आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे ‘रविंद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट.’ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत सीए संतोष केळकर. या ट्रस्टच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख...
1989चा काळ होता. संतोष केळकर, विवेक रानडे, जितेंद्र म्हात्रे आणि रविंद्र जोशी हे मित्र. या सगळ्यांची जिवाभावाची मैत्री. हे मित्र सीए मधुकर खांडेकर आणि सीए श्रीकांत कुलकण यांच्याकडे सीए आर्टिकलशिप करत होते. पण त्या मित्रांपैकी एकाला रविंद्र जोशी यांना रक्ताचा कर्करोग झाला. उपचार खर्चिक होते. त्यांच्या सगळ्या मित्रांनी ठरवले की, उपचाराच्या खर्चासाठी प्रयत्न करायचा. त्यांनी साधारण त्या काळी 1 लाख, 25 हजार रुपये जमवले. उपचार सुरू झाले. मात्र, ऐन तारुण्यात रविंद्र जोशी देवाघरी गेले. त्यांच्या उपचारासाठी जमवलेले पैसे बाकी होते. ते पैसे रविंद्र यांच्या पित्याकडे द्यावेत, असे मित्रांनी ठरवले, तर रविंद्र यांचे पिता मुकुंदराव म्हणाले, “माझा मुलगा तर आता नाही. मी निवृत्त झालोय. पैसे मिळाले आहेत. तुम्ही पैसे परत करू नका. मी 15 हजार रुपये देतो. तुम्ही हे सगळे पैसे एखाद्या रुग्णालयाला द्या किंवा माझ्या मुलांच्या आठवणीसाठी उपक्रम करा,” त्यांची सूचना त्या तरुणांनी मान्य केली. त्यातूनच ‘रविंद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन’ची स्थापना झाली.
या ट्रस्टचे संस्थापक-विश्वस्त आहेत संतोष केळकर, तर विश्वस्त आहेत सीए मधुकर खांडेकर आणि सीए श्रीकांत कुलकण, सीए विवेक रानडे, सीए जितेंद्र म्हात्रे आणि स्मिता रानडे (रविंद्र जोशी यांच्या भगिनी.) ‘रविंद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन’चे कार्य म्हणजे जीवनदान देणारेच. या ट्रस्टच्या सगळ्े उपक्रम अगदी रूग्णालयही निव्वळ सेवाभावी उद्देशाने सुरू आहेत.
सुसज्ज रुग्णालय-ट्रस्टचे अंधेरीला सुसज्ज स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालयही आहे. सामान्य ओपीडीमध्ये मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, पॅथोलॉजी, लसीकरण, शस्त्रक्रिया आणि अस्थिरोग विभागांची सेवा उपलब्ध आहे. रुग्णालयात सोनोग्राफी, प्रसूती कक्ष (लेबर रूम) आणि ऑपरेशन थिएटरची सुविधा आहे. एकूण 12 खाटांची व्यवस्था असून त्यांपैकी 25 टक्के खाटा समाजातील वंचित घटकांसाठी राखीव आहेत. विशेष ओपीडीमध्ये वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन, गर्भसंस्कार, क्लिनिकल सायकोलॉजी आणि पंचकर्म चिकित्सा उपलब्ध आहे.
योग गार्डन -बांद्रा रिक्लेमेशन हा वर्दळीचा भाग. प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्या इथेही आहेतच. इथे नागरिकांना शांत आणि ऊर्जायुक्त वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी ट्रस्टने येथे योग व इतर व्यायामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
योग ही प्राचीन भारतीय जीवनपद्धतीची कला आहे. शांत आणि ऊर्जायुक्त वातावरणाचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी ट्रस्टने ‘वांद्रे रिक्लेमेशन प्रोमेनेड’च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथे योग व इतर व्यायामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सोलर पाकर् -भारत सरकार सौर व पवनऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. सौरऊर्जेच्या वापरामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होतो व पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होते. या सगळ्याचा विचार करत ट्रस्टने वांद्रे रिक्लेमेशन येथेच ‘योग सोलर गार्डनही करण्यात आले. हे सोलर पार्कच आहे.
राशी गार्डन-प्रदूषण कमी करण्यासाठी जंगल/वृक्षारोपण आवश्यक आहे आणि येथे केलेले वृक्षारोपण प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रानुसार केलेले आहे. याच परिसरात सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि फुटबॉल कोर्ट या सुविधा उपलब्ध आहेत, तर अशी जागा नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण संवर्धनाला वाढ देते.
ओपन फिटनेस गार्डन-वांद्रे प्रोमेनेडजवळील मोकळ्या जागेत विविध फिटनेस उपकरणे बसविण्यात आली आहेत. ही उपकरणे सर्व वयोगटांतील स्थानिक नागरिक नियमितपणे वापरत असून आरोग्य व तंदुरुस्ती वाढवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे.रुग्णालय सोडले, तर सीएसआर फंडातून ट्रस्टने हे सर्व सेवाभावी उपक्रम राबवले.
जेव्हा एखादी स्वंयसेवी संस्था ‘सीएसआर फंडातून एखादा उपक्रम राबविते, तेव्हा त्यातले दहा टक्के रक्कम ती ट्रस्टसाठी उपयोगात आणू शकते. मात्र, संतोष केळकर हे सीए आहेत आणि तेही न्ािस्वाथ सेवाभावी वृत्तीचे सीए. त्यामुळे त्यांनी ट्रस्टच्या कामासाठी असलेली रक्कमही पूर्णत सेवाभावी उपक्रमावर खर्च केली. हे निस्वाथ भाव पाहून ‘ओएनजीसी’ने ट्रस्टला उरण येथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम करण्यास निवडले.
उरण समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी आता या प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते. हे शुद्ध पाणी वांद्रे प्रोमेनेड परिसरातील बागायती व हिरवळीसाठी वापरण्यात येते. सांडपाण्याचा पुनर्वापर करून परिसराचे सौंदर्य वाढवणारी ही एक अद्वितीय व आदर्श सुविधा आहे.
असो ‘कोरोना’ काळात या ट्रस्टने 24 तास रुग्णसेवा केली. मात्र ‘कोरोना’ काळातला तो दिवस ट्रस्टच्या सेवाभावी आणि मानवी मूल्यांची परीक्षा घेणारा होता. ‘कोरोना’ काळात ट्रस्टचे रुग्णालयही ‘कोरोना’ रुग्णांसाठी खुले करण्यात आले. मात्र, त्या रात्री एक गरोदर महिला ट्रस्टच्या रुग्णालयाबाहेर उभी राहिली. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण आजूबाजूला एकही रुग्णालय नव्हते. होते ते ट्रस्टचे रुग्णालय. मात्र, हे रुग्णालय ‘कोरोना’ सेंटर झाल्याने इथे तिची प्रसूती करणे कायद्याने शक्य नव्हते. यावेळी संतोष केळकर यांनी सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला. जर या महिलेला रुग्णालयात प्रवेश दिला, तर तत्कालीन प्रशासकीय नियम मोडला जाणार. पण, प्रश्न त्या स्त्रीच्या मातृत्वाचा होता. संस्थापक-अध्यक्ष म्हणून संतोष केळकर यांनी निर्णय घेतला की, त्या महिलेला रुग्णालयात प्रवेश द्यायचा. तिची प्रसूती करायची. निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, ती महिला उपचारादरम्यान ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळली. त्यामुळे रुग्णालय आणि परिसराला बंद करावे लागले. पुढे यासाठी संतोष केळकर आणि ट्रस्टींवर गुन्हाही दाखल झाला. मात्र, सगळ्यांनी हा गुन्हा कर्तव्य म्हणून मान्य केला. कारण ‘सेवा परमो धर्मः’ हे या ट्रस्टच्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
मी ‘अभाविप’चा कार्यकर्ता आहे. जनसेवा आणि राष्ट्रहित हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. संस्कृत सुभाषित आहे,
परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः|
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्॥
म्हणजे वृक्ष इतरांना फळे देण्यासाठी जगतात, नद्या इतरांसाठी वाहतात, गायी इतरांसाठी दूध देतात आणि हे मानवी शरीरदेखील इतरांच्या सेवेसाठी (परोपकारासाठीच) आहे. त्यामुळे मी आयुष्यभर राष्ट्रहित जपणारी जनसेवा करणार आहे.
-संतोष केळकर
संस्थापक अध्यक्ष, रविंद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन ट्रस्
9594969638