Tanya Nathan C : दिव्यांगत्वावर मात; तान्या नाथन सी. यांची ऐतिहासिक झेप, होणार पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश!

11 Feb 2026 13:47:27
 Tanya Nathan C
 
कन्नूर (केरळ) : ( Tanya Nathan C ) प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, हे केरळमधील तान्या नाथन सी. यांनी सिद्ध करून दाखवले आहे. जन्मतः दृष्टिहीन असलेल्या तान्याने सिव्हिल जज (ज्युनियर डिव्हिजन) परीक्षेत दिव्यांग प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला असून त्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची निवड यादी राज्य सरकारकडे पाठवली असून, लवकरच नियुक्ती आदेश निर्गमित केला जाणार आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खुली झाली संधी
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांगांना न्यायिक सेवेत प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे २४ वर्षीय तान्याला न्यायिक सेवेत प्रवेशाची संधी मिळाली. कन्नूर जिल्ह्यातील मंगड येथील रहिवासी असलेल्या तान्याने विधी शाखेत पदवी घेतल्यानंतर न्यायिक सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
 
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आव्हानांवर मात
नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या तान्याने सांगितले की, न्यायालयीन क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास त्या पूर्णपणे तयार आहेत. “हे आव्हानात्मक असेल, याची जाणीव आहे; मात्र ‘स्क्रीन रीडर’ आणि ‘डिक्टेशन सॉफ्टवेअर’सारख्या तांत्रिक साधनांच्या मदतीने न्यायालयीन कामे प्रभावीपणे करता येतात,” असे त्यांनी सांगितले.
 
शिक्षणापासून वकिलीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
तान्याने शिक्षणाची सुरुवात धर्मडोम येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत केली. परासिनीकडावू उच्च माध्यमिक शाळेतून दहावी आणि मोराझा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कन्नूर विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमात अव्वल स्थान पटकावले. त्या संस्थेतील एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या. वकील म्हणून नोंदणी केल्यानंतर त्यांनी कन्नूरमधील तालिपरंबा येथे वकिलीला सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने प्रेरित होऊन त्यांनी स्वतः ब्रेल लिपीत नोट्स तयार करत परीक्षेची तयारी केली. मुलाखतीसाठी तिरुअनंतपुरम येथील एका वकिलाचे मार्गदर्शन घेतले.
 
तान्याची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, दिव्यांग व्यक्तींनाही संधी दिल्यास ते कोणतेही क्षेत्र गाठू शकतात, याचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0