छत्रपती शिवरायांच्या शौर्यकतृत्वाचे स्मरण करताना!

    11-Feb-2026
Total Views |

‌‘सेवा सहयोग फाऊंडेशन‌’ व ‌‘महानगर गॅस लिमिटेड‌’ यांच्या संयुक्त उपक्रमातून दि. 7 फेब्रुवारी ठाण्यात लाठीकाठी स्पर्धेची दिमाखदार अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी राज्यातील तेजस्विनीच होत्या, त्या साक्षात! छत्रपती शिवरायांच्या शौर्यकर्तृत्वाचे स्मरण करणाऱ्या कार्यक्रमाचा मागोवा...

लाठीकाठी स्पर्धांच्या माध्यमातून ‌‘सेवा सहयोग फाऊंडेशन‌’चा ‌‘किशोरी विकास प्रकल्प‌’ ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य व नेतृत्वगुण निर्माण करत आहे, असे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे व ‌‘एमईफएफएफएल‌’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पाटणकर यांनी काढले. यावेळी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या उपसंपादिका योगिता साळवी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‌‘सेवा सहयोग फाऊंडेशन‌’ व ‌‘महानगर गॅस लिमिटेड‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे लाठीकाठी व शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात पार पडली. यंदा ‌‘युनेस्को‌’ने महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसायादीत समाविष्ट केल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

‌‘किशोरी विकास प्रकल्पां‌’तर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, माणगाव, महाड, श्रीवर्धन, कर्जत व खोपोली परिसरातील 114 किशोरी वर्गांनी विभागस्तरीय स्पर्धा घेतल्या त्यातून अंतिम फेरीला 12 गटांची निवड अंतिम फेरीसाठी झाली. 163 मुलींनी शिवचरित्र व 62 मुलींनी लाठीकाठी या अंतिम फेरीत सहभाग घेतला. ग्रामीण भागातील अनेक मुलींना पहिल्यांदाच मोठ्या व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळाली, हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “अशा स्पर्धा मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, जो पुढे शिक्षण, करिअर आणि कामाच्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरतो. मोठी स्वप्ने पाहा, आयुष्यात किमान एकदा तरी विमानप्रवासाचा अनुभव घ्या आणि उंच भरारी घेण्याचे ध्येय ठेवा,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. लाठीकाठी स्पर्धेत मुलींचा जोश व शिस्त पाहण्यासारखी होती. छत्रपती शिवाजी महाराजांवरील विविध गीतांच्या तालावर मुलींनी लाठीकाठीचे कौशल्यपूर्ण प्रयोग सादर केले, तर शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेत शिवजन्म, रायगड-सिंधुदुर्गाची उभारणी, पाटलाचा चौरंग ‌‘गड आला पण सिंह गेला‌’, हिरकणी यांसारखे प्रसंग अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‌‘महानगर गॅस लिमिटेड‌’च्या सीएसआर विभागाच्या असिस्टंट मॅनेजर प्रियांका दळवी, अभियांत्रिकी विभागाच्या प्रज्ञा धुमाळ, मुंबई विद्यापीठाच्या डॉ. मेधा तापियावला, ‌‘बर्न्स ॲण्ड मॅकडोनेल कंपनी‌’चे जनरल मॅनेजर केतन कुमार, डोईशे बँकेच्या दीपाली पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. ‌‘किशोरी विकास प्रकल्प‌’ शाश्वत असला पाहिजे आणि असे उपक्रम प्रत्येक गावात राबविले गेले पाहिजेत, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

पथनाट्याच्या माध्यमातून अवघ्या दहा मिनिटांत शिवचरित्र डोळ्यांसमोर उभे राहिले, असे सांगत प्रा. भारती जोशी यांनी श्रीवर्धन विभागाचे विशेष कौतुक केले. लाठीकाठी स्पर्धेसाठी बाळा साठे (ठाणे) व सुरेंद्र शिंदे (दापोली) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेसाठी स्मिता भोसले-धुमाळ व प्रा. भारती जोशी यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.

- आरती नेमाणे