॥सौंदर्यलहरी भाष्य भाग १४॥

12 Feb 2026 13:31:46
Kundalini Shakti
 
सुधाधारासारैश्चरणयुगलान्तर्विगलितैः
प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय-महसः|
अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं
स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि॥१०॥
 
या लोकात आचार्य शंकराचार्य भगवती श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या (कुंडलिनी शक्तीच्या) अवरोहण प्रवासाचे वर्णन करत आहेत. मागील लोकात षट्‌‍चक्रांचे भेदन करत कुंडलिनीने मूलाधार चक्रातून, सहस्रार चक्राकडे झेप घेतली. हे करत असताना तिने साधकाला अनेक सिद्धी प्रदान केल्या. सहस्रार चक्रात या कुंडलिनीचे साधकाच्या देहातील सदाशिवतत्त्वाशी मिलन झाले आणि या मिलनाने तृप्त होऊन, आता ती सहस्रार चक्रातून परत आपल्या मूळ स्थानी, म्हणजेच मूलाधार चक्रात येत आहे.
 
आचार्य म्हणतात, हे माते! तुझ्या चरणांतून स्रवणाऱ्या अमृताच्या धारेने तू संपूर्ण प्रपंचाला (साधकाच्या शरीरातील ७२ हजार नाड्यांना) तृप्त करतेस. त्यानंतर तू चंद्रमंडळाच्या दिव्य तेजातून खाली येतेस आणि आपल्या मूळ भूमीत (मूलाधार चक्रात) प्रवेश करतेस. तिथे तू साडेतीन वेटोळे घालून, सर्पिणीप्रमाणे स्वतःला आकुंचित करून त्या खोल अशा ‌‘कुलकुंडा‌’त पुन्हा निद्राधीन होतेस.
 
लोकाच्या पहिल्या ओळीतील ‌‘सुधाधारासारैः‌’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंडलिनी जेव्हा मूलाधार चक्रातून निघून षट्चक्रांचा भेद करत सहस्रार चक्रात (मस्तकाच्या वरच्या भागात) पोहोचते, तेव्हा तिथे तिचा मिलाप परमशिवतत्त्वाशी होतो. शिव आणि शक्तीच्या या मिलनातून जो आनंद उत्पन्न होतो, त्यालाच ‌‘अमृतानुभव‌’ किंवा ‌‘सुधा‌’ असे म्हटले जाते. असे म्हणतात की, या मिलनाचे फल म्हणून सहस्रार चक्रातून कौलरस पाझरतो आणि हा रस साधकाच्या देहातील समस्त ७२ हजार नाड्यांचे पोषण करतो.
 
आचार्य म्हणतात की, हे माते, जेव्हा तू सहस्रारातील शिवाच्या चरणांशी एकरूप होतेस, तेव्हा तुझ्या चरणांतून अमृताच्या धारा वाहू लागतात. हे अमृत केवळ शरीरापुरते मर्यादित नसते. ‌‘प्रपञ्चं सिञ्चन्ति‌’ याचा अर्थ असा की, साधकाच्या शरीरातील सर्व नाड्या, इंद्रिये आणि मन या अमृताने भिजून निघते. साधकाची सर्व दुःखे, क्लेश आणि वासना या अमृतधारांत धुवून निघतात आणि तो पूर्णपणे ‌‘रसस्वरूप‌’ होतो.
 
येथे भगवतीला ‌‘रसाम्नाय-महसः‌’ म्हटले आहे. ‌‘रस‌’ म्हणजे आनंद आणि ‌‘आम्नाय‌’ म्हणजे वेद किंवा पवित्र परंपरा. अर्थात, तू अशा तेजाचे स्वरूप आहेस, जे आनंदाच्या वेदांमधून प्रकट झाले आहे. कुंडलिनी जेव्हा सहस्रार चक्रात असते, तेव्हा ती चंद्रासारखी शीतल आणि प्रकाशमान असते. हे तेज साधकाला बाह्य जगाचा विसर पाडते आणि त्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देते.
 
योगशास्त्रात कुंडलिनीचे वर जाणे (आरोहण) जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तिचे परत खाली येणे (अवरोहण)देखील महत्त्वाचे आहे. साधक जेव्हा समाधी अवस्थेतून परत बाह्य जगात येतो, तेव्हा ती शक्ती पुन्हा आपल्या स्थानी परतते. आरोहण हे चेतना जागृतीचे लक्षण असून, अवरोहण हे साधकाच्या संपूर्ण देहात त्या चेतनेच्या संचाराचा विस्तार आहे.
 
‌‘अवाप्य स्वां भूमिं‌’ म्हणजे मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे आणि तीच कुंडलिनीची ‌‘स्वभूमी‌’ (हक्काचे घर) आहे. सहस्रारातील त्या दिव्य परमानंदाचा अनुभव घेऊन, सृष्टीच्या चक्राला गती देण्यासाठीच ती माता पुन्हा खाली येते. ही तिची करुणा आहे. ती साधकाला केवळ मोक्षच देत नाही, तर त्याला जिवंतपणी एक दिव्य शरीर आणि मन देऊन पुन्हा संसारात स्थिर करते.
 
या लोकात कुंडलिनीचे वर्णन ‌‘भुजगनिभ‌’ (सर्पिणीसारखी) असे केले आहे. ती ‌‘अध्युष्ट-वलयं‌’ म्हणजे ‌‘साडेतीन वेटोळे‌’ घालून बसलेली आहे. पहिले तीन वेटोळे हे प्रकृतीचे तीन गुण (सत्त्व, रज, तम) दर्शवतात, तर अर्धे वेटोळे हे या गुणांच्या पलीकडील ‌‘विकृती‌’ किंवा सूक्ष्म स्थिती दर्शवते. अर्थात, साधक कुंडलिनी जागृत झाल्यावर प्रकृती आणि विकृती या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे जातो, दुसऱ्या अर्थाने विचार केला, तर हे साडेतीन वेटोळे म्हणजे ‌‘अ-उ-म‌’ हे ॐकाराचे तीन मात्रा आणि अध मात्रा (बिंदू) यांचे प्रतीक आहेत. अर्थात, ही कुंडलिनी ऊर्जा मूलाधार चक्रात ॐकार स्वरूप धारण करून सुप्त होते. आपण मूलाधार चक्राचा स्वामी गणेश आहे, असे म्हणतो आणि गणेशाचे मूर्त स्वरूप ॐकार असेच आहे. अर्थात मूलाधार चक्रातील गणेश ही साधकाची सूप्त चेतना आहे, जिला तो जागृत करू शकतो.
 
जेव्हा शक्ती निद्राधीन असते, तेव्हा ती स्वतःला या वेटोळ्यांमध्ये गुंडाळून घेते. याचा अर्थ असा की, सामान्य मानवामध्ये ही प्रचंड ऊर्जा सुप्त (झोपलेल्या) अवस्थेत असते. जोपर्यंत ही शक्ती जागी होत नाही, तोपर्यंत मनुष्य केवळ देहबुद्धीने जगतो.
 
‌‘कुलकुण्डे कुहरिणि‌’ अर्थात ‌‘कुल‌’ म्हणजे शक्ती आणि ‌‘अकुल‌’ म्हणजे शिव. ज्या कुंडात ‌‘कुलशक्ती‌’ निवास करते, त्याला ‌‘कुलकुंड‌’ म्हणतात. हे मूलाधार चक्रातील एक अत्यंत सूक्ष्म छिद्र किंवा गुहा (कुहर) आहे. तिथे ती माता ‌‘स्वपिषि‌’ (आपल्या पतीशी, सदाशिवाशी एकरूप होण्याचे सुख अनुभवून, तृप्त होऊन निद्रिस्त होते.) हे झोपणे म्हणजे आळस नव्हे, तर ती ‌‘विश्रांती‌’ आहे. सृष्टीच्या निर्मितीनंतर शक्ती जेव्हा शांत होते, तेव्हा ती तिथे विसावते. साधकाने आपल्या ध्यानाने, मंत्राने आणि भक्तीने या मातेला जागृत करायचे असते. एकदा का ती जागी झाली की, साधकाचे आयुष्य अमृताच्या धारेने भिजून निघते.
 
या लोकाचा एक गुह्य अर्थ आहे. तो कुंडलिनी जागृतीचे महत्त्व विशद करतो. योगशास्त्रानुसार मानवी शरीरात 72 हजार नाड्या आहेत; परंतु त्यातील इडा, पिंगला आणि सुषम्ना या तीन मुख्य नाड्या मानल्या जातात. या भौतिक नसून सूक्ष्म (ऊर्जा) नाड्या आहेत, ज्यांचा उगम पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकापासून (मूलाधार चक्र) होतो.
 
१. इडा नाडी (चंद्र नाडी) : ही नाडी पाठीच्या कण्याच्या डाव्या बाजूला असते. ही शीतलतेचे आणि मनाचे प्रतीक आहे. इडा नाडीचा संबंध उजव्या मेंदूशी असतो, जो सृजनशीलता आणि भावनांचे नियंत्रण करतो. जेव्हा इडा नाडी सक्रिय असते, तेव्हा शरीरात थंडावा जाणवतो आणि मन अंतर्मुख होते.
 
२. पिंगला नाडी (सूर्य नाडी) : ही नाडी पाठीच्या कण्याच्या उजव्या बाजूला असते. ही उष्णतेचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. पिंगला नाडीचा संबंध डाव्या मेंदूशी असतो, जो तर्कशास्त्र आणि विलेषणात्मक विचारांवर नियंत्रण ठेवतो. ही नाडी सक्रिय असताना, शरीरात उष्णता वाढते आणि कार्यशक्ती जागृत होते.
 
३. सुषम्ना नाडी (मध्य नाडी) : या तिन्हीमध्ये सुषम्ना नाडी सर्वांत महत्त्वाची आहे. ही पाठीच्या कण्याच्या मध्यभागातून (मेरुदंड) सरळ वर सहस्रार चक्राकडे जाते. सामान्यतः ही नाडी सूप्त असते. जेव्हा इडा आणि पिंगला या दोन्हीमध्ये संतुलन निर्माण होते, तेव्हाच ऊर्जा सुषम्ना नाडीतून वर वाहू लागते. यालाच ‌‘कुंडलिनी जागरण‌’ म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी सुषम्नेतून प्राणवायूचे वहन अत्यंत आवश्यक मानले जाते.
 
कुंडलिनी या सुषम्ना नाडीच्या मुखाशी असते. त्यामुळे कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय सुषम्ना नाडीत प्राणवायु प्रवेश करू शकत नाही. जोवर सुषम्ना नाडीत प्राणवायु प्रवेश करत नाही, तोवर साधक अंतर्मुख होत नाही. जोवर अंतर्मुखता प्राप्त होत नाही, तोवर मानसिक स्वास्थ्यही प्राप्त होत नाही. जोवर मानसिक स्वास्थ्याचा लाभ होत नाही, तोवर समाधान प्राप्त होत नाही. अर्थात समाधान हवे असेल, तर मानसिक स्वास्थ्य हवे. मानसिक स्वास्थ्य हवे असेल, तर अंतर्मुखता हवी, अंतर्मुखता हवी असेल, तर सुषम्ना नाडीचे द्वार उघडले पाहिजे आणि हे दार उघडायचे असेल, तर कुंडलिनीची जागृती आवश्यक आहे. ही जागृती होण्यासाठी तिची उपासना साधना अनिवार्य आहे.
 
- सुजीत भोगले
(क्रमश:) 9370043901
Powered By Sangraha 9.0