युजीसीच्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस! केंद्र सरकारसह युजीसीला समन्स

11 Feb 2026 17:33:11

UGC

मुंबई
: विद्यापीठ सुधारणा आयोगाच्या नवीन नियमांना आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या याचिका विचाराधीन असलेल्या यापूर्वीच्या संबंधित याचिकांसह जोडण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकांमध्ये नवीन नियम सामान्य प्रवर्गाविरुद्ध भेदभाव करणारे असून ते मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात, असा दावा करण्यात आला आहे.यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने या नियमांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती आणि केंद्र सरकार तसेच युजीसीला नोटिसा पाठवून नियमांचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना केली होती.
युजीसीचे नवे नियम काय आहे? नव्या नियमामध्ये काय-काय बदल प्रस्तावित आहेत?

'प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एजुकेशन इंस्टीट्यूशन रेगुलेशन' (Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations) असे या नियमाचे नाव आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभाव रोखणे हा यामागचा उद्देश आहे.
नवीन यूजीसी नियमांनुसार, देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी आणि इक्विटी पथक स्थापन केले जातील. ही इक्विटी कमिटी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकेल आणि निर्धारित वेळेत या तक्रारींचे निवारण करेल. ९ सदस्यांच्या या कमिटीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग आणि महिलांचा समावेश असेल. सर्व संस्थांमध्ये २४x७ हेल्पलाइन आणि तक्रार प्रणाली स्थापन केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता रद्द केली जाईल किंवा त्यांचे निधी गोठवले जाईल. कॉलेज परिसरात समानतेचं वातावरण तयार करणं, वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणे, विद्यापीठात जाती आधारित भेदभाव होण्याआधीच तो रोखणं, तसा प्रकार झालाच तर पीडित व्यक्तीची मदत करणं, ही जबाबादारी या कमिटीची असेल.
या नियमांना विरोध कोणाकडून होतो? विरोधाची नेमकी कारणं काय आहेत?
  
माहितीनुसार, विद्यार्थी तसेच काही संघटनांकडून हा विरोध होतोय. विशेषतः सामान्य प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकडून हा नियम रद्द करण्याची मागणी होत आहे. त्यांच्यामते, हा नियम एकतर्फी आहे. तो सर्व विद्यार्थ्यांना लागू न होता फक्त विशिष्ट प्रवर्गापुरता मर्यादित आहे. तसेच त्यामध्ये भेदभाव स्पष्टपणे परिभाषित केलेला नाही.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनुसार, यूजीसीची जातीय भेदभावाची नवीन व्याख्या फक्त एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना लागू होते, ज्यामध्ये सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. या उमेदवारांना देखील जातीय भेदभावाचा सामना करावा लागतो, पण त्यांचा उल्लेख नाही. तसेच इक्विटी कमिटीवर सामान्य प्रवर्गातील प्रतिनिधी असणे अनिवार्य नाही. या तरतुदीमुळे समितीचे निर्णय एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण होते. खोट्या तक्रारींसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नाही.
Powered By Sangraha 9.0