'अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरून फेकून दिले,' असा जळजळीत आरोप पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकताच तेथील संसदेत केला. एकप्रकारे अमेरिकेने आम्हाला फसवल्याचा आरोपच पाकिस्तानने केला. पण, आसिफ यांच्या वक्तव्याने अमेरिकेपेक्षा पाकिस्तानचीच राजकीय दिवाळखोरी उघडी पडली आहे. कारण, अमेरिकेने वापरल्याचे रुदन करणारा हा तोच देश आहे, ज्याने दशकानुदशके अमेरिकेच्या दारात हजेऱ्या लावल्या, डॉलर्स उकळले आणि महाशक्तींच्या युद्धांत स्वतःहून उडीदेखील घेतली.
अमेरिकेचा स्वाथ इतिहास काही लपलेला नाही. स्वार्थासाठी मैत्री करणे, गरज संपली की, हात झटकणे ही तिची जुनी नीती. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाविरोधी आघाडी उभारायची असेल, तर पाकिस्तानला जवळ करायचे; ‘9/11’ नंतर दहशतवादाविरोधी युद्ध छेडायचे असेल, तर त्याच पाकिस्तानला पुन्हा गळाला लावायचे आणि काम झाले की, अंतर ठेवायचे, हे अमेरिकेने पाकिस्तानबरोबर केले आहेच. मात्र, अमेरिकेचा असा स्वाथ व्यवहार जगाने याआधी अनेकदा अनुभवला होताच. त्यामुळे प्रश्न असा आहे की, हा स्वभाव जगाला ज्ञात असताना पाकिस्तानने अमेरिकेच्या सापळ्यात पाय अडकवलाच का?
अफगाणिस्तानातील सोव्हिएत रशियाविरोधी लढाईत, पाकिस्तानने स्वतःला अमेरिकेचा ‘फ्रंटलाईन स्टेट’ म्हणून मिरवले होते. अमेरिकेच्या जीवावरच मुजाहिद्दीनांना शस्त्रे, प्रशिक्षण आणि आश्रय देताना त्यांना भविष्यातील परिणामांचा अंदाज पाकिस्तानला आला नव्हता काय? ‘9/11’ नंतर दशतवादविरोधी लढ्याच्या नावाखाली पुन्हा अमेरिकेच्या गोटात केलेला प्रवेश असो, उकळलेली अब्जावधी डॉलर्सची मदत असो, त्यावेळी अमेरिकेचा स्वाथ चेहरा का पाकिस्तानने नजरेआड केला? की, डॉलर्सच्या मोहाने पाकिस्तानी नेत्यांची राष्ट्रावरची मायाच पातळ झाली होती?
अलीकडे आसिफ संसदेत म्हणाले की, “अमेरिकेच्या स्वाथ नीतीमधून आम्ही काहीच शिकलो नाही.” आसिफ यांची ही कबुली म्हणजे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची कहाणीच. कारण, अमेरिकेच्या सख्याचे चटके जगातील इतर देशांनी सोसले आणि सावध झाले. पण, पाकिस्तानने मात्र त्याच धोरणाला चिकटून राहणेच पसंत केले. अमेरिकेच्या भोवती पिंगा घालणाऱ्या सध्याच्या लष्करी नेतृत्वाला जबाबदार धरण्याऐवजी आसिफ यांच्या सरकारनेच बढत्या दिल्या. पदच्युत करण्याऐवजी सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान देण्यात आले. त्यामुळे आसिफ यांचा आजचा आक्रोश ही केवळ आत्मवंचनाच ठरते.
दशकानुदशके ‘जिहाद’च्या नावाखाली अतिरेक्यांना खतपाणी घालणे, एका हाताने अमेरिकेकडून मदत घेणे आणि दुसऱ्या हाताने कट्टरतेला पोसणे ही पाकिस्तानची दुहेरी नीती. त्यातून दहशतवादाचे जाळे तयार झाले. आज त्याच जाळ्यात पाकिस्तान पुरता अडकला आहे. बॉम्बस्फोट, अंतर्गत अस्थिरता, अर्थव्यवस्थेची पडझड हे सर्व त्यांच्या स्वतःच्या धोरणांचेच फळ आहे.
यात पाकिस्तानी जनतादेखील या खेळाची निरपराध प्रेक्षक नाही. कट्टरतेवरील भाषणांवर टाळ्या देणारी, अतिरेक्यांना नायक मानणारी आणि द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी घालणारी मानसिकता समाजात खोलवर रुजलेली आहे. धार्मिक उन्मादाच्या घोषणांनीच पाकिस्तानच्या मतपेट्या भरल्या गेल्या. त्यामुळे आज जे संकट उभे आहे, त्यात सत्ताधाऱ्यांइतकीच जनतेचीही जबाबदारी आहे.
अमेरिकेवर टीका ही करायलाच हवी. कारण, महाशक्तीचा दर्प दाखवत इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे, युद्धे पेटवणे आणि नंतर दूर जाणे ही तिची परंपरा आहे. पण, त्या स्वाथ खेळात सामील होण्याचा निर्णय पाकिस्तानचाच होता. अमेरिकेवर बोट ठेवताना उरलेली चार बोटे स्वतःकडे वळलेली आहेत, याचे विस्मरण आसिफ यांना झालेले आहे.
पाकिस्तानने दशकानुदशके जे पेरले, तेच आज उगवत आहे. पाकिस्तान जेव्हा कट्टरतेची बीजे, दहशतवाद आणि स्वार्थाची पेरणी करत होते, त्यावेळी ते सारेच गोड वाटले. मात्र, आज त्याची फळे चाखताना ती कडू असली, तरी कर्माचेच भोग असल्याने भोगावी लागणारच आहेत. कर्माचे नियम पाकिस्तानलाही लागू आहेत. त्यामुळे आता आक्रोश करून काही साध्य होणार नाही. विषाच्या झाडाला अमृताची फळे आल्याचे कधी ऐकले आहे काय?
- कौस्तुभ वीरकर