आज जगामध्ये व्यवस्थापन कौशल्य हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. दैनंदिन आयुष्यापासून कामापर्यंत भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे व्यवस्थापन करणे आपल्यासाठी आवश्यक असते. संत साहित्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. आधुनिक काळातील व्यवस्थापनकलेचे मूळ आपल्याला समर्थांच्या साहित्यात आढळते. दासनवमीच्या निमित्ताने त्याचा आढावा घेणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध...
गुण व्यवस्थापन : गुण व्यवस्थापन ही एक संकल्पना अलीकडील काळात प्रसिद्ध झाली आहे. सध्याच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत गुणवत्तेला (Quality Control)ला महत्त्व आहे. आज व्यवस्थापनातील प्रत्येक क्षेत्रात दर्जेदारपणाला प्राधान्य दिले जाते. त्यासाठीच चांगली माणसे, उत्कृष्ट यंत्रसामग्री, चांगल्या दर्जाचा कच्चा माल व चांगले तंत्र या सर्वांचा उपयोग करण्यावर भर असतो. गुणवत्ता म्हणजे विशिष्ट कामाची परिपूर्णता होय.
उत्कट भव्य तेचि घ्यावे|
मळमळीत अवघेचि टाकावे|
निस्पृहपणे विख्यात व्हावे| भूमंडळी॥
समाजनेत्याने जे उत्कट आणि भव्य असेल, त्याचाच स्वीकार करावा. जे तेजोहीन, गतिहीन व बलहीन असेल, त्याचा त्याग करावा. आपल्या निस्पृहपणाने त्याने जगात प्रसिद्ध व्हावे. नेता एका अर्थाने दिव्य दृष्टीचा असावा. वर्तमान परिस्थितीवरून अंदाज केला असता, जी गोष्ट घडून येणे अशक्य वाटते, त्याचीच कल्पना करण्याची विशाल दृष्टी त्याच्या अंगी असली पाहिजे.
उत्तम गुण तितुके घ्यावे|
घेऊन जनास सिकवावे|
उदंड समुदाय करावे| परी गुप्तरूपे॥
आपण स्वतः उत्तम गुण घ्यावे आणि मग लोकांना शिकवावे, मोठमोठे लोकसमूह बनवावे, पण ते गुप्त असावे हा महत्त्वाचा उपदेश समर्थ करतात.
ताणतणाव व्यवस्थापन : व्यक्तिगत जीवनात, संस्थेत किंवा संघटनेत काम करणाऱ्या व्यक्ती सतत ताणतणावाखाली किंवा कोणत्या तरी दडपणाखाली वावरत असल्यास, त्याचा परिणाम संस्थेच्या कार्यप्रणालीवर होत असतो. कर्मचाऱ्यांना कार्यक्षम बनवण्यासाठी, त्यांच्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी व त्यांना अधिकाधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, तणावमुक्त वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. आधुनिक काळात ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ ही संकल्पना महत्त्वाची वाटू लागली आहे.
१२ वर्षांच्या भ्रमंतीच्या काळात समर्थ रामदासांनी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण केले. समाजाची अवनती का व कशी झाली, हे देखील जाणून घेतले. त्यावर आपल्या वाङ्मयाद्वारे उपाय सूचविताना ते लोकशिक्षकाच्या भूमिकेत, समुपदेशकाच्या भूमिकेत अलगदपणे शिरले आहेत, असे जाणवते. समर्थ रामदासांच्या दासबोधात, तसेच करुणाष्टके आणि मनाच्या लोकात आधुनिक काळातील इतर शास्त्रांप्रमाणे मानसशास्त्रातील समुपदेशक ज्या पद्धतीने सल्ला देतो, समुपदेशन करतो, तसेच रामदासांनी त्या काळाच्या व समस्यांच्या गरजेनुसार समुपदेशन केले आहे, असे म्हणता येईल. करुणाष्टकात समर्थ म्हणतात.
चपळपण मनाचे मोडिता मोडवेना|
सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना|
घडिघडि बिघडे हा निश्चयो अंतरीचा|
अर्थात हे मन एवढे चपळ म्हणजे चंचल आहे की, त्याच्या त्या चंचलपणाला आवर घालायचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यात यश येत नाही. तुझ्या ठायी मन स्थिर व्हायला हवे, पण तेही जमत नाही. मनात पुष्कळ निश्चय करतो, पण तो थोडा काळदेखील टिकत नाही.
होणार तैसे होत जात|
प्रपंची जाला आघात|
डळमळिना ज्याचे चित्त| तो सत्त्वगुण॥
जे व्हायचे ते होतच जाते, या नियमानुसार प्रपंचामध्ये मोठे संकट आले असतानाही ज्याचे मन डळमळीत नाही, जो शांतचित्त राहतो, ताचे सत्त्वगुणी होय. मनाच्या लोकात ‘समर्थ’ असे म्हणतात.
जगी सर्वसुखी असा कोण आहे|
विचारे मना तूंचि शोधूनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचित केले|
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले॥
या जगात सर्वसुखी असा कुणीच नसतो. कितीही शोध घेतला, तरी एकही दुःख नसलेला माणूस सापडत नाही. अपरिहार्यपणे प्रत्येकास कुठले न कुठले दुःख सहनच करावे लागते. परंतु, आपले दुःख कमी व्हावे असे वाटत असेल, तर दुसऱ्यास नेहमी सुखी ठेवले पाहिजे, असे रामदास आपल्या मनास, पर्यायाने समाजास सांगताना दिसतात.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे|
असा सर्व भूमंडळी कोण आहे|
हा लोक समर्थ रामदासांनी मनाच्या लोकात घेताना राम सदैव पाठीशी आहे, असे म्हटले आहे. आधुनिक काळात आपण खरे असू, योग्य असू तर न्यायव्यवस्था, हितचिंतक आपल्या पाठीशी आहेतच. सत्याचा नेहमीच विजय होतो. अतिशय रोकठोक शब्दांत सामान्यांना धीर देताना, शत्रूस मात्र ठणकावल्याचे दिसते.
व्यवस्थापन नेतृत्व : व्यवस्थापक हा संस्थेतील काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचा नेता असतो. संस्थेतील सर्व घटकांना कार्यप्रवृत्त करणारा घटक म्हणजे नेतृत्व! नेतृत्व करणे म्हणजे मार्गदर्शन करणे. संस्थेचा किंवा संघटनेचा नेता हा त्या संस्थेचा अथवा संघटनेचा जणू आत्माच असतो. व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांमधून व्यवस्थापकांचे अंगी नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील, याचे प्रशिक्षण दिले जाते. नेतृत्व करताना धैर्य, आत्मविश्वास, नैतिक गुण, निःस्वाथपणा, अनुवंशिकता, उत्तम व्यक्तिमत्त्व, पुढाकार घेण्याची इच्छा, निर्णयक्षमता, लोकांच्या भावना समजून घेण्याचे कसब आणि प्रतिष्ठा या गुणांची आवश्यकता, व्यवस्थापकाच्या अंगी असणे अपेक्षित आहे. बोलताना अतिशय संयमीपणे बोलणे अपेक्षित असते.
समर्थ रामदासांच्या ठिकाणी नेतृत्वाचे हे सर्व गुण दिसून येतात. म्हणून ते उत्तम व्यवस्थापक, संघटक व सुसंवादक म्हणून लक्षात राहतात. नेत्याने कसे बोलावे, कसे वागावे, याचे मार्गदर्शन करताना ते म्हणतात,
बोलतो खरे चालतो खरे|
त्यास मानिती लहानथोर|
न्याय अन्याय परस्परे|
सहजचि कळे॥
ज्याचे बोलणे- चालणे खरेपणाचे असते, त्यास लहानथोर सारखाच मान देतात. त्यातूनच न्यायाचा किंवा अन्यायाचा पक्ष कोणता, हे परस्परपण सहजच लोकांना कळून येते.
दोष देखोनी झाकावे| अवगुण अखंड न बोलावे|
दुर्जन सांपडोन सोडावे| परोपकार करूनी॥
दुसऱ्यांच्या दोषांवर पांघरूण घालावे, दुसऱ्याचे दुर्गुण सदोदित बोलत बसू नये, दुर्जन अपराधात सापडले असताही (त्यांना शासन न करता) त्यांच्यावर परोपकार करून त्यांना सोडून द्यावे.
फड नासोचि नेदावा| पडिला प्रसंग सावरावा|
अतिवाद न करावा| कोणी येकासी॥
समुदायाची घडी बिघडू देऊ नये, आलेला प्रसंग निभावून न्यावा, त्यातून पार पडावे, कोणाशीही अतिवाद करू नये. समर्थांनी केलेला हा उपदेश त्यांनी स्वतःही पाळला आणि आजच्या काळातील व्यवस्थापकांनाही तो तंतोतंत लागू पडतो.
उत्तम गुण तितुके घ्यावे|
घेऊन जनांस सिकवावे|
उदंड समुदाय करावे|
परी गुप्तरूपे॥
उत्तम गुण असतील तेवढे आपण अभ्यासाने घ्यावे व नंतर तेच लोकांना शिकवावे. पुष्कळ समुदाय करावे, पण ते गुप्त रूपाने करावे.
उत्कट भव्य तेचि घ्यावे|
मळमळीत अवघेचि टाकावे
निस्पृहपणे विख्यात व्हावे| भूमंडळी॥
सर्व समुदायांमधून उत्कट व भव्य असेल, तेवढेच घ्यावे आणि मळमळीत म्हणजेच त्याज्य, कमी दर्जाचे असेल, त्याचा त्याग करावा आणि निःस्पृह बाण्याने जगामध्ये कीत गाजवावी.
समर्थ रामदासांना समाज जागृत करायचा होता, माणसं घडवायची होती. त्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे उदंड वाङ्मय त्यांनी निर्माण केले. लोकोद्धाराचा कृतिशील प्रयोग रामदासांनी केला, म्हणूनच त्यांना ‘समर्थ’ अशी उपाधी वापरली जाते.
समर्थकालीन समाजात परचक्र मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. या परचक्र निरूपणाकरिता फक्त आध्यात्मिक तत्त्वज्ञान पुरे पडणार नाही, हे ओळखून त्यांनी समाजकारण केले. या समाजकारणासह राजकारणही केले. यात लोकांच्या स्वभावाचा, मनाचा अभ्यासही त्यांनी केला. दैवत बदलून समाजास कार्यप्रवृत्त केले. समाज कार्यप्रवृत्त होऊ लागल्यावर संघटना उभारली. त्याकरता मठस्थापना केली. या उभारणीसाठी व्यवस्थापनाचीच सूत्रे वापरली. संवादकलेचा उत्तम वापर केला. त्यातून संघटना बांधण्यातील त्यांची कुशलता दिसून येते. यासाठी कोदंडधारी राम आणि गदाधारी हनुमान ही नवी दैवतं, नवा समर्थ संप्रदाय आणि महाराष्ट्र धर्मनवी संघटना उभारली. त्यातून आपल्या कार्यास वैचारिक अधिष्ठान दिले. हे वैचारिक अधिष्ठान विविध प्रकारच्या वाङ्मयनिर्मितीतून समर्थांनी शब्दबद्ध केले आहे.
३५० वर्षांपूव मांडलेले हे विचार सध्याच्या आधुनिक व्यवस्थापनशास्त्रातील निकषांशी तंतोतंत साम्य दाखवितात. सूर्य जसा वर्षानुवर्षे उगवतो, पण रोज तेवढाच तेजस्वी असतो, तसे समर्थांच्या वाङ्मयातील विचारांचे आहे. ते आजच्या काळातही तेवढेच ग्राह्य व उपयुक्त ठरतात. समर्थ रामदासांनी सांगितलेली ही वचने तेजस्वी सूर्यासारखीच सातत्याने ऊर्जा देत राहतील. २१व्या शतकाच्या वाटचालीतही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील, अशीच आहेत. यातूनच त्यातील कालातीतता सिद्ध होते. आणि हीच समर्थ रामदासांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची विशेष महत्ता आहे.
-प्रा. डॉ. विमुक्ता राजे
9892937406