पर्यावरणावर उपचार करणारा डॉक्टर

Total Views |

पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले, तर एकाच वेळी हजारो लोकांना दवाखाना शोधावा लागतो. त्यामुळेच पर्यावरणाच्या संतुलनासाठी अविरत प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. राजेश मणेरीकर यांच्याविषयी...

डॉ. राजेश मणेरीकर यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग. परंतु, मणेरीकर कुटुंब कल्याण येथे राहत असल्याने त्यांचे बालपण कल्याण येथे गेले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ठाणे येथील बांदोडकर महाविद्यालयात झाले, तर पदवीचे शिक्षण ‌‘सूक्ष्मजीवशास्त्र‌’ विषयात उल्हासनगर येथील चांदीबाई मनसुखानी महाविद्यालयात केले. त्यानंतर ‌‘पर्यावरणशास्त्र‌’ (Environment science) या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात याच विषयात ‌‘पीएचडी‌’ केली. ‌‘पीएचडी‌’ करत असतानाच, ‌‘रिस्क मॅनेजमेंट‌’ हा विषय त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तो विषयदेखील शिकून घेतला. हे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका बायोगॅस कंपनीत एक वर्ष नोकरी केली आणि तिथून भोपाळच्या ‌‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट‌’ या कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. त्यावेळी भोपाळ शहराच्या विकासासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी त्यांनी अनेक नवीन प्रकल्प तयार केले. समाजाला सोबत घेऊन शहरातील कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबविले. भोपाळमधील शून्य कचरा वॉर्ड म्हणजेच वॉर्डमधील कचरा वॉर्डमध्येच जिरवणे, हा उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका ठरली. यावेळी समाज आणि प्रशासन यांच्यामधील दुवा साधण्याचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर पुण्यात परत येऊन त्यांनी पर्यावरण सल्लागार म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. यावेळी विविध उद्योगांना पर्यावरण मंजुरी कशी मिळवावी, याविषयी मार्गदर्शन केले. याच वेळी पुण्यातील अनेक इमारतींमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपली इमारत पर्यावरणपूरक इमारत कशी बनवावी, यावर समाजजागृती केली. त्यानंतर त्यांना समजले की, समाज पर्यावरणावर गप्पा खूप मारतो. मात्र, अजूनही प्रत्यक्षात कार्य करण्यात बहुतांशी लोक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे या विषयात प्रत्यक्षच कार्य करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. यासाठी त्यांची पत्नी अक्षया मणेरीकर आणि साथीदार परांडे यांच्या साहाय्याने ‌‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन‌’ची स्थापना केली. यासाठी त्यांनी सुरुवातीला घरातील कचऱ्यावर उत्तर शोधले.

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांत एक टीम तयार करून त्यांच्यामार्फत सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांना ओल्या कचऱ्यावर कशी प्रक्रिया करायला पाहिजे, यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर घरगुती ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करण्यासाठी नागरिकांना घरच्या घरी एका घरासाठी पुरेसे पडेल, असे ‌‘कम्पोस्ट कीट‌’ तयार केले. त्या माध्यमातून अनेक निवासी सोसायट्या संस्थेला जोडून घेत, वेळोवेळी त्या सोसायट्यांना खतनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. याचा खूपच सकारात्मक परिणाम दिसला. त्यानंतर जैविक कचऱ्याच्या साहाय्याने बायोगॅसनिर्मिती करून घरातील स्वयंपाकघरात इंधन म्हणून वापरण्याचा उपक्रम केला. तिसरे महत्त्वाचे कार्य केले, ते म्हणजे पर्जन्य जलसंधारण. उन्हाळ्यात पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये टँकरने पाणी पोहोचवावे लागते. अशा वेळी पावसाचे पाणी वाया न जाऊ देता, ते जमिनीत मुरविणे किंवा सोसायटीमध्येच ते साठण्यासाठी संस्थेतर्फे आधुनिक तत्त्वांवर आधारित जलसंधारण पद्धती तयार करून वापरली गेली. त्याचबरोबर या टीमच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी विविध स्तरांवर कार्यशाळा अथवा जनजागृती सत्र आयोजित केली. याचा एकूण परिणाम म्हणजे आजघडीला दररोज साधारण 1100 किलोहून अधिक ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येते. त्याचबरोबर 30 लाख लीटरहून जास्त पावसाच्या पाण्याची साठवणूक प्रकल्पांमार्फत केली आहे.

त्यानंतर राजेश यांनी घरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याला संसाधनामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरातून फॅब्रिक कचरा गोळा केला जातो. घरांमधून मिळालेले जुने कपडे गरजू व्यक्तींना दान करण्यात येतात. तसेच या कपड्यांपासून 90पेक्षा जास्त प्रकारच्या बॅग, पाऊच, पर्स अशा वस्तू तयार केल्या जातात. आतापर्यंत सुमारे एक लाख किलोंपेक्षा अधिक फॅब्रिक कचरा गोळा करून 82 हजार, 500 किलोहून जास्त कपडे गरजूंना देण्यात आले आहेत. तसेच बॅग, पाऊच, पर्स अशा वस्तू तयार करण्यासाठी 700हून अधिक महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर संस्थेमार्फत ‌‘ई-कचरा संकलन‌’ मोहीम आणि ‌‘मेगा-ड्राईव्ह‌’ आयोजित करून मोठ्या प्रमाणात ई-कचरा व प्लास्टिक गोळा केले जाते. राजेश यांनी संस्थेमार्फत 53 टनांहून अधिक ई-कचरा संकलन करत 900 हून अधिक लॅपटॉप व कॉम्प्युटर दुरुस्त करून विद्यार्थ्यांना, शाळांना आणि गरजू व्यक्तींना दिले आहेत.

राजेश यांनी कचऱ्यातून संपत्ती निर्माण करत पर्यावरण-संरक्षण आणि सामाजिक-परिवर्तन साधत उपयुक्त उत्पादने निर्माण करून रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या वाटा तयार केल्या आहेत. आज ते पर्यावरणाच्या समस्यांकडे शाश्वत दृष्टिकोनातून पाहत एक सामाजिक चळवळ उभी करत आहेत. पर्यावरण संरक्षणाचा ध्यास घेतलेल्या डॉ. राजेश यांना दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.