मुंबई : (Mumbai Railway) मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय सेवेतील हार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल सेवांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि.२६ जानेवारी ते दि.१० फेब्रुवारी २०२६ या अवघ्या १६ दिवसांत तब्बल ६ लाख ४० हजार प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. दररोज सरासरी ४०,०१७ प्रवासी एसी सेवांचा लाभ घेत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.(Mumbai Railway)
या कालावधीत एसी लोकल तिकिटांच्या विक्रीतून मध्य रेल्वेला २ कोटी ३८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून दररोज सरासरी १४.९० लाख रुपयांची कमाई नोंदविण्यात आली. यात १ कोटी ७९ लाख रुपये हंगामी (सीझन) तिकिटांमधून, तर ५९ लाख रुपये प्रवासी तिकिटांमधून मिळाले आहेत. पारंपरिक नॉन-एसी प्रथम व द्वितीय श्रेणीऐवजी अधिक आरामदायी आणि सोयीस्कर एसी प्रवासाची निवड करण्याकडे प्रवाशांचा वाढता कल असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. सध्या मध्य रेल्वेकडून एकूण ९४ एसी लोकल सेवा चालविल्या जात असून त्यापैकी १४ सेवा २६ जानेवारी २०२६ पासून हार्बर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.(Mumbai Railway)
दरम्यान, अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई विभागाकडून एसी लोकल तसेच स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान हार्बर एसी लोकलमध्ये ८१० अनियमित प्रवासाच्या घटना आढळून आल्या असून २.५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.(Mumbai Railway)
तसेच आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (१० फेब्रुवारी २०२६ पर्यंत) मुख्य मार्ग व हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये एकूण १.०१ लाख विनातिकीट किंवा अपूर्ण तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून ३.२२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एसी लोकलमधील अनियमित प्रवास सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहे.(Mumbai Railway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.