सुनेत्राताईंची पंतप्रधान, गृहमंत्र्यांशी चर्चा : दिल्ली दौऱ्यावेळी नेमकं काय घडलं?

11 Feb 2026 19:48:37


 
Sunetra Pawar
 
मुंबई : (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राज्याच्या राजकारणात चर्चांचा भडका उडाला आहे. पवार कुटुंबातील अनेक प्रमुख नेते एकाच वेळी राजधानीत दाखल झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Sunetra Pawar)
 

बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी संसदेतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत जवळपास ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येते. या भेटीत पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत असल्याची ग्वाही दिल्याचं सांगितलं जात आहे. ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या शक्यता, अजित पवार यांच्या अपघाताबाबत व्यक्त होत असलेले संशय आणि सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. (Sunetra Pawar)
 

दिल्ली दौऱ्याच्या आदल्या दिवशीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याच सुमारास शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही मुख्यमंत्र्यांच्या भेटीस आले होते. त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या सलग घडामोडींमुळे तर्कांना आणखी खतपाणी मिळालं. (Sunetra Pawar)
 

हेही वाचा:  Ritu Tawde: मुंबईला महापौर मिळाला!; भाजपच्या रितू तावडे बिनविरोध, पालिकेत पुन्हा ‘मेयर राज’

 

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच आमदार रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सविस्तर सादरीकरण केलं. काही नेत्यांनी यावर मौन का बाळगलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. योगायोग म्हणजे सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये असतानाच रोहित पवारही राजधानीत होते. आता खासदार सुप्रिया सुळेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. (Sunetra Pawar)
 

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह संभाव्य विलीनीकरण, तसेच पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचीही चर्चा आहे. यासाठी त्या उपराष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात, अशी माहिती मिळते. (Sunetra Pawar)
 

मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्य प्रश्न कायम आहे जर विलीनीकरण झालं तर पक्षाध्यक्ष कोण? महाविकास आघाडीचं पुढे काय? आणि पवार कुटुंबातील नवी पिढी दिल्लीमध्ये नेमकं कोणती राजकीय आखणी करत आहे? या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता असली, तरी सध्या दिल्लीतील हालचालींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. (Sunetra Pawar)
 


 

Powered By Sangraha 9.0