समर्थ रामदास आणि आधुनिक व्यवस्थापन (पूर्वार्ध)

11 Feb 2026 13:07:04

समर्थ रामदास हे संत पंचकातील एक महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. ‌‘संत‌’ या उपाधीप्रमाणे ‌‘समर्थ‌’ ही उपाधी त्यांना सर्वार्थाने सार्थ ठरते. याची विविध कारणे आहेत. दैनंदिन व्यवहाराला प्राधान्य देणारे आणि त्यानुसार तत्संबंधी चिंतन करणारे, तसेच समाजाला तशी पद्धतशीर शिकवण देणारे समर्थ रामदास हे त्यांच्या कार्यामुळे वेगळे ठरतात. आज श्री रामदास नवमीनिमित्ताने समर्थ रामदासांच्या विपुल वाङ्मयातील आधुुनिक व्यवस्थापनाचे दर्शन घडविणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध...

17व्या शतकातील समर्थांचा काळ हा भारतीय संस्कृतीच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक प्रकारच्या आणीबाणीचाच काळ होता. क्रूर, धर्मवेड्या, इस्लामी राजवटींच्या सत्तेच्या वरवंट्याखाली संपूर्ण भारतासह महाराष्ट्रही तीन शतकांपासून भरडून निघत होता. अशा अस्मानी-सुलतानी दमनचक्राखाली छिन्नभिन्न झालेली भारतीय संस्कृती, प्राचीन हिंदू धर्म टिकतो तरी की नाही, अशी कठीण वेळ आली होती. राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक कोंडीमुळे भारतीय समाज संघटनाशून्य आणि स्वत्व हरवलेल्या अवस्थेत हीनदीन झालेला होता.

त्या कालखंडाचे म्हणजे 400 वर्षांपूवच्या कालखंडाचे मर्म समर्थांनी बरोबर ओळखले होते. आपल्या भोवतालच्या जगामध्ये कोणत्या घालमेली चालल्या आहेत, कोणत्या उलाढाली चालल्या आहेत, राजकारणाच्या कोणत्या चळवळी चालल्या आहेत, लौकिक, व्यावहारिक जीवनात कोणत्या नवीन विचारांचे वारे वाहू लागले आहेत आणि परिस्थिती कशी बदलत चालली आहे, याचा नेमका अंदाज समर्थ रामदासांनी घेतला.

समर्थ रामदासांचा आणि त्यांच्या वाङ्मयांचा काळ 17वे शतक अर्थात मध्ययुगीन कालखंड. म्हणूनच त्या काळात समर्थांनी परमार्थाबरोबरच प्रपंचाची सांगड घातली. इतकेच नाही, तर त्यास प्रयत्नवादाची जोड दिली.

संतांच्या जीवनाचा हेतू एखादा उद्योग चालवावा असा नव्हता. कारण, ‌‘उद्योग‌’ ही संकल्पनाच आधुनिक काळातील आहे. मग 400 वर्षांपूव होऊन गेलेल्या समर्थ रामदासांच्या साहित्यात अलीकडच्या काळातील व्यवस्थापन, तर समर्थांच्या काळातील व्यवहारवाद हा विचार कसा आढळतो? तर त्याचे उत्तर म्हणजे, समर्थ रामदासांसारख्या राष्ट्रचिंतक संतांच्या साहित्यामध्ये पारलौकिक जीवनाइतकेच भौतिक जीवनास महत्त्व होते. कारण, ती काळाची गरज होती. व्यक्तिजीवन, समाजजीवन आणि राष्ट्रजीवन असा एकूणच विचार समर्थ रामदासांनी केला आहे, तो महाराष्ट्रधर्म आणि समर्थ संप्रदाय यांच्या जडणघडणीसंदर्भात.

परमेश्वरप्राप्तीबाबत किंवा आध्यात्मिक आनंदाबाबत समर्थांनी लिहिलेच, पण त्या काळातील ते असे अपवादात्मक संत आहेत, ज्यांनी राजकारणाचा विचारही आपल्या लेखनातून केला. समर्थ रामदासांचे लेखन सर्वस्पश असेच. व्यक्तिमत्त्व विकासापासून ते राजकीय मुत्सद्देगिरीपर्यंत, व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवरची रामदासांची मते, विचार व भाष्य आजही मोलाचे व उपयुक्त आहेत.

समर्थ रामदासांच्या विपुल वाङ्मय सागरात ‌‘दासबोध‌’ हा ग्रंथ त्यांची वाङ्मयमूत मानला जातो. यामध्ये 20 समास असून त्यात मानवी जीवनातील सर्व विषयांवर लेखन केले आहे.

‌‘दासबोधा‌’सारख्या ग्रंथातून केलेला उपदेश हा जसा त्यांच्या शिष्यांसाठी होता, तसेच तो तत्कालीन समाजासाठीही होता. ‌‘दासबोधा‌’त हरिकथेस सुरुवात करून पुढे समाजकारण, राजकारण मांडलेले दिसते. परमार्थास प्रपंचाची जोड दिली आहे. त्याकरिता प्रयत्नवादाचा जोरदार पुरस्कार केलेला दिसतो. यामुळेच ‌‘दासबोध‌’ हा ‌‘व्यवहारकोश‌’ व ‌‘ज्ञानकोश‌’ ठरतो. सुसंवाद, नियोजन, कार्यप्रेरणा, संघटन, ध्येय, नेतृत्व, मनुष्यबळ हे सारे विषय आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात येतात. तसेच ते समर्थ रामदासांच्या लेखनातही स्पष्टपणे येतात. व्यवस्थापनशास्त्र म्हणजे व्यवहारशास्त्र होय. समर्थांनी व्यवहारशास्त्राचे सांगितलेले नियम, केलेले मार्गदर्शन आजच्या काळातील व्यवस्थापनशास्त्राच्या नियमांशी मिळते-जुळते आहेत. काही निवडक ओव्यांच्या आधारे हे साम्य उलगडले आहे.

नियोजन

मानवी जीवनात नियोजनाचे महत्त्व विशद करताना रामदास म्हणतात, ‌‘यत्न हाच देव आहे.‌’ यात त्यांनी प्रयत्नाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात काहीतरी निश्चित प्रयत्न व नियोजन हवे, ही जी आधुनिक धारणा आहे, तिला समांतर अशी धारणा समर्थ रामदासांनी सोप्या शब्दांत व्यक्त केली आहे.

व्यापेवीण आटोप केला| तो अवघा घसरतचि गेला|
अकलेचा बंद नाही घातला| दुरीदृष्टीने॥

विवेक करून पूर्वयोजना न आखता जर लोकसमुदाय जमवला, तर सांभाळता येत नाही. प्रथमच दूरदृष्टी वापरून विवेकाने ज्या मर्यादा घालायला हव्या होत्या, त्या न घातल्यास अनावर प्रसंग ओढावतो.

अंतरी नाही सावधानता| येत्न ठाकेना पुरता|
सुख-संतोषाची वार्ता| तेथे कैची॥

चांगला प्रयत्न होण्यास मनात सावधानता पाहिजे. मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल, तर त्याच्या हातून शेवटपर्यंत प्रयत्न होत नाही आणि ज्यांच्या हातून असा दीर्घ प्रयत्न होत नाही, त्यांच्या जीवनात सुख-संतोषाचा अनुभव येत नाही.

केल्याने होत आहे रे| आधी केलेचि पाहिजे|
यत्न तो देव जाणावा| अंतरी धरिता बरे|

प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य आहे. ‌‘प्रयत्न हाच परमेश्वर‌’ अशी मनाशी खूणगाठ बांधून सकारात्मक दृष्टीने काम केले की, यश मिळते असे समर्थ रामदास सांगतात.

संघटन कौशल्य

संघटन म्हणजे एखाद्या समान उद्दिष्टासाठी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या प्रयत्नांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याची क्रिया होय. समर्थ रामदासांचे वाङ्मय हे समाजप्रबोधन, समाज संघटन यासाठी लिहिलेले दिसते. आपल्या वाङ्मयाद्वारे समर्थांनी केवळ आध्यात्मिक विचार ठेवला नाही, तर त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनाच्या विकासातून, राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक परिवर्तनाचा विचार सर्व समाजासमोर ठेवला. सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी समाज एकत्र करून समाजाचे संघटन करणे महत्त्वाचे मानले. या संघटनेकरिता समर्थ रामदासांनी अफाट लोकसंग्रह केला. लोकसंग्रह करीत करीत भारतभर साधारण 1 हजार, 100 मठ स्थापन केले, असे म्हटले जाते.

सामर्थ्य आहे चळवळीचे| जो जो करील तयाचे|

समाजपरिवर्तनासाठी समर्थांनी संघटनशास्त्राचा वापर केला. विवेक, बुद्धिवाद, ज्ञान आणि विचार या चतुःसूत्रीवर त्यांचे संघटन आधारित होते.

लोकी लोक वाढविले| तेणे अमर्याद झाले|
भूमंडळी सत्ता चाले| गुप्तरूपे॥

एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडता येते, दुसऱ्याला तिसऱ्याशी आणि हा पसारा वाढत जातो. संघटनेतही हे सूत्र राबविल्यास कार्यकर्त्यांची एक फळी या संघटकापाठी उभी राहते. मग तो नेता जनाधार असलेला लोकनेता, संघटक म्हणून ओळखला जातो.

कोण कोण राजी राखले| कोण कोण मनी भंगले|
क्षणक्षणा परीक्षिले| पाहिजे लोक॥

आपल्यावर कोण प्रसन्न आहे, आपण कोणाचा मनोभंग केला आहे, आपण कोणाचे मन दुखावले आहे, हे लोकांची वारंवार परीक्षा घेऊन तपासून पाहावे.

समर्थांनी ऐहिक जीवनातील पुरुषार्थाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संघटनशास्त्रातील अनेक मूलभूत तत्त्वे प्रथमच आचरणात आणली.

सुसंवाद

मानवी जीवनात सर्वांत जास्त महत्त्व संवादाला असते, हे समर्थ रामदासांनी जाणले होते.

कठीण शब्दे वाईट वाटते| हे तो प्रत्ययास येते|
जरी मग वाईट बोलावे ते| काय निमित्य॥

कोणी कठोर शब्द बोलला, तर मनाला वाईट वाटते. हा प्रत्यक्ष अनुभव येतो, तर विनाकारण वाईट बोलू नये, हे उत्तम.

पेरिले ते उगवते| बोलण्यासारखे उत्तर येते|
तरी मग कर्कश बोलावे ते| काय निमित्य॥

जे बी पेरावे, तेच उगवते. आपण जसे बोलावे, तसे उलट उत्तर येते. असे जर आहे, तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलावे, हे उत्तम.

राखावी बहुतांची अंतरे| भाग्य येते तद्नंतरे|
एैसी ही विवेकाची उत्तरे| ऐकणार नाही॥

अनेक लोकांची अंतःकरणे राजी राखावी, तेव्हाच भाग्य प्राप्त होते.

कार्यप्रेरणा

व्यवस्थापनात ‌‘मानवी घटक‌’ हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. या मानवी घटकांना कृतिशील बनवणे व त्याचे उत्स्फूर्त सहकार्य मिळविणे, ही कोणत्याही व्यवस्थापनाची एक समस्या आहे. उद्दिष्टे गाठण्यासाठी या मानवी घटकाचा विधायक वापर करावा लागतो. त्याला कौशल्याने हाताळण्याची गरज असते. व्यवस्थापनातील ही संकल्पना समर्थांनी ‌‘दासबोधा‌’तही मांडली आहे.

कोणी येक काम करिता होते|
न करिता मागे पडते|
या कारणे ढिलेपण ते| असोचि नये॥

कोणतेही काम सुरू केले म्हणजे ते होते; न केल्यास मागे पडत जाते. यासाठी ढिलेपणा म्हणजे चालढकल, दिरंगाई मुळीच करू नये.

अखंड कामाची लगबग| उपासनेस लावावे जग|
लोक समजोन मग| आज्ञा इच्छिती॥

प्रत्येकाने आपले काम वेळेत व लवकर पूर्ण करावे. काम झाल्यावर मिळालेला मोकळा वेळ भगवंताच्या उपासनेत व्यतीत करावा. अशा प्रकारे वागले की लोकांमध्ये, समाजात आपोआप मान मिळतो व ते आपले नेतृत्व स्वीकारण्यास तयार होतात.

अधिकार प्रदान तत्त्व

अधिकार प्रदान करणे ही संघटन प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी होय. व्यवस्थापकीय कार्यक्षमतेसाठी अधिकाराचे वितरण करणे आवश्यक असते. प्रत्येक अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्यांना काही जबाबदारी देऊन व सोपवलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पूर्ण करणे, यालाच ‌‘अधिकार प्रदान‌’ असे म्हणतात. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची अशी ‌‘अधिकार प्रदान‌’ ही संकल्पना समर्थ रामदासांनी पुढीलप्रमाणे मांडली आहे.

अधिकार परत्वे कार्य होते|
अधिकार नसतां वेर्थ जाते|
जाणोनि शोधावी चित्ते| नाना प्रकारे॥

ज्याची जी पात्रता असते, त्याच्या शक्तीप्रमाणे त्याच्या हातून कार्य घडते. पात्रता व शक्ती नसेल, तर कार्य वाया जाते. यासाठी पात्रता ठरवण्यास लोकांचे अंतरंग अनेक प्रकारे तपासून पाहावे.

लोक बहुत शोधावे| त्यांचे अधिकार जाणावे|
जाणजाणोन धरावे| जवळ दुरी॥

पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांची पात्रता काय ते ओळखावे आणि मग प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणेच त्याला जवळ अंतरंगात घ्यावे किंवा दूर ठेवावे. ही महत्त्वाची सूचना करण्यास समर्थ विसरत नाहीत.
समर्थ रामदास हे संत पंचकातील एक महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. ‌‘संत‌’ या उपाधीप्रमाणे ‌‘समर्थ‌’ ही उपाधी त्यांना सर्वार्थाने सार्थ ठरते. याची विविध कारणे आहेत. दैनंदिन व्यवहाराला प्राधान्य देणारे आणि त्यानुसार तत्संबंधी चिंतन करणारे, तसेच समाजाला तशी पद्धतशीर शिकवण देणारे समर्थ रामदास हे त्यांच्या कार्यामुळे वेगळे ठरतात. आज श्री रामदास नवमीनिमित्ताने समर्थ रामदासांच्या विपुल वाङ्मयातील आधुुनिक व्यवस्थापनाचे दर्शन घडविणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध...

अधिकार पाहोन कार्य सांगणे|
साक्षेप पाहोन विश्वास धरणे|
आपला मगज राखणे| काही तरी॥

माणसाची योग्यता बघून त्याला झेपेल, असे काम त्यास सांगावे. माणसाची कष्ट करण्याची ताकद पाहून त्याचा विश्वास धरावा. पण, हे सगळे करताना आपले महत्त्व, वजन व मोठेपणा टिकवून धरावे.

मनुष्यबळ विकास

‌‘मनुष्य व्यवस्थापना‌’च्या किंवा ‌‘मानव संसाधन विकासा‌’च्या केंद्रस्थानी आहे, अर्थातच ‌‘मानव‌’ आहे. कोणत्याही संघटनेच्या किंवा संस्थेच्या कार्यक्षमतेचे यश हे मानवी श्रमाच्या (शारीरिक व मानसिक) प्रमाणावर अवलंबून आहे. मानवी सामर्थ्य, कौशल्य आणि ज्ञान जर नसेल, तर नैसर्गिक साधनसामग्रीचा काहीही उपयोग होणार नाही.

कार्यकर्ता आणि निकामी| शूर आणि कुकम|
धम आणि अधम| कळला पाहिजे॥

कार्य करणारा आणि कार्य करू न शकणारा, शूर आणि वाईट कर्मे करणारा, धार्मिक वृत्तीचा आणि अधार्मिक वृत्तीचा कोण आहे, हा भेद कळणे आवश्यक आहे.

वरिष्ठ आणी कनिष्ठ| भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ|
सारासार विचार स्पष्ट| कळला पाहिजे॥

वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण, भ्रष्ट कोण आणि अंतर्निष्ठ कोण हा सारासार विचार अगदी स्पष्टपणे कळला पाहिजे.

या कारणे आचारशुद्ध| त्याउपरी विचार शुद्ध|
वीतरागी आणि सुबुद्ध| ऐसा पाहिजे॥

शुद्ध आचार असलेला, त्यात शुद्ध विचार असलेला अनासक्त मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा माणूस इतर माणसांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ दर्जाचा असतो, असे समर्थ म्हणतात.

- प्रा. डॉ. विमुक्ता राजे
(क्रमश: - उत्तरार्ध उद्याच्या अंकात)
9892937406
varaje@vpmthane.org


Powered By Sangraha 9.0