भगवान श्रीकृष्ण व आठ संख्या
अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशी आठ अंगे आहेत. योगाभ्यासात ही समाधी अवस्था अति श्रेष्ठ मानली आहे. समाधी अवस्था आठवी उच्च अवस्था. म्हणूनच भगवान श्रीकृष्णसुद्धा आठवेच दाखवून, त्यांच्या पत्नीरूप अष्टसिद्धी दाखविल्या आहेत. श्रीकृष्णाची जन्मतिथीही अष्टमी आहे. श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्रीचा. मध्यरात्रीच्या काळातच खरा साधक जागृत राहून, साधना करतो आणि ज्ञानाला स्वतःमध्ये कर्षण करून जन्म देतो. गीतासुद्धा हेच सांगते,या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी|
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः॥अ.2लो.69॥नित्य ज्ञानस्वरूप परमानंद हा सर्वसामान्य प्राण्यांसाठी रात्रीसारखा असतो, पण ज्ञानप्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी रात्रीच्या शांत अवस्थेत जागतो. इंद्रियांवर संयम ठेवतो. ध्यान लावून मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. सांसारिक सुखप्राप्ती परतत्त्व जाणणाऱ्या मुनींसाठी रात्रीसारखीच असते.
श्रीकृष्णाचे मातापिता - देवकी-वसुदेवभगवान श्रीकृष्णाचे दोन मातापिता दाखविले आहेत. एक जन्मदाते वसुदेव आणि देवकी, तर आध्यात्मिक साधनेनंतर प्राप्त होणारे नंद आणि यशोदा होत. भगवान श्रीकृष्णाचे सर्व काहीच जगावेगळे दाखविण्यातच, भगवान वेदव्यासांनी आपले असामान्य कौशल्य दाखविले. म्हणूनच भगवान वेदव्यासांना ‘विशालबुद्धेः’ म्हणून गौरविले जाते. वसुदेव-देवकी हे श्रीकृष्णाचे जन्मदाते, तर नंद-यशोदा हे संस्कार आईबाप दाखविले आहेत. संस्कारांनी मानव द्विज होतो. म्हणूनच उपनयन संस्कारानंतर मानवाला ‘द्विज’ म्हणतात. अशा तऱ्हेने उत्तम संस्कारज्ञानामुळे मानवाचा दुसरा जन्म होतो, असे मानले गेले आहे. हे वैदिक संस्कारतत्त्व समजण्यासाठी कृष्णाचे जन्मदाते व संस्कारदाते आई-वडील वेगवेगळे दाखविले आहेत. साधनेमुळे साधकात देववृत्ती जागृत होऊ लागतात. ज्या साधकात देववृत्ती स्थायी रूपात वसतात, असल्या उत्तम वृत्तीपिंडाला वसुदेव; तर या स्थायी वृत्तिभावाला पतिव्रतेप्रमाणे संलग्न असलेल्या, देवत्वाचे संस्कार करून घेणाऱ्या, वृत्तीरूप पत्नीला देवकी म्हटले आहे. वसुदेव-देवकीचे आठवे अपत्य म्हणजे समाधीरूप आठवे श्रीकृष्ण होत. अष्टांग योगामध्ये अशाच क्रमागत पायऱ्या असतात. भगवान श्रीकृष्ण आठवी अत्युच्च समाधी अवस्था होय!
कंसाने वसुदेव-देवकीची पहिली सात बालके मारली होती, आणि हे खरे आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा असल्या निम्न स्तरावरील साधनांच्या वर साधक गेल्याशिवाय, म्हणजेच कंस मामाद्वारे या निम्न अवस्था मारल्या गेल्याशिवाय, साधकात उच्च समाधी म्हणजेच कृष्णावस्थेचा जन्म होत नाही. आठवे कृष्ण अशा तऱ्हेने कंसाच्या हातून निसटून मध्यरात्री यमुना पार करून, गोकुळात राहणाऱ्या नंद-यशोदा नामक नव्या माता-पित्याच्या आश्रयाला नेले जातात.
कंस मामा
‘कसं’ म्हणजे कापणे आणि ‘कंस’ म्हणजे नाश करणारी साधकातील वृत्ती होय. याच ‘कंस’ शब्दापासून ‘कसाई’ शब्द तयार झाला. साधकातील असली वृत्तींना कापणारी वृत्ती त्याला जन्मदात्या आईच्या सख्या भावासारखीच असते; म्हणून कंसाला श्रीकृष्णाचा सख्खा मामा दाखविले आहे. संस्कृतमध्ये अशा बऱ्याच शब्दांची मोठ्या कुशलतेने रचना केली आहे. जसे ‘हिंसा’ आणि हिंसा करणारी अवस्था म्हणजे ‘सिंह’ होय. तद्वत् ‘वज्र’ आणि ‘व्रज’ शब्दांचा संसार मांडला आहे. ‘वज्र’ म्हणजे दृढ निर्धार आणि ‘व्रज’ म्हणजे निर्धाराने पुढे चालणे. याच व्रजातच कृष्णाचा जन्म आहे. वज्र निर्धाराच्या भूमीतच भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. अशी ती भगवान श्रीकृष्णाची व्रज भूमी होय. ज्यातील गुप्त अथवा स्वतःत गुप्तरूपाने वसत असलेल्या उत्तम गोपनीय वृत्ती गोप-गोपी कृष्णासह खेळतात. कंसाच्या भयाने वसुदेव अंधकारमय आणि वादळ-वाऱ्यासह पाऊस पडत असलेल्या मध्यरात्रीच नवबालक कृष्णाला, दुथडी भरून धो धो वाहत असलेल्या यमुना नदीतून गोकुळातील आपल्या मित्राच्या घरी म्हणजे नंद-यशोदेच्या घरी सुखरूप नेऊन ठेवतात. ती काळरात्र, तो धो धो पाऊस आणि त्या विश्वाला हादरविणाऱ्या विजा आणि दुथडी भरून वाहणारी प्रबल काळी यमुना! साधकाला साधनेत येणाऱ्या त्या सर्व प्राकृतिक आपत्तीतून भगवान श्रीकृष्णाला पार करून, साधकातील वसुदेव गोकुळात सुखरूप घेऊन जातात. असल्या पौरुषयुक्त उत्तम कर्माला प्रवृत्त करणारी त्याची पत्नी देवकी असते, जी कृष्णाची जन्मदात्री असते.
यमुना
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून संपूर्ण कृष्णजीवनात सदैव महत्त्वाचे स्थान असलेल्या या यमुना नदीबद्दलही आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. यमुना नदीचे पाणी काळे आहे, असे मानले जाते. आज उत्तर भारतातील वाहत जात असलेल्या स्वच्छ यमुनाजलाचा वर्ण भावूक लोकांना काळा वाटत असेलही, पण साधक जीवनातील या यमुनेचा प्रवाह खरोखरच काळा असतो आणि त्या आध्यात्मिक, शक्तिशाली प्रवाहाचे नाव खऱ्या अर्थाने ‘यमुना’ असते. हा ‘यमुना’ शब्द वेदवाङ्मयात वारंवार आला आहे, ज्याचा अर्थ निराळाच आहे.
यम + उना = यमुना. समाधी अवस्थेमध्ये योगी साऱ्या यम-नियमांच्या वर असतो. तसेच तो देश-काळ-वर्तमानरहित अवस्थेत असतो. त्या परमशून्य म्हणजेच ‘उणा’ अवस्थेला वेदव्यास यमुना म्हणतात, तिला ‘कालिंदी’ असेही म्हणतात. जी कालाचा ‘इंद’ म्हणजे नाश करते, ती कालिंदी होय. असली कालिंदी अथवा यमुना साधकाच्या सुषुम्ना नाडीतच असते. सुषुम्ना नाडीत जाणाऱ्या साधकाला अष्टांग योगात साधकाला व्यर्थ अडकावून, ठेवणाऱ्या यम-नियमांच्या बंधनातून मुक्त व्हायचे असते. म्हणजे उच्च साधकाला यमाच्या बंधनातून स्वतःला ‘उणे’ करावयाचे असते. असली उच्च साधकाची ‘यम-उना’ अवस्था म्हणजे ‘यमुना’ नदी होय. असल्या यमुना नदीच्या तटावर भगवान श्रीकृष्ण आपल्या गोप-गोपींशी आध्यात्मिक क्रीडा करीत असतात. जो साधक ध्यानधारणेद्वारे सुषुम्ना नाडीत आपल्या चित्ताला स्थिर करतो, त्याला अतिशय घनदाट काळोखाचा अनुभव येत असतो. प्रकाश म्हणजे जड जीवन आणि असल्या जड प्रकाशमय जीवनाच्या वर जाण्याकरिता साधकाला आपल्या सुषुम्ना नाडीत स्थिर व्हावे लागते. म्हणून साधकाची उच्च सुषुम्ना नाडीतील नदी यमुना होय, जिचे अनुभूतिरूप जल काळे असते.
(क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357