच भारताकडून होणार्‍या निर्यातीवर अचानक व आकस्मिकपणे अतिरिक्त कर लावला. यासाठी उभ्या जगापुढे स्पष्ट केले की, मोदी सरकार युक्रेनपासून पाकिस्तानपर्यंतच्या विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांची ‘री’ ओढत नसल्याने असे मुद्दाम करण्यात येत असल्याचे उद्दामपणे जाहीर केले. याला प्रत्युत्तर-प्रतिसाद म्हणून मोदींनी कुठल्याही दबावाला बळी न पडण्याची आपली भूमिका जगजाहीर केली व त्यावर ते ठाम राहिले. व्यावसायिक-व्यवस्थापनात आपले मुद्दे ठामपणे मांडतानाच त्याला धीरोदात्तपणे व ठोस भूमिकेची जोड देणे फार महत्त्वाचे ठरते. त्यातून संबंधित नेतृत्वाचे विषयाशी निगडित धीरोदात्त गांभीर्य स्पष्ट होते व त्यातून वाटाघाटी-चर्चेची व्यावसायिक इतिश्री संबंधितांच्या फायद्यात होते, हे विसरून चालणार नाही. नरेंद्र मोदींमधील हे सारे गुण यादरम्यान प्रकर्षाने स्पष्ट झाले.

दरम्यान, ट्रम्प यांच्या अवास्तव व अवाजवी दडपण-डरकाळ्यांना भीक न घालता, मोदींनी युरोपीय देश-समूहांशी धूर्तपणे व्यापारी करार करून आणला. मोदींची ही व्यापारी-व्यावसायिक चाल बेजोड ठरली. यातून ट्रम्प आणि त्यांच्या अमेरिकी दडपणांना भीक न घालता, भारत आणि युरोपीय देशांनी परस्पर व्यापार संबंधांना मोठी चालना देण्याचे करार केले. यातूनच, ट्रम्प यांचे सारे मनसुबे ढासळले व त्यांनी अखेर करारासाठी पुढाकार घेतला. ट्रम्प-मोदी कराराची मोठी फलश्रुती म्हणजे, अगदी सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदींनी भारतीय कृषी, मत्स्योत्पादन क्षेत्राला संरक्षण देण्याचे ट्रम्प यांच्याकडून मान्य करवून घेतले. याशिवाय, सारे वाढीव कर ट्रम्प यांनी मागे घेतल्याने त्यांची पिछेहाट झाली, तर मोदींसह भारत वरचढ ठरला. यामागे अशी व्यवस्थापन धोरणाची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरली.


दत्तात्रय आंबुलकर


(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)

९८२२८४७८८६