दिल्लीचा राग

11 Feb 2026 12:39:01

दिल्ली... ‌‘भाजयुमो‌’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दक्षिण बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्या हे त्यांच्या तडाखेबाज भाषणासाठी ओळखले जातात. राजकारणासह अन्य विषयांवरही अभ्यासपूर्ण आणि तथ्यात्मक मांडणी करण्याचा त्यांचा हातखंडा. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागील आठवड्यात बोलताना त्यांच्या याच अभ्यासपूर्ण शैलीचा पुनश्च परिचय आला. सूर्या यांनी ‌‘संपुआ‌’च्या काळातील संसदेतील राष्ट्रपतींच्या भाषणांचा पंचनामाच सादर केला. ‌‘संपुआ‌’च्या काळातील राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये भारतीय संस्कृतीच्या उल्लेखाचा अभाव, भ्रष्टाचार, महागाईचे संदर्भ प्रकर्षाने आढळून आले, जो कमकुवत नेतृत्वाचाच परिपाक म्हणावा लागेल, ही बाब सूर्या यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केली. सूर्या यांनी अशाप्रकारे थेट ‌‘संपुआ‌’च्या काळातील राष्ट्रपतींच्या संसदेतील भाषणांचीच चिकित्सा केल्यामुळे विरोधकांनीही गदारोळ करून त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पण, सूर्या यांनी न थांबता आपल्या भाषणातून ‌‘संपुआ‌’च्या कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगली.

परवा बंगळुरूत काय घडले? तर, बंगळुरू मेट्रोचे दर वाढविण्याविरोधात तेजस्वी सूर्या भाजपचे स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी रस्त्यावर उतरले. परंतु, पोलिसांनी त्यांना थेट अटक केली. आता कोणत्याही संसदेच्या सदस्याला अटक करण्यापूर्वी सभागृहाच्या अध्यक्षांची म्हणजेच, इथे लोकसभा अध्यक्षांची परवानगी घेणे क्रमप्राप्त. परंतु, तसे काहीही न करता, कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने तेजस्वी सूर्या यांना अटक करण्याचा कोतेपणा दाखवला. एखादा खासदार जेव्हा राज्य सरकारविरोधात आंदोलन करतो, तेव्हा त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याऐवजी उलट, त्याचे तोंड दाबण्याचाच प्रकार काँग्रेसने केला. काँग्रेसकडून जनहिताचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांचीच मुस्कटदाबी होणार असेल, तर त्याला काय म्हणावे? आणि मुळात इथे प्रश्न राजकीय आंदोलनाचा नव्हताच. प्रश्न होता, तो बंगळुरू मेट्रोच्या भरघोस दरवाढीचा. त्यासाठी खरेतर सिद्धरामय्या सरकारने ठाम भूमिका घेणे गरजेचे होते. पण, दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सूर्या स्वत: रस्त्यावर उतरले. एवढेच नाही, तर त्यांनी केंद्र सरकारमधील मंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही भेट घेऊन मेट्रोची प्रस्तावित दरवाढ रद्द करून दाखवली. याला म्हणतात सच्चा जनसेवक!

बंगळुरूत आग

तेजस्वी सूर्या यांच्या संसदेतील त्या आक्रमक भाषणाचा वचपा कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने बंगळुरूत काढलेला दिसतो. कारण, दिल्लीत आपले काहीच चालत नाही, तर काँग्रेसशासित राज्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींना कसे कचाट्यात धरता येईल, यासाठीचा हा सगळा नसता खटाटोप. म्हणूनच, मेट्रो दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या खासदाराला अटक करण्याची दुर्बुद्धी सिद्धरामय्या सरकारला सुचली.

त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तेजस्वी सूर्या यांना ‌‘रिकामी पेटी‌’ म्हणून हिणवले. शिवकुमार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून मग तेजस्वी सूर्याही खरोखरीच एक रिकामी पेटी घेऊन या आंदोलनात उतरले होते. त्या पेटीवर त्यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचे फोटोही चिकटवले आणि कर्नाटक सरकारच कसे ‌‘रिकामी पेटी‌’ आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. नेमकी हीच बाब काँग्रेस सरकारच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी सूर्या यांना अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले. परंतु, या सगळ्यात बंगळुरू मेट्रोची भरमसाठ दरवाढ कमी करण्याबद्दल सिद्धरामय्या यांनी कोणताही रस का दाखवला नाही, हाच खरा प्रश्न.

मेट्रोप्रवास हा शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणाच. पण, हा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असेल, तरच ही सेवा लाभदायी ठरते. परंतु, बंगळुरू मेट्रोमध्ये वार्षिक दरवाढीच्या नावाखाली 80 टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती. त्यामुळे काही अंतरांसाठी मेट्रोच्या तिकीटदरांत तब्बल 50 रुपये इतकी घसघशीत वाढ होणार होती. तसे झाले असते, तर मेट्रोने प्रवास करण्ााऱ्यांवर दिवसाचे 300 रुपये तिकिटावरच खर्च करण्याची वेळ आली असती, असा आरोप भाजपने केला आहे. पण, कर्नाटक सरकारने टोलवाटोलवी करीत हा निर्णय केंद्राचा असल्याचे सांगत, हात वर करण्याचा प्रयत्न केला. पण, यासंदर्भात केंद्राशी चर्चा करण्याची भूमिका मात्र सिद्धरामय्या सरकारने घेतलेली दिसत नाही. म्हणूनच, शेवटी सूर्या यांना आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला आणि मग केंद्राशी तातडीने समन्वय साधून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा खरे जनसेवक कोण आणि जनतेला लुटणारे कोण, हे कर्नाटकच्या जनतेसमोर आले ते उत्तमच!

Powered By Sangraha 9.0