वन्दे मातरम्‌!

12 Feb 2026 13:10:57

देशाला हिंदू देवता, दुर्गामाता समजून तिला पूजायचे, हे काफीरपणाचे लक्षण आहे. मुसलमान कधीच अल्लाशिवाय कुणाची इबादत करत नाहीत. त्यामुळे ‌‘संपूर्ण वन्दे मातरम्‌‍‌’ आम्ही म्हणणार नाही,” असे म्हणत स्वातंत्र्यपूर्व काळात जिना आणि इतर मुस्लीम नेत्यांनी विरोध केला आणि आताही देशातील काही कट्टरपंथी धर्मांध ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ला विरोध करत असतात. मात्र, भाजपच्या केंद्र सरकारने सरकारी कार्यक्रमामध्ये सहा कडव्यांचे ‌‘संपूर्ण वन्दे मातरम्‌‍‌’ गाण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे सर्वप्रथम स्वागत. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम नेत्यांना मान्य नव्हते म्हणून ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’च्या संपूर्ण गायनावर प्रतिबंध लादणाऱ्या काँग्रेस पक्षाची लाचारी काय असेल?

असो. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. साधारण 1937 साली जिना आणि तत्कालीन मुस्लिमांनी ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ला विरोध केला. देशाला हिंदूंची देवता मानणे, तसेच ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ गीतामध्ये ‌‘शत्रूचा निःपात करणारी‌’ अर्थाने ‌‘रिपुदलवारीनी‌’ हा शब्द आहे. या शब्दाला आक्षेप घेत मुस्लीम नेत्यांचे मत होते की, “या शब्दामध्ये मुस्लिमांना शत्रू मानून हिंदू देवता दुर्गा ही मुस्लिमांचा नाश करणार, असे म्हटले आहे. त्यामुळे पूर्ण ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणणार नाही.” खरेतर देशात 80 टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदूंची मान्यता आहे की, ईश्वर चराचरात आहे. त्यामुळे हिंदूंनी ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणत भारतदेशाला ‌‘दुर्गामाता‌’ संबोधले, देशाला वंदन केले, तर बिघडले कुठे? मात्र, मुस्लीम नेत्यांच्या दबावाला बळी पडून काँग्रेसने 1940 साली ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ची केवळ दोन कडवी संमत केली. ती संमतीच धर्मांध विचारसरणीला खतपाणी घालणारी होती. ज्या देशात ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणत स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले, ज्या देशात ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणत स्वातंत्र्याच्या चळवळीचे अग्निकुंड धगधगले, त्या देशात ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ला विरोध होणे हे अस्वीकारार्हच होते. आता केंद्र सरकारने ‌‘संपूर्ण वन्दे मातरम्‌‍‌’ गाण्याचे निर्देश दिले आहेत. बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य योद्ध्यांना दिलेली मानवंदनाच. देश स्वातंत्र्य आणि देशहितापुढे काहीच नाही, असे मानणाऱ्या सर्व सज्जनशक्तींच्या मनातला आवाज म्हणजे हा निर्देश. काही नतद्रष्ट लोकांना ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणजे साधे गाणे वाटते; पण ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणजे स्वातंत्र्यगान आहे. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’!

अंधश्रद्धेचा राक्षस

उच्चशिक्षित केरळ राज्यातल्या कोल्लम जिल्ह्यातील कालपरवा घडलेली एक घटना. घरात झगडे होतात, पैशाला पैसा येत नाही. कोणी करणी केली, असे त्या महिलेला वाटले. ती मांत्रिकाकडे गेली. त्याने सांगितले, “तुझ्या मुलीच्या अंगात भूत आहे. ते भूतच तुला बरकत येऊ देत नाही. भूत काढण्यासाठी विधी करावे लागतील.” महिलेने होकार दिला. विधी करण्यासाठी त्याच्या खोलीत फक्त मांत्रिक आणि ती बालिका दोघेच होते. काही वेळाने ती मुलगी रडत अर्धमेल्या अवस्थेत बाहेर आली. विधीच्या नावावर त्या मांत्रिकाने त्या बालिकेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला होता. क्रूर मारहाण आणि बलात्कारासारख्या नृशंस अत्याचाराला बळी पडलेल्या त्या बालिकेची काय चूक होती?

अंधश्रद्धेमुळे बलात्कार, लूटमार, नरबळी आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यावरून एक सत्यघटना आठवते. मुंबईतील घाटकोपर, रमाबाई आंबेडकरनगरात वस्तीतील हिंदू आणि बौद्ध महिलांशी संवाद साधला होता. पण, त्या उठता-बसता येसूचे नाव घेत होत्या. त्या ख्रिस्ती होण्याच्या वाटेवर होत्या. कारण, एकीला मूल होत नव्हते; एकीला मुलीच होत्या, मुलगा नव्हता; एकीच्या घरी दारिद्य्र, तर एकीचा नवरा दुसऱ्याच बाईच्या नादी लागला होता. एका पाद्रीने त्यांना सांगितले की, “येसूच्या नावाचे मंतरलेले पाणी प्यायले, कु्रसाची पूजा केली की, समस्या सुटतील. तसेच येसूशिवाय कुणालाच पूजायचे नाही. हिंदू आहोत हे विसरायचे, तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतील.” पुण्यातही मागे महम्मद खान नावाच्या व्यक्तीने तुझी भरभराट करतो, असे सांगत एका महिलेकडून लाखो रुपये उकळले. फसवणूक झाली लक्षात येताच, या महिलेने विरोध केला. तेव्हा तो म्हणाला, “कुठेही तक्रार केलीस, तर मंत्राने बकरी बनवेन.“ यावरही त्या महिलेचा विश्वास बसला. काय म्हणावे? गरीब-श्रीमंत, निरक्षर-उच्चशिक्षित असा भेद न करता मुली, महिला आणि बालकांच्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या अंधश्रद्धांचा नाश कधी होणार? यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावावर देव-धर्म-श्रद्धांवर फुकटची टीका करणारे नकोत, तर समाजाच्या श्रद्धा, संस्कारांचा, धर्माचा आदर करणारे व्यापक सकारात्मक जनआंदोलन उभे राहायला हवे.
9594969638


Powered By Sangraha 9.0