Rahul Gandhi : लोकसभेत प्रस्ताव: राहुल गांधींची खासदारकी रद्द करा आणि आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घाला

12 Feb 2026 18:04:52
Rahul Gandhi
 
नवी दिल्ली : ( Rahul Gandhi ) लोकसभेत आज १२ फेब्रुवारीला मोठ्या राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली, कारण भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्वतंत्र प्रस्ताव (Substantive Motion) मांडला आहे. या प्रस्तावात दुबे यांनी राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व (खासदारकी) रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी विनंती केली आहे. दुबे यांनी आरोप केला की राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत आणि सोरोससारख्या विदेशी शक्तींच्या सहाय्याने भारताच्या हिताला हानी पोहोचवत आहेत.
 
देशाची दिशाभूल आणि विदेशी संस्थांचा संबंध
खासदार निशिकांत दुबे म्हणाले की राहुल गांधी सोरोस फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन आणि USAID यांसारख्या विदेशी संस्थांच्या सहाय्याने भारताच्या विरोधात काम करत आहेत. दुबे यांनी स्पष्ट केले की गांधी यांनी संसदेतील पवित्र व्यासपीठाचा गैरवापर करून निराधार आरोप केले, सर्वोच्च न्यायालय आणि इतर सरकारी संस्था बदनाम केल्या आणि देशातील महत्त्वाच्या संस्थांची प्रतिष्ठा कमी केली. दुबे यांनी गांधींच्या वर्तनाला “थगगिरी गटाचे एक मुख्य घटक” असे संबोधले.
 
सभागृहातील गदारोळ आणि भाजपचे आरोप
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आरोप केला की काही काँग्रेस खासदार सभापतींच्या दालनात घुसून शरारतीपणा करत होते. प्रियंका गांधी वड्रा आणि केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. रिजिजू यांनी सांगितले की सभापती खूप मृदू स्वभावाचे आहेत, अन्यथा कठोर कारवाई झाली असती.
 
काँग्रेसने भाजपाच्या आरोपांना फेटाळत सांगितलं की, ही कारवाई फक्त भाजपाची “स्वसंरक्षण रणनीती” आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "आम्ही कोणाबरोबरही गैरवर्तन केलेलं नाही. एक-दोन खासदार संतप्त झाल्यानंतर ते व्यक्त झाले होते. मी त्यांना (काँग्रेसच्या खासदारांना) प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला. ते खोटे आहे, मी शांत बसले होते."
 
भारत-अमेरिका व्यापार करारावर टीका
राहुल गांधी यांनी लोकसभेत आरोप केला की भारताने भारत-अमेरिका व्यापार करारात आपला डेटा, डिजिटल नियमांचे नियंत्रण आणि कर सवलती अमेरिकेला दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की भारताने आपल्या सर्वात मौल्यवान संसाधनावर परदेशी प्रभाव स्वीकारला आहे. प्रियंका गांधी वड्रा यांनी भारत-अमेरिका कराराचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. प्रियंका गांधी यांनी म्हटलं, "स्वाक्षरी केलेल्या व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. संपूर्ण कामगार संघटनांनी आज संप पुकारला आहे. आमचा त्यांना पाठिंबा देत आहे," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याचा सत्ताधारींनी इशारा दिला. "ते राहुल गांधींविरुद्ध एफआयआर, खटले आणि इतर काही दाखल करतील. पण त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही," असे त्यांनी म्हटलं.
 
स्वतंत्र प्रस्ताव आणि त्याची प्रक्रिया
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला, “कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव (Privilege Motion) नोटीस दाखल केलेला नाही. मी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (Substantive Motion) नोटीस दिली आहे, ज्यात मी नमूद केले आहे की राहुल गांधी सोरोस फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन आणि USAID सोबत थायलंड, व्हिएतनाम आणि कंबोडियाला कसे भेट देतात आणि भारतविरोधी शक्तींशी कसे संगनमत करतात.
 
खासदार निशिकांत दुबे यांनी मागणी केली की, “राहुल गांधींचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी.”
Powered By Sangraha 9.0