बैतूल कारागृहातील ‘कोठडी क्र. १’ आणि श्रीगुरुजींच्या स्मृती

    13-Feb-2026
Total Views |

Shri Guruji
 
गांधीहत्येच्या आरोपानंतर लादलेल्या संघबंदीअंतर्गत रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्रीगुरुजी यांना मध्य प्रदेशच्या बैतूल कारागृहातील ‘कोठडी क्रमांक १’मध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आले होते, तो कक्ष आजही एक लघू स्मारक म्हणून रिक्त ठेवण्यात आला आहे. त्या कक्षात श्रीगुरुजी यांचे छायाचित्र लावलेले आहे आणि त्यांच्या कारागृहातील वास्तव्यासंदर्भातील थोडयात माहिती भिंतीवर लिहिलेली आहे. सन २०१७ मध्ये सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही या कक्षाला भेट देऊन श्रीगुरुजींना श्रद्धासुमने अर्पण केली होती. आज विजया एकादशी, श्रीगुरुजींची तिथीनुसार जयंती. त्यानिमित्ताने बैतूल कारागृहातील श्रीगुरुजींच्या स्मृतींविषयी...
 
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन नेहरू सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. श्रीगुरुजींसह सुमारे २० हजार स्वयंसेवकांना अटक करण्यात आली होती. त्या काळातील प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र ‘केसरी’चे संपादक केतकर हे सरकार आणि संघ यांच्यात संवाद साधण्याचे काम करीत होते. केतकर यांनी सिवनी कारागृहात श्रीगुरुजींची भेट घेतली होती आणि संघाने चालवलेला सत्याग्रह मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी त्यांना केली होती. श्रीगुरुजींनी परिस्थितीचा विचार केला आणि दि. २२ जानेवारी रोजी सत्याग्रहाचे प्रभारी महावीर यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतरच सरकारने काहीसा दिलासा घेतला.
 
हेही एक स्मरणीय तथ्य आहे की, पं. नेहरूंच्या हट्टी भूमिकेमुळे १९४८ मध्ये संघावर लादलेली बंदी हटवण्यासाठीचा मसुदादेखील बैतूल कारागृहातील ‘कोठडी क्रमांक १’मध्येच तयार करण्यात आला होता. वृत्तपत्र ‘द ट्रिब्यून’ने दि. २२ जानेवारी १९४९ रोजी संघावरील बंदी अनैतिक असल्याचे नमूद करत लिहिले होते, ‘आता नेहरू सरकारने संघावरील बंदी उठवावी.’ संघाच्या या आंदोलनाला देशभरातील जनतेकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहून नेहरू सरकार घाबरले होते. सरकारने तातडीने पाऊल उचलत पं. मौलिचंद्र शर्मा यांना संघाशी चर्चा करण्यासाठी पुढे केले. तोपर्यंत श्रीगुरुजींना सिवनी कारागृहातून बैतूल कारागृहात हलविण्यात आले होते. दि. १० जुलै रोजी मौलिचंद्र शर्मा हे श्रीगुरुजींची भेट घेण्यासाठी बैतूल कारागृहात आले होते. बैतूल जेलमधील श्रीगुरुजी आणि मौलिचंद्र शर्मा यांच्यात झालेल्या चर्चेच्या आधारेच नेहरूंनी १२ जुलै रोजी संघावरील बंदी उठवली आणि १३ जुलै रोजी सकाळी श्रीगुरुजींना बैतूल कारागृहातून मुक्त करण्यात आले (संदर्भ - श्रीगुरुजी समग्र, खंड २, पृष्ठ ४५).
 
बैतूल जेलमधून सुटका होताच श्रीगुरुजी तत्काळ ‘जीटी एसप्रेस’ने नागपूरला रवाना झाले. त्यांच्या बैतूलमधील प्रस्थानाच्या वेळी घडलेली एक घटना संघाच्या कार्यक्षेत्रात आजही आवर्जून सांगितली जाते. असे म्हणतात की, बैतूल स्थानकावर निरोप देण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकांना श्रीगुरुजी म्हणाले होते, "ज्या दिवशी बैतूलमध्ये संघकार्य भक्कम आणि समृद्ध होईल, त्या दिवशी संपूर्ण देशात संघविचार बळकट होईल.”
 
बैतूल कारागृहात श्रीगुरुजी कैदेत असलेला काळ दुःखद असला, तरी ऐतिहासिक होता. या कठीण अग्निपरीक्षेच्या काळात त्यांनी अद्भुत संयम दाखवत बैतूल जेलमधून पत्रे व संवाद यांच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवकांचे मनोबल टिकवून ठेवले आणि देशात राष्ट्रभावनेचा प्रवाह कायम ठेवला. संपूर्ण देशातील लाखो स्वयंसेवक आणि सामान्य जनता श्रीगुरुजींच्या संदेशांसाठी बैतूल कारागृहाकडे आशेने पाहत होती. त्या काळात बैतूल हे देशाच्या धडकनांचे केंद्र बनले होते. श्रीगुरुजी बैतूल कारागृहात बंदी असताना त्यांनी देशभरात असे वातावरण निर्माण केले होते की, केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनीही दि. २७ फेब्रुवारी १९४८ रोजी पंडित नेहरूंना पत्र लिहिले होते. त्या पत्रात ते म्हणतात, "बापूंच्या हत्येच्या तपासातील प्रगतीकडे मी जवळजवळ दररोज लक्ष देत आहे. सर्व प्रमुख आरोपींनी त्यांच्या हालचालींबाबत सविस्तर आणि तपशीलवार जबाब नोंदवले आहेत. त्या जबाबांतून हे स्पष्टपणे समोर येते की, या संपूर्ण प्रकरणात संघ कुठेही गुंतलेला नाही.”
 
श्रीगुरुजींना बैतूल कारागृहात अनेक प्रकारे छळले गेले होते. त्यांना दिले जाणारे अन्न, कपडे आणि अंथरूण अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. मात्र, या कष्टांमुळे, छळामुळे किंवा हलया प्रतीच्या अन्न-वस्त्रांमुळे श्रीगुरुजींवर कोणताही परिणाम होत नव्हता. ते निःस्पृह योगी होते, भगवे वस्त्र न घातलेला संन्यासीच जणू! बैतूल जेलमध्ये मिळालेल्या त्या सर्व यातनारूपी विषाला त्यांनी नीलकंठाप्रमाणे आपल्या कंठात सामावून घेतले होते. बैतूल कारागृह त्यांच्यासाठी एक साधना केंद्र बनले होते.
 
श्रीगुरुजींचा बैतूल जेलमधील काळ हा संघाच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरला. त्या काळात त्यांनी राजकारणातील शुचिता, पवित्रता आणि समाजासाठीच्या योगदानाबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी विस्तृत पत्रव्यवहार केला होता. ही सर्व पत्रे नंतर ‘Justice on Trial’ या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली. श्रीगुरुजींनी तत्कालीन नेहरू सरकारकडे स्पष्ट मागणी केली होती की, "संघाविरोधात जर काही ठोस पुरावे असतील, तर ते जाहीर करावेत, अन्यथा, बंदी उठवून स्वयंसेवकांना राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देऊ द्यावे.”
 
बैतूल कारागृहात असताना श्रीगुरुजी त्या काळातील उदारमतवादी नेते टी. आर. व्ही. शास्त्री यांच्या सतत संपर्कात होते. शास्त्रीजींनी नेहरू सरकार आणि संघ यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावली होती. त्या काळातील जवाहरलाल नेहरूंचे आत्ममुग्ध, इंग्रजी धाटणीचे सरकार संघावर विविध प्रकारचे आरोप करत होते. मात्र, श्रीगुरुजींनी तुरुंगात असतानाच संपूर्ण राष्ट्रासमोर हे स्पष्ट केले की, संघ हा केवळ राष्ट्रीय विचारांवर आधारलेला, संस्कृतीकेंद्रित आणि समाजाभिमुख संघटन आहे. त्या काळातील तत्कालीन गृहसचिव आर. एन. बॅनर्जी यांनी गांधीहत्येत संघाच्या सहभागाच्या संदर्भात सार्वजनिकपणे सांगितले होते की, "सखोल, व्यापक आणि काटेकोर तपासणीत गांधीजींच्या हत्येत संघाची रत्तीभरही भूमिका आढळून आलेली नाही. म्हणूनच, कारागृह परिसरात असलेल्या या ‘गुरुजी कक्ष’चे जतन करून ते स्मारक म्हणून सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे.”
 
 
 डॉ. प्रविण गुगनानी
 
 
 
                                                                                                                                                                               संदर्भ -
१) श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड २, पृष्ठ २-१०,
२) पहिली अग्निपरीक्षा - मामा माणिकचंद्र वाजपेयी, पृष्ठ २३-२४,
३) Sardar Patel's Correspondence, खंड ६, पृष्ठ ५६)